सत्ता कोणाची?

0
106

जो देश सीमेवर आपल्या जवानांचे नाहक प्राण घेतो, आपल्या भारतात सातत्याने सशस्त्र दहशतवादी घुसवून निरपराध नागरिकांचे प्राण घेतो, काश्मीरमध्ये असंतोषाला खतपाणी घालतो, अशा पाकिस्तानशी सांस्कृतिक संबंध असावेत का हा प्रश्न उभय देशांदरम्यानच्या तणावप्रसंगी नेहमीच उपस्थित होत आलेला आहे. अशा वेळी पाकिस्तानविरुद्ध तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजायला काही संघटना पुढे होत आल्या आणि स्वतःचे महत्त्वही वाढवीत राहिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘ऐ दिल है मुश्कील’ च्या वादात करण जोहरची कोंडी करून त्याला सैनिक कल्याण निधीला पाच कोटींची रक्कम ‘प्रायश्‍चित्त’ म्हणून द्यायला लावूनही हेच केले आहे. राज ठाकरेंच्या ज्या पक्षाला गेल्या निवडणुकांत मतदारांनी साफ नाकारले. २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत ज्यांचा अवघा एक आमदार कसाबसा निवडून येऊ शकला, केवळ तीन टक्के मते ज्या पक्षाला मिळाली आहेत, अशा संघटनेच्या नेत्यापुढे महाराष्ट्राचे लोकनियुक्त भाजप – शिवसेना सरकार एवढे हतबल होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सदर चित्रपटाला सर्वतोपरी सुरक्षा पुरविण्याचा दिलेला शब्द मुकाट गिळावा लागतो हे सारेच समजण्यापलीकडचे आहे. पाकिस्तानी चित्रपट कलाकारांना आपण डोक्यावर घेऊन नाचवावे का हा वेगळा प्रश्न. त्यासंदर्भातील आमची भूमिका आम्ही यापूर्वी स्पष्टपणे मांडलीही आहे. आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिभावंत असताना केवळ व्यावसायिक उद्देशांसाठी पाकिस्तानी कलाकारांना नाचवायचे काहीही कारण नाही. पण या वादाचे निमित्त साधून एखाद्याने आपण जणू सार्वभौम बादशहा असल्याच्या थाटात फर्मान सोडावे आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तोंडात मारल्यासारखा चेहरा करून ही दांडगाई मुकाट चालवून घ्यावी हे अतिशय लाजिरवाणे आणि अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीला मोठे करणारे कृत्य आहे. सरकार म्हणून फडणविसांची जी जबाबदारी होती, ती त्यांना पाळता तर आली नाहीच, उलट अशा काही घटनाबाह्य अधिकारिणी राज्यात आहेत, ज्यांच्यापुढे तुम्ही दाती तृण धरून शरण गेलात तरच तुम्ही वाचाल, अन्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही तुम्हाला शरण देऊ शकणार नाहीत अशा प्रकारची जी हतबलता त्यांनी दाखवली आहे ती धक्कादायक आहे. करण जोहर पुरता कोंडीत सापडला होता, त्यामुळे त्याच्यापुढे सगळ्या अटी मान्य करण्यावाचून आणि पाच कोटी देण्यावाचून पर्याय उरला नव्हता. पण फडणविसांचे काय? त्यांच्या हाती सत्ता आहे ती केवळ कोटी घालून मिरवण्यासाठीच आहे काय? महाराष्ट्राची खरी सत्ता कोणत्या प्रकारच्या शक्तींच्या हाती आहे हे या विषयात स्पष्टपणे दिसले आहे. करण जोहरने आता चित्रपटापूर्वी उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्याची तयारी दर्शवली आहे. पण हा जुलमाचा रामराम कशासाठी? त्याची जर ती भावना होती, तर स्वतःहून हे शहाणपण त्याला आजवर का सुचले नाही? राज ठाकरेंनी ‘उदारहस्ते’ परवानगी दिली असली तरी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन या संघटनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नकार दिलेला आहे. म्हणजे करण जोहरपुढील संकट अजून टळलेले नाही. वादाचा धुरळा उडवून द्यायचा आणि कोंडीत सापडलेल्यांना स्वतःच्या पायांशी यायला लावायचे आणि आपले महत्त्व सिद्ध करायचे हे तंत्र पूर्वीपासून मुंबईत वापरले जात आले आहे. मात्र, प्रत्येकवेळी ज्याच्या हाती सार्वभौम सत्ता असते, ते सरकार या कसोटीच्या क्षणी नांगी टाकते आणि कोंडीत सापडलेल्याला वार्‍यावर सोडून देते. म्हणूनच अशा प्रवृत्तींचे फावते आहे. प्रश्न करण जोहरचा नाही. प्रश्न महाराष्ट्रात सत्ता कोणाची चालते हा आहे!