… अन्यथा शिवसेना एव्हाना राष्ट्रीय पक्ष असता ः उद्धव

0
94

>> गोव्याकडे आजवर दुर्लक्ष झाल्याची कबुली

 

समविचारी पक्षांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करून हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पाडायची नाही हा बाळासाहेबांचा दंडक होता, त्यामुळे शिवसेनेला शक्य असूनही अनेक प्रदेशांमध्ये कार्यविस्तार केला गेला नाही, अन्यथा एव्हाना शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष बनला असता असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. बांबोळी येथील ‘ग्रँड हयात’ मध्ये मराठी वृत्तपत्रांच्या निवडक संपादकांशी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा अनौपचारिक संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. शिवसेनेच्या या धोरणामुळे संघटनेतील राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले अनेक चांगले नेते इतर पक्षांमध्ये गेले व तेथे कायम झाले अशी खंतही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केली.
गोव्यामध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली त्याला कितीतरी वर्षे लोटली, परंतु आजवर राजकीयदृष्ट्या गोव्याकडे दुर्लक्ष का केले गेले या प्रश्नावर श्री. ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सक्रिय होता. शिवसेनेच्या विचारसरणीशी मिळतीजुळती मते असणारा तो पक्ष होता. त्यामुळे मगोच्या मतांमध्ये फूट पाडण्याची बाळासाहेबांची इच्छा नव्हती. हेच बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाबतीत केले गेले. त्यामुळे बेळगाव आणि सीमा भागापासूनही शिवसेना राजकीयदृष्ट्या कटाक्षाने दूर राहिली असे उद्धव यांनी सांगितले. देशाच्या अनेक भागांकडे अशाच प्रकारे दुर्लक्ष झाले, अन्यथा राष्ट्रीय पक्ष म्हणून शिवसेनेने भक्कम स्थान निर्माण केलेच असते असे त्यांनी सांगितले.
गोव्याकडे दुर्लक्ष केल्याची कबुली
गोव्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, गोव्यात चांगले नेतृत्व उभे करता आले नाही, कारण आम्हाला गोव्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. यापूर्वीच्या ९४ च्या निवडणुकीत साळगावसारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार जिंकता जिंकता राहिला होता. परंतु आमचे गोव्याकडे दुर्लक्ष झाले ही आमची चूक झाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे ९५ साली महाराष्ट्रात आमची सत्ता आली होती. त्यामुळे तेथे लक्ष केंद्रित झाले, त्यामुळे गोव्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, यावेळी आम्ही गांभीर्याने गोव्यात आलो आहोत आणि जुन्या चुकांची पुनरावृत्ती आता होणार नाही. शिवसेनेचे नेते सातत्याने आणि निवडणुकीनंतरही गोव्याच्या संपर्कात राहतील आणि येथे संघटनेचा कार्यविस्तार करतील.
गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्याशी शिवसेनेने संपर्क साधला आहे. अशाच प्रकारे इतर राज्यांमध्ये कार्यविस्तार करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील का असे विचारले असता ‘‘राष्ट्रीय स्वप्न पाहणे चूक नाही, परंतु आमच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला एकाएकी धुमारे फुटले आहेत असेही नाही’’ असे श्री. ठाकरे उद्गारले. जेथे बोलावणे येईल तेथे जरूर जाऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या इतर भागांमध्ये समविचारी पक्ष असतील, हिंदुत्वाचा विचार करणारे पक्ष असतील तर त्यांच्याशी युती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात पुन्हा शाखा उभारणी
गोव्यामध्ये शिवसेना कोणत्या प्रकारे कार्यविस्तार करील या प्रश्नावर त्याचे नियोजन सुरू असून सर्वांत आधी ठिकठिकाणी शाखा उघडल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. नुकतीच आपली गोवा सुरक्षा मंचाचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्याशी युतीसंदर्भात प्राथमिक बोलणी झाली असून जागावाटप काही दिवसांत ठरेल असे श्री. ठाकरे यांनी सांगितले. पर्वरीत झालेली सभा हा नुसता कार्यकर्ता मेळावा होता. जाहीर सभा आगामी काळात घेतल्या जातील. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण गोव्यात ठाण मांडून बसणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले. हिंदुत्व, राष्ट्रवाद, मराठी या आमच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत असे ते म्हणाले. जनतेचे हित सेनेला सर्वोच्च असेल. आम्ही भाजपच्या विरोधात नाही, परंतु जनतेचा आक्रोश मुखर करण्याचे काम मात्र आम्ही करणार आहोत असे ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना गोव्यात चांगल्या नेत्यांच्या शोधात आहे. त्यामुळे अशी चांगली माणसे आमच्यापर्यंत यावीत यासाठी सर्वांना शिवसेनेची दारे खुली असल्याचे ते म्हणाले.
मगोबाबत निर्णय वेलिंगकरांचा
शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच एकत्र आला आहे. आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही भाजपाची साथ सोडून आपल्यासोबत यावे असे काही प्रयत्न शिवसेनेकडून होऊ शकतात का, या प्रश्नावर आम्ही ते वेलिंगकरांवर सोपवले आहे. त्यांनी मगोला दारे खुली असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे त्यांना सोबत आणणे वा न आणणे याचा निर्णय आम्ही वेलिंगकरांवरच सोपविला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. वेलिंगकरांची सध्या केवळ पांडुरंग राऊत यांच्या गोवा प्रजा पक्षाशी बोलणी झालेली असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि भाजपामध्ये महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असूनही जी सतत तणातणी चालते, त्याविषयी विचारले असता उद्धव म्हणाले की, भाजपचे कोणतेही धोरण चुकते आहे असे दिसले तर त्याविरुद्ध बोलणे हे आम्ही कर्तव्य मानतो. पण त्यामुळे बोलणारे आपले मित्र आहेत की शत्रू आहेत हे मात्र भाजपाने ठरवायला हवे.
दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्याने हा विरोध जाहीरपणे व्यक्त करण्याऐवजी सरकारच्या अंतर्गत व्यासपीठावर व्यक्त करता आला नसता का या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, चार भिंतींमध्ये जर आम्ही विरोध केला तर ते जनतेपर्यंत जाणार नाही आणि त्यांना वाटेल की हेही या निर्णयात सामील आहेत, त्यामुळे आम्हाला जाहीरपणे बोलावे लागते. मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात आमची भूमिका आम्ही जाहीरपणे मांडली व ती योग्य असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांत स्वीकारली याचाही यावेळी ठाकरे यांनी उल्लेख केला.
अच्छे दिन आज कुठे आहेत असा सवाल करून उद्धव म्हणाले की, मध्यंतरी नितीन गडकरी यांनी जो विचार मांडला की अच्छे दिन गलेकी हड्डी बन गयी है तो अतिशय गंभीर विचार आहे असे सांगून ते म्हणाले की जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि विद्यमान मोदी सरकार हे तिचे शेवटचे आशास्थान आहे. ते जर अपयशी ठरले तर देशात अराजक माजेल. पंतप्रधानांनी संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पंतप्रधान हा कोणत्याही पक्षाचा नेता नसतो, त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणे योग्य नसल्याची स्पष्टोक्ती ठाकरे यांनी केली.
पिढीनुरूप भाषा बदलली
बाळासाहेबांनंतरची शिवसेना एकसंध ठेवताना समोर आलेल्या आव्हानांचा सामना कसा केलात व शिवसेनेची दिशा बदलली आहे का या प्रश्नावर उद्धव म्हणाले की, आम्ही आमचा विचार सोडला नाही, परंतु प्रत्येक पिढीनुसार भाषा बदलते, तशी आमची भाषा थोडी बदलली असेल, कारण दोन्ही पिढ्या वेगळ्या आहेत. आता आदित्य युवा सेनेचे काम पाहतो आहे. त्याच्यापुढे असलेल्या तरुणाईची भाषा वेगळी आहे. त्यामुळे पिढ्यानुरुप बदल हे होणारच, परंतु आम्ही आमचा हिंदुत्वाचा विचार वा मराठी माणसाच्या हिताचा विचार कुठेही सोडलेला नाही.
देशात आगामी काळात राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशी विभागणी होणार. अलीकडच्या काही निवडणुकांत अनेक राज्यांत लोकांनी प्रादेशिक पक्षांना निवडून दिलेले आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे. राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांची नाळ मातीशी अधिक जुळलेली असते. त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आणि महासंघ बनविण्याची आवश्यकता असल्याचे उद्धव म्हणाले.
या संवादावेळी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, महाराष्ट्राचे गृहमंत्री व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सामनाचे संपादक संजय राऊत व गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव यांनी कोणाच्याही मागे सूडबुद्धीने लागू नकोस. एखाद्याचे वाईट व्हावे या हेतूने आपण वागलो तर आपलेही वाईटच होईल हे लक्षात ठेवावे व कोणाविषयीही द्वेषाने मागे लागू नये, असा सल्ला श्री. ताम्हणकर यांना दिला. केसरकर यांच्याविरुद्ध नारायण राणे यांनी खालच्या स्तरावरून राजकारण केले होते. आज केसरकर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत. मनात आणले असते तर त्यांना सूड उगवता आला असता, परंतु त्यांचा तो स्वभाव नाही आणि शिवसेना असे सूडबुद्धीने वागत नसते असे उद्धव यांनी सांगितले. भाजपा मात्र अनेकदा सूडबुद्धीने वागत असल्याचे दिसते. एखाद्यावर सूड उगविण्यासाठी मुलीच्या लग्नाच्या दिवशी छापा टाकणे चांगल्या नियतीचे लक्षण नसल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावरील सीबीआय कारवाईचा संदर्भ देऊन श्री. ठाकरे म्हणाले.