संमेलनाचा सन्मान

0
253

येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कर्मभूमी नाशिकला होणार असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची झालेली निवड या साहित्य संमेलनांच्या आजवरच्या महान परंपरेत खोवला गेलेला एक मानाचा तुरा आहे. ज्ञानाला विज्ञानाची जोड यामुळे मिळणार आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी ‘पद्मभूषण’ ने सन्मानित झालेला नारळीकरांसारखा बुद्धिमान आणि विज्ञाननिष्ठ लेखक संमेलनाध्यक्षपदावर विराजमान होणे ही या संमेलनाची गुणवत्ता वाढविणारी बाब ठरेले. हा सन्मान त्यांना केवळ ते जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत म्हणून मिळालेला नाही; मराठीमध्ये विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबरीची रुजवण करण्यामध्ये आणि त्याचबरोबर बाल आणि युवा पिढीमध्ये वैज्ञानिक लेखनाद्वारे गणित, अंतराळ, खगोलशास्त्र, अशा विषयांची आवड निर्माण करण्यामध्ये नारळीकरांनी आजवर दिलेले योगदान केवळ अतुलनीय आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदावर त्यांची झालेली निवड सार्थ आहे आणि समस्त मराठी माणसासाठी अभिमानास्पदही आहे.
साहित्य संमेलन म्हटले की नाना तर्‍हेचे वादविवाद, संमेलनाध्यक्षपद निवडणुकीचा धुरळा वगैरे चित्र सर्रास दिसत असते. यंदाच्या संमेलनाच्या आयोजनाच्या ठिकाणावरून दिल्ली आणि नाशिकदरम्यानही वाद झडला होताच, परंतु संमेलनाध्यक्षपदी एखाद्या व्यक्तीला सन्मानाने विराजमान करण्याचा जो स्तुत्य पायंडा गेल्या काही वर्षांपासून पडला आहे, त्याला अनुसरून नारळीकरांसारख्या कोणाच्या अध्यात न मध्यात पडता केवळ आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करून आयुष्यभर विज्ञान साधना केलेल्या तपस्वी शास्त्रज्ञाला हा बहुमान देऊन आयोजकांनी या संमेलनाला आधीच एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.
विज्ञान विषयावर लिहिणारे अनेक आहेत, परंतु अगम्य संकल्पना आणि बोजड शब्दांमुळे या विज्ञानपर साहित्याला जेवढी मिळायला हवी होती तेवढी वाचकप्रियता लाभू शकलेली नाही, मात्र, नारळीकर याला सन्माननीय अपवाद आहेत. अत्यंत साध्या, सोप्या भाषेमध्ये देखील वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात आणि विज्ञानकथा वा कादंबरीही रंजक आणि वाचनीय ठरू शकते हे त्यांनी आपल्या लेखनातून आजवर दाखवून दिले आहे. विशेषतः नव्या पिढीला साद घालणारे जे विज्ञाननिष्ठ लेखन नारळीकरांनी केले आहे, त्याला तोड नाही.
खगोलशास्त्र आणि गुरुत्वाकर्षणासारख्या विषयामध्ये उच्चतम ज्ञान संपादन केलेल्या प्रा. नारळीकरांनी नव्या पिढीपर्यंत विज्ञान नेले, ते अत्यंत सुलभ मराठीतून. खरे तर त्यांच्या घरी विद्वत्ता पाणी भरायची. त्यांचे वडील देखील त्या काळी केंब्रीजमध्ये शिकले होते. त्यांची बौद्धिक चमक पाहून इंग्लंडला गेलेले पं. मदनमोहन मालवीय त्यांना जाऊन भेटले होते आणि आपल्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून येण्याची त्यांना गळ घातली होती. अशा विद्वान वडिलांचा वारसा आणि स्वतःही फ्रेड हॉयलसारख्या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाचे शिष्य आणि केंब्रीजच्या किंग्ज कॉलेजसारख्या मातब्बर जागतिक संस्थेचे फेलो असून देखील जयंतराव मातृभाषेतून शिक्षणाचे ठाम पुरस्कर्ते राहिले आहेत. मराठी ही ज्ञानभाषा तर झाली पाहिजेच, परंतु ती विज्ञानभाषादेखील झाली पाहिजे हा त्यांचा सततचा आग्रह राहिला आहे. त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आजवर विपुल लेखन केले. ‘प्रेषित’ सारखी पहिली विज्ञानकादंबरी त्यांनी लिहिली तेव्हा त्यामध्ये इंग्रजी शब्द वापरले गेल्याने काहींनी टीकाही केली होती, परंतु विज्ञानकथालेखन करताना इंग्रजी शब्द बिल्कूल वापरू नयेत हा अट्टाहास आपल्याला मान्य नाही आणि जर अशा शब्दांनी मराठी भाषा दबणार असेल तर तिला कमकुवत म्हटले पाहिजे. इतर भाषांची अतिक्रमणे पचवून कोणतीही भाषा समृद्ध होते. इंग्रजी भाषाही त्यामुळेच समृद्ध झाली आहे हे नारळीकरांनी ‘वामन परत न आला’ ह्या आपल्या दुसर्‍या विज्ञानकादंबरीच्या प्रास्ताविकात दाखवून दिले आहे.
बनारस, केंब्रीज, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये त्यांचे सारे आयुष्य गेेले. ‘चार नगरांतले माझे विश्व’ मध्ये त्यांनी आपली जीवनकहाणी मांडली. साहित्य अकादमी पुरस्कारही त्याला लाभला आहे. मराठी विज्ञान कथा – कादंबर्‍यांचे दालन तर नारळीकरांनी समृद्ध केले आहेच, परंतु आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मुलांसाठी, तरुणांसाठी विपुल लेखन त्यांनी आजवर केले. नव्या पिढीला विज्ञानामध्ये रस वाटावा यासाठी डॉ. नारळीकरांनी अथकपणे केलेल्या या लेखनामुळे लाखो मुलांना आजवर विज्ञानाची, खगोलशास्त्राची, गणिताची गोडी लागली असेल यात शंका नाही. साहित्यसंमेलनाध्यक्षपदी झालेली नारळीकरांची निवड मराठी साहित्यामध्ये विज्ञाननिष्ठ लेखनाचे एक नवे पर्व निर्माण करील आणि मराठी भाषेला आणि साहित्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल अशी अपेक्षा करूया!