विनायक खेडेकर, मृदुला सिन्हा, सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’

0
201

>> एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण

गोमंतकीय लोकसंस्कृती व लोककलांचे गाढे अभ्यासक श्री. विनायक खेडेकर, तसेच गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. पिंगुळी (ता. कुडाळ) येथील ‘चित्रकथी’ कलाकार परशुराम गंगावणे, महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश प्रभुणे व श्रीमती सिंधुताई सपकाळ यांनाही ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे.

गोव्याच्या लोकसंस्कृतीसंदर्भात आपण आजवर केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर ही दखल घेतली गेली त्याचा आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया श्री. खेडेकर यांनी व्यक्त केली. काल रात्री प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस पद्म किताबांची यादी घोषित करण्यात आली. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अबे, दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण देण्यात आले आहे.

१० जणांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले असून त्यात आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार, पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान, गुजरातचे दिवंगत मुख्यमंत्री केशुभाई पटेल आदींचा समावेश आहे. १०२ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले असून त्यात लेखक नामदेव कांबळे यांचाही समावेश आहे.