विषाणूजन्य आजारांसाठी आरोग्य विमा संरक्षण

0
112
  • शशांक मो. गुळगुळे

सध्या आपण कोरोनाच्या भीतीखाली जगत आहोत. तशात आता पावसाळा असल्यामुळे विषाणूजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. यासाठी निदान आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विषाणूजन्य आजारांसाठी असलेल्या पॉलिसींपैकी एक आरोग्य विमा पॉलिसी घेता येते.

सध्या आपण कोरोनाच्या भीतीखाली जगत आहोतच, तशात आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे विषाणूजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. यासाठी निदान आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विषाणूजन्य आजारांसाठी असलेल्या पॉलिसींपैकी एक आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी.

विषाणूजन्य आजारांनी एखादी व्यक्ती एखाद्या छोट्या स्वरूपाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तरी त्या व्यक्तीला घरी सोडताना ३० ते ६० हजार रुपयांचे बिल आकारले जाते. या पॉलिसीबाबत दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ (सर्वसमावेशक) आरोग्य विमा पॉलिसी. यात विषाणूजन्य आजारांसाठी केलेला खर्चाचा दावा नियमाप्रमाणे मिळू शकतो किंवा दुसरी खास विषाणूजन्य आजारांनाच संरक्षण देणारी पॉलिसी घेता येते. पॉलिसीधारक विषाणूजन्य आजाराने हॉस्पिटलात दाखल झाला- उदाहरणच द्यायचे तर मलेरियाने आजारी झाल्यामुळे हॉस्पिटलात दाखल व्हावे लागले- तर हॉस्पिटलचा खर्च तर मिळणारच, पण तुमच्या पॉलिसीत बाह्यरुग्ण विभागात केलेला खर्च मिळण्याची तरतूद जर समाविष्ट असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याची फी, औषधांचा खर्च तसेच केलेल्या चाचण्यांचा खर्च बाह्यरुग्ण उपचारांसाठी संमत होणार.

आजारांशी संबंधित व सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी यांच्यात मुख्य फरक हा आहे की, सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसीत ‘एक्सक्लूजन’ नसलेला कोणत्याही प्रकारच्या आजाराचा दावा संमत होऊ शकतो; पण आजाराशी संबंधित खास आरोग्य विमा पॉलिसीत त्याच आजाराचा दावा संमत होतो. एखाद्याने फक्त कर्करोगापासून संरक्षण देणारी पॉलिसी घेतली असेल तर त्याला कर्करोगाच्या उपचारांसाठीचाच खर्च मिळणार. अशा पॉलिसीधारकांंंंंंंचा किडनी खराब झाली किंवा दुसरा कुठलाही जीवघेणा आजार झाला तर त्याचा दावा संमत होणार नाही. विषाणूजन्य आजारांसाठीची जर पॉलिसी घेतली तर पॉलिसी घेतल्यापासून पहिले पंधरा दिवस काही आजार झाला व हॉस्पिटलात जावे लागले तर त्याचा खर्च मिळणार नाही. १६व्या दिवसापासून पॉलिसी दावा संमत होण्यासाठी कार्यरत होणार. सर्वसामावेशक पॉलिसीचा दावा संमत करण्यासाठीचा पहिल्या वर्षी ‘वेटिंग पिरियड’ साधारण ३० दिवसांचा असतो.

आजाराशी संबंधित खास आरोग्य पॉलिसी निश्‍चित फायदे देतात. पॅकेज पद्धत वापरली जाते. दावा केल्यानंतर त्या आजारासाठी किती रकमेचा दावा संमत करायचा यासाठी जी रक्कम निश्‍चित केलेली असते ती एकाच वेळी दिली जाते. वैद्यकीय खर्च कितीही आला तरी त्या विशिष्ट आजारासाठी किती निश्‍चित रक्कम द्यायची हे जे ठरलेले असते तितक्याच रकमेचा दावा संमत होतो.

स्टॅण्डर्डडाइग्ड विषाणूजन्य पॉलिसी ‘मशक रक्षक’ पॉलिसी म्हणून ओळखल्या जातात. या निश्‍चित फायदा देणार्‍या आरोग्य विमा पॉलिसी असतात. जेव्हा दावा केला जातो तेव्हा दावा संमत झाल्यावर जितक्या रकमेची पॉलिसी उतरविली आहे, तितकी पूर्ण रक्कम दावा म्हणून संमत केली जाते. विषाणूजन्य आजारात प्रामुख्याने मलेरिया, झिका वायरस, जपानी एन्सेफालिटीस, डेंग्यू, चिकुनगुनया, काला आजार व अन्य काही आजारांचा समावेश असतो. स्टॅण्डर्ड विषाणूजन्य विशिष्ट आरोग्य विमा पॉलिसीशिवाय फक्त डेंग्यू आजारासाठी काही कंपन्यांकडे आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेत.

समावेश नसणे
आरोग्य विमा पॉलिसीत ‘एक्सक्लूजन क्लॉज’मध्ये बरेच मुद्दे असतात. हे मुद्दे म्हणजे दावा का संमत होणार नाही याची दिलेली कारणे. उदाहरण द्यायचे तर परदेशात उपचार केले तर दावा संमत केला जात नाही. चाचण्या जर अधिकृत ‘डायगनॉस्टिक सेंटर’मध्ये केलेल्या नसतील तर दावा संमत होत नाही. काही आजार हे वारसाहक्काने चालत येतात. ज्यांच्याबाबतीत वारसाहक्काने येणार्‍या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता असते अशांनी म्हणजे कुटुंबातल्या रक्ताच्या नात्यातल्या सर्वांनी त्या आजाराची खास विशेष पॉलिसी घ्यावी. पॉलिसी उतरवताना पॉलिसीतून मिळणारे फायदे, एक्सक्लूजन क्लॉज कोणते आहेत यांची पूर्ण माहिती करून घ्यावी म्हणजे दावा दाखल केल्यानंतर पश्‍चात्ताप होण्याची पाळी येणार नाही. पॉलिसीधारकाला पॉलिसी उतरवताना जो काही किंवा जे काही आजार असतील त्याची माहिती पॉलिसी उतरविण्यासाठी केलेल्या फॉर्ममध्ये पूर्ण द्यावी. ही माहिती लपविलेल्यांचे दावे असंमत झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. आरोग्य विमा हा प्रामुख्याने ऍलोपथी उपचारांसाठीचे खर्च देतो. पण सध्याचे केंद्र सरकार आयुर्वेद, होमिओपॅथी वगैरेला प्राधान्य देते. यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष’ खातेही निर्माण केले आहे. परिणामी आयुर्वेद व होमिओपॅथी उपचारांचा खर्च मिळू शकतो; पण नेचरोथेरपी, ऍक्युप्रेशर, मॅग्नेटिक थेरपी इत्यादी उपचारपद्धतींचा खर्च मिळू शकतो का? याची माहिती आरोग्य विमा कंपनीकडून करून घ्यावी.

विषाणूजन्य पॉलिसीचा दावा संमत होण्यासाठी रुग्णाला किमान ७२ तास हॉस्पिटलात राहावे लागते तरच १०० टक्के दावा संमत होऊ शकतो. जर विषाणूजन्य आजाराचा रुग्ण हॉस्पिटलात दाखल झालेला नसेल, डॉक्टरची औषधे घरीच घेत असेल तर या आजाराचे निदान करण्यासाठी त्याने ज्या चाचण्या केल्या असतील त्याचा दावा विमा उतरविलेल्या रकमेच्या २ टक्क्यांपर्यंत मिळू शकतो. डोमिसिलिअरी हॉस्पिटलायझेशनचा खर्च या पॉलिसीधारकांना मिळत नाही. पण पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांसाठीची पॉलिसी उतरविणे हा चांगला निर्णय होऊ शकतो. या पॉलिसींसाठी भरावयाची प्रिमियमची रक्कम ही कमी असते. जर तुमच्याकडे सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी असेल आणि तुम्हाला जर असे माहीत असेल की जर तुम्हाला विषाणूजन्य आजार झाला तर या पॉलिसीतून केलेल्या खर्चापेक्षा कमी पैसे मिळणार, तर अशांसाठी खास विशेष विषाणूजन्य आजारांसाठीची पॉलिसी आहे. ही सुविधा घ्यावी. विषाणूजन्य आजारांसाठी नाही तर अन्य गंभीर आजारांसाठी ते म्हणजे- किडनी खराब होणे, कर्करोग, हृदयविकार, मोठा अपघात अशा आजारांसाठीही खास पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यांचाही गरजेनुसार उपयोग करून घ्यावा.