वास्कोच्या शाळेत युवकाचा  धुडगुस; मुख्याध्यापिकेस मारहाण

0
91

दाबोळी येथील केशव स्मृती हायस्कूलमध्ये काल एका युवकाने घुसून मुख्याध्यापिकेस जबर मारहाण केली. अन्य काही कर्मचारीवर्गही त्याच्या शिकार झाले. याप्रकरणी परीक्षित रायकर (२५) याला पोलिसांनी अटक केली. मुख्याध्यापिका सुषमा कोरगावकर या गंभीर जखमी असून इस्पितळात उपचार घेत आहेत.
काल शाळेच्या आवारात विद्यार्थी खेळत असताना तेथे परीक्षित आला व विद्यार्थ्यांना ढकलाढकली करू लागला. त्यावर मंदाकिनी कुभार या शिक्षिकेने त्याला मज्जाव केला असता तिला त्याने ढकलून टाकले व मारायला सरसावला, ते पाहून शाळेचा कारकून गुरुदास धाकटकर धावून आला, त्याच्या डोक्यावर या युवकाने वार केल्याने तो रक्तबंबाळ होऊन पडला.
हा सर्व प्रकार चालू असताना मुख्याध्यापिका सुषमा कोरगावकर धावून आल्या. त्यावेळी युवकाने मुख्याध्यापिकेस ऑफिसच्या आवारात कोंडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, तसेच तेथील सामानाची मोडतोड केली.
त्यानंतर इतर शिक्षक व विद्यार्थी त्याला पकडायला गेले असता त्याने पळ काढला.
याबाबत समजताच पोलीस तेथे पोचले व त्या युवकाला राहत्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. हा युवक शाळेनजीक बंगल्यात राहतो. दरम्यान, या युवकाच्या वडलांनी पोलिसांत तक्रार दिली असून आपल्या मुलाच्या मोटरसायकलचा टायर पंक्चर केल्याने तो माहिती देण्यासाठी शाळेत गेला होता, त्यावेळी मुख्याध्यापिका व कारकूनाने मिळून मुलास मारहाण केल्याचे नमूद केले आहे. मात्र, मुलाची वैद्यकीय तपासणी केली असता तसे काही आढळून आले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.