‘वाटेवरच्या सावल्या’मधील संस्मरणे

0
927

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

२७ ङ्गेब्रुवारी हा मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. कवितेमध्ये रमताना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाङ्‌मयातही मुक्त विहार केला. हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शिरवाडकरांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख…

कवितेची साधना दीर्घकाळ केलेल्या, नाटक, गद्यकाव्य, कथा, ललित निबंध आणि आस्वादक समीक्षा हे अन्य साहित्यप्रकार तेवढ्याच सामर्थ्यानिशी हाताळणार्‍या कुसुमाग्रजांना समग्र जीवनाचा पट आत्मचरित्राद्वारे उलगडून दाखविता आला असता. पण त्यांनी तो मार्ग का पत्करला नसेल? या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना लोकान्तात राहून एकान्तप्रिय असणार्‍या त्यांच्या चिंतनशील मनःपिंडात शोधावे लागेल. हे व्यक्तिमत्त्व कसे आहे? निर्मोही, निर्मत्सरी, निःसंग आणि आत्मविलोप साधणारे. पण त्याचबरोबर समाजमनस्क असलेल्या रूपकळेला परिणतप्रज्ञ वयात ‘विरामचिन्हे’मधून व्यक्त व्हावेसे वाटले. कालान्तराने हा स्वल्पविराम वाटल्यामुळे या अनुभवसमृद्ध माणसाला ‘विरामचिन्हा’त भर टाकून ‘वाटेवरच्या सावल्या’तून प्रकट व्हावेसे वाटले. या परिष्करणात आशयाची भर पडली. काही समृद्ध व्यक्तिमत्त्वांचे अंतरंगदर्शन घडले. तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीकडून… ही वाट होती रखरखीत उन्हातून आनंदाच्या नंदनवनात नेणारी… कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णू’ राहिली… मागाहून ती ‘विश्‍ववंदिता’ ठरली… भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत लागू यांनी शोधून काढलेल्या तार्‍याला ‘कुसुमाग्रज तारा’ असे नामाभिधान त्यांच्या ८५ व्या वाढदिनी बहाल करण्यात आले… तेही स्वीत्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय ग्रह-तारे नोंदणी संस्थेकडून… तरीदेखील कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यातून स्फुरलेल्या कवितेची धारणा कोणती होती?
आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझं जखमांचं देणं
फिटता फिटत नाही
कुसुमाग्रज केशवसुतांच्या मालगुंड येथील जन्मभूमीतील स्मारकाला उद्देशून म्हणतात ः ‘‘ही मराठी कवितेची राजधानी आहे.’’ याला म्हणतात प्रगल्भ आत्मभान.
कुसुमाग्रज जीवनाची खडतर वाट चालून गेले. त्यांची सखी होती ती कविता. या कवितेने कुसुमाग्रजांना काय दिले? त्यांच्याच शब्दांत ते आपण समजून घेतले पाहिजे ः
‘‘माझी कविता लौकिक दृष्टीने महालात बसलेली मानिनी नसेल, रस्त्यावर वावरणारी बैरागीण असेल, पण एक मिणमिणता दिवा घेऊन ती माझ्याबरोबर, नव्हे माझ्यापुढे सतत चालली आहे. त्या दिवलीच्या उजेडात माझे मीपण तर मला सापडलेच, पण या मीपणाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संबंधही सापडला. हे कवितेचे ऋण कधीही न फिटणारे, आणि तरीही मी कविता जगलो नाही. पण कवितेनेच मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.’’
(मराठीतील दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतातून)
कुसुमाग्रजांच्या कवितेने रसिक या नात्याने काय दिले? निराशेचे काळवंडलेल्या मनाला ‘कोलंबसाचे गर्वगीत’ दिले. क्रांतीचा जयजयकार केला. आणि हेदेखील… आत्मशोधाच्या प्रक्रियेतील नवीनत दिले ः
अखेर जीवन म्हणजे काय?
माझे जीवन मला कळणे
काळोखदेखील माझा दिवाही माझा
ते माझे जळणे
कुसुमाग्रजांनी जन्म घेऊन १०५ वर्षे झाली. माणूस बदलला. मूल्ये बदलली. कविताही बदलली. पण ‘कुसुमाग्रज’ ही प्रातःस्मरणीय मंत्राक्षरे उच्चारल्याबरोबर त्यांच्या तीर्थरूप चरणांना अनेकांना वंदन करावेसे वाटते… पार्थिव आणि अपार्थिवही.
वि. वा. शिरवाडकर यांना ‘जीवनलहरी’च्या रूपाने स्वतःमधील ‘कुसुमाग्रजत्वा’चा शोध लागला. ‘विशाखा’ने पुढचे पाऊल टाकले. अनेकांना जीवनमंत्र दिला. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या साहित्यपुरुषोत्तमाला आपली पिढी ‘विशाखा’ नक्षत्रावर जन्माला आली याचा साक्षात्कार झाला. कैक रसिकांच्या आदरभावनेला आणि कृतज्ञतेला दिलेला तो उद्गार होता. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘वाटेवरच्या सावल्या’ या त्यांच्या संस्मरणात्मक पुस्तकाचा आस्वाद घ्यावासा वाटतो.
‘वाटेवरच्या सावल्या’ हे पुस्तक तात्यासाहेब शिरवाडकरांनी ‘सप्तशृंग नावाच्या डोंगरास’ अर्पण केले आहे. या प्रसंगी त्यांच्या अनेक पुस्तकांच्या अर्पणपत्रिका न्याहाळून पाहाव्याशा वाटतात. त्यात आपल्या परिसराविषयीचा भावनिक ओलावा व सांस्कृतिक संचिताविषयीची कृतज्ञता आढळून येते. हाच संवेदनाप्रवाह या आत्मकथनात भरून राहिलेला आहे. यात कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासातील पाऊलखुणा आहेत. पुनरावलोकन आहे. पण त्यामागील मूलप्रेरणा आहे ती आपल्या जडणघडणीस कारणीभूत झालेल्या घटना-प्रसंगांची, समृद्ध व्यक्तित्तत्त्वांची ः जीवनाचे प्रखर उन्हाळे सहन करताना सावल्या देणार्‍या वृक्षांची या अनुभवात विकीर्णता नाही. अनुबंधाच्या गाठी आहेत… अंतःसूत्र आहे… त्यांना भेटलेली ‘माणसे’ आहेत… सप्तशृंगाच्या डोंगरमाथ्यासारखी…आकाशाशी हृदयसंवाद करणारी. ‘वाडा’ आणि ‘तो सत्याग्रह’ या लेखांमधून त्यांनी जडणघडणीचा आलेख रेखाटला आहे. ‘प्रभातस्वप्न- आमचेही’, ‘असेही दिवस’, ‘आदिपर्वातील संपादक’ आणि ‘हमाम स्ट्रीट’ या लेखांत मुंबईतील वास्तव्यात प्रतिकूल परिस्थितीत मार्ग आक्रमण्याची दुर्दम्य जिद्द आहे. मुंबई त्या काळात अवाढव्य वाढलेली नव्हती. तरीही राजकीय चळवळीचे, विविध सामाजिक विचारांच्या चलन-वलनाचे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभिसरणाचे ते दिवस होते. बुद्धिप्रामाण्यवादी तरुणाईचे ते स्पंदनकंद्र होते. कुसुमाग्रजांच्या संवेदनशील मनावर या वातावरणात नवे तरंग, नव्या ऊर्मी उमटत होत्या. पण पोथीनिष्ठ वृत्तीने कोणत्याही सरणीचा स्वीकार करायला त्यांचे मन राजी नव्हते. ज्या चिररुचिर आणि रसमय शैलीत हे तपशील कुसुमाग्रजांनी टिपलेले आहेत, ती शब्दकळा केवळ त्यांचीच असू शकते याचा प्रत्यय येतो. त्यांच्या जाणिवांचे क्षेत्र किती विस्तीर्ण, किती सखोल अनुभूतींचे आणि प्रगल्भ होते, याचे ठसे आपल्या मनावर उमटल्यावाचून राहत नाहीत. या दृष्टीने पत्रकारिता आणि वाङ्‌मयीन नियतकालिकांची सृष्टी प्रतिकूलतेतदेखील कशी बहरत होती, याविषयीची निरीक्षणे कुसुमाग्रजांनी बारकाईने टिपलेली आहेत. हे ‘असेही दिवस’ आणि ‘आदिपर्वातील संपादक’ या दोन लेखांत पाहता येते. ‘‘वा. रा. ढवळे यांच्याशी असलेल्या औपचारिक ओळखीचे रूपांतर आजच्या घटकेपर्यंत कधीही म्लान न झालेल्या जिव्हाळ्याच्या दोस्तीत झाले,’’ असे ते म्हणतात. पुढे ते कृतज्ञतेने लिहितात ः ‘‘ढवळ्यांनी माझे हे पोरकेपण ओळखले आणि आपल्या हिटलरी हुकमतीने मला आपल्या स्नेहाच्या कक्षेत ओढून घेतले. या कक्षेमध्ये आणिक बरेचसे समानधर्मी होते. वा. ल. कुलकर्णी, ग. ल. कुलकर्णी, चित्रकार गोडसे, काणेकर इत्यादी. त्यांचीही मैत्री मला मिळाली.’’ ही मैत्रीची कोनशिला दृढ होती.
‘आदिपर्वातील संपादक’ या लेखात ‘विविधज्ञानविस्तार’चा दबदबा तत्कालीन पिढीत कसा होता हे त्यांनी वृत्तिगांभीर्याने तसेच नर्मविनोदी शैलीत सांगितले आहे. पण त्याचबरोबर ते हेही सांगायला विसरलेले नाहीत. ‘‘पूर्वीच्या काळी महाराष्ट्रातील बहुतेक संपादक सामाजिक जीवनात अग्रस्थान मिळविणारे नेते, कार्यकर्ते वा विचारवंत असत. नियतकालिक चालवणे हा व्यवसायापेक्षा एका वैचारिक अथवा वाङ्‌मयीन आंदोलनाचा भाग होता. या पार्श्‍वभूमीवर उदयाला आलेल्या ‘मनोरंजन’ने कालान्तराने पुढे आलेल्या ‘चित्रा’, ‘वसुंधरा’, ‘प्रगती’, ‘संजीवनी’ आणि ‘प्रतिभा’ या नियतकालिकांनी केलेले. वाङ्‌मयीन कार्य कुसुमाग्रजांनी अधोरेखित केले आहे. त्यांतील व्यक्त झालेल्या वाङ्‌मयीन वृत्तिप्रवृत्तींशी त्यांनी जुळवून घेतले. ‘विविध वृत्त’ आणि ‘विहंगम’ यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘विहंगम’ने ’जीवनलहरी’ या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहावर जो अनुकूल अभिप्राय दिला, त्यामुळे आपणास कसे प्रोत्साहन मिळाले हे त्यांनी निर्मम वृत्तीने नमूद केले आहे.
‘हमाम स्ट्रीट’मध्ये कुसुमाग्रजांनी पत्रकारितेत आलेले जे कटू-गोड अनुभव सांगितले आहेत. ते वाचून आपण अंतर्मुख होतो. तत्कालीन वृत्तपत्रीय क्षेत्राची झलक आपणास पाहायला मिळते. ना. भि. परुळेकरांचे व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटले आहे.
‘मुक्काम पुणे’ या लेखात कुसुमाग्रजांनी पत्रकारितेत आपण कसे स्थिरावलो हे ओघवत्या शैलीत सांगितले आहे. त्यांच्या जीवनाच्या वाटेने येथे वळण बदललेले आहे. येथे त्यांना टोलेजंग माणसे भेटली. पत्रकारितेत काही पराक्रम गाजवावा आणि चरितार्थही साधावा अशी उभारी त्यांच्या मनाने घेतली. पत्रसृष्टीत स्थिरपद झालेली आणि वाङ्‌मयीन क्षितिजाकडे झेपावणारी अनेक माणसे त्यांना भेटली. त्यामुळे भरड माळरानावर तलम पोताची कविता करण्याची ऊर्मी कुसुमाग्रजांच्या मनात निर्माण झाली.
कुसुमाग्रजांनी पुण्याहून पुन्हा मुंबईला प्रयाण केलेले आहे. राजकारण, साहित्य, सिनेमा आणि नाटक या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे ‘धनुर्धारी’ त्या काळात तेजीत होते. प्रभाकर पाध्ये यांच्या आग्रहामुळे कुसुमाग्रज ‘धनुर्धारी’मध्ये रूजू झाले. ‘त्रिभुवन रोड’ या लेखात नर्मविनोदी आणि रोचक शैलीत त्यांनी हे सारे तपशील वर्णिलेले आहेत. प्रभाकर पाध्ये यांच्याशी त्यांची गाढ मैत्री येथेच झाली. कुसुमाग्रज आणि त्यांच्या ‘विशाखा’तील कविता पाध्ये यांना अत्यंत प्रिय होती.
कुसुमाग्रज मुंबईहून रमाकांत वेलदे यांच्या आग्रहामुळे नाशिकला गेले. ज्यांना ‘अवलिया’ म्हणता येईल अशा वेलद्यांचे गुणदोषांसह अप्रतिम स्वभावचित्र कुसुमाग्रजांनी ‘बादशहा’ या लेखात रेखाटले आहे. त्याचबरोबर गोपाळराव सौंदणकर, वा. का. जोशी आणि उमाकांत ठोमरे यांचे स्वभावविशेष त्यांनी उत्कृष्टरीत्या रंगविले आहेत. एव्हाना कुसुमाग्रजांची पावले कवितेबरोबर कादंबरीलेखनाच्या दिशेनेही पडत होती. या पुस्तकाचे एक गुणवैशिष्ट्य म्हणजे ‘प्रॉमीथिअस’ (स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर), ‘नंदादीप’ (वि. स. खांडेकर) आणि ‘आदिशक्तीची एक देदीप्यमान मिरवणूक’ (आचार्य अत्रे) या वाङ्‌मयक्षेत्रातील मानदंडांची अप्रतिम शैलीत रेखाटलेली व्यक्तिचित्रे. या भिन्न प्रवृत्तींच्या लेखकांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने देशकारणाला, वाङ्‌मयीन क्षेत्राला आणि सांस्कृतिक क्षेत्राला एका उत्तुंग पायरीवर नेऊन पोचविले होते. या व्यक्तींशी वैचारिक गोत्र जुळत नसतानाही गुणग्राहक वृत्तीने आणि तन्मयतेने त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख त्यांनी रेखाटलेला आहे, तो स्पृहणीय आहे.
‘प्रॉमीथिअस’ या लेखात कुसुमाग्रज म्हणतात ः ‘‘तिळभांडेश्‍वराच्या अरुंद अंधार्‍या गल्लीमध्ये हा प्रखर विस्तव प्रथम पेटला होता…’’ व ‘‘मेणबत्त्यांप्रमाणे माणसं शिलगावीत जाण्याचं असं लोकविलक्षण सामर्थ्य सावरकरांमध्ये होतं.’’ बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून त्यांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करतात. ‘‘घाटदेवळांचे आणि श्राद्धपक्षांचे एक तीर्थक्षेत्र म्हणून गाजलेल्या आणि गंजलेल्या या शहराला सावरकरांनी प्रथमतःच एक नवीन आशय दिला. अगदी वेगळा आणि आधुनिक असा संदर्भ दिला.’’ अनंत कान्हेरेसारख्या क्रांतिकारकांच्या समर्पणशील वृत्तीचे, शाहीर कवी गोविंद यांच्या अभंग जिद्दीचे कुसुमाग्रजांनी तन्मयतेने दर्शन घडविले आहे… समर्पणशील वृत्तीच्या माणसांची मांदियाळीच निर्माण झाली होती. या लेखाचा शेवट करताना कुसुमाग्रज म्हणतात ः
‘‘स्वर्गलोकातील अग्नी माणसांसाठी पृथ्वीवर आणणारा, ग्रीक पुराणातील प्रॉमीथिअस. त्या साहसाबद्दल शासन म्हणून एक प्रचंड वैराण पहाडाला साखळदंडांनी बांधलेला. हिंस्र पक्ष्यांच्या कठोर चोचींनी जखमी होत असलेला… एकटा…’’
या प्रतीकात्म आशयातून सावरकरांच्या वृत्तीतील बलशालित्व कुसुमाग्रजांनी अधोरेखित केले आहे.
‘नंदादीप’ या लेखातून वि. स. खांडेकरांची महत्ता सांगता सांगता तत्कालीन वाङ्‌मयपर्वाचाही कुसुमाग्रजांनी मुक्त कंठाने गौरव केला आहे. साहित्याच्या सहस्रधारा अंगावर घेणारा तो काळ होता असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. खांडेकरांच्या साहित्याची महत्ता कशात होती? कुसुमाग्रज म्हणतात ः ‘‘देशाचे साहित्यकार ही पदवी त्यांना प्राप्त होते आणि त्या समाजाच्या केवळ साहित्याचे नव्हे तर सर्व संस्कृतीचे ते एक प्रतिनिधी होतात. हा अधिकार खांडेकरांच्या साहित्याने संपादन केला.’’ त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या पलीकडचे मानवी रूप स्वानुभवाद्वारे कुसुमाग्रजांनी प्रकट केले आहे. त्यांची ‘विशाखा’ या कवितासंग्रहाची सांगितलेली जन्मकथा त्यांच्याच शब्दांत वाचायला हवी.
आचार्य अत्रे यांच्या उत्तुंग वाङ्‌मयीन कर्तृत्वाचा आलेख रेखाटताना त्यांच्या उत्तरायुष्यात निर्माण झालेले स्वाभावदोष, त्यामुळे पडलेल्या मर्यादांचे चित्रण कुसुमाग्रजांनी तटस्थपणे आणि मनोविश्‍लेषणाच्या अंगाने केलेले आहे. तीच गोष्ट त्यांच्या समकालीन साहित्यिकांची. लेखणीमध्ये बळ आहे म्हणून ओरबाडून काढण्याची वृत्ती कुसुमाग्रजांमध्ये नाही. त्यांच्या मनाचा समतोल कुठे ढळत नाही. माणुसकीने ओथंबलेले कविमन आणि अंतःकरणातील ऋजुता येथे प्रकट होते. माणूस आणि साहित्यिक यांमधील अद्वैत येथे आढळते.
तात्यासाहेब शिरवाडकर हे मोठे नाटककार. सिनेमासृष्टीविषयी कोणे एकेकाळी निर्माण झाले होते. ‘अव्यापारेषु व्यापार’, ‘प्रभातस्वप्न-आमचेही’, ‘पहिली पायरी’, ‘काकासाहेब’ आणि ‘थिएटर’ यांसारख्या लेखांतून या क्षेत्रात पडलेल्या पहिल्या-वहिल्या पावलांविषयीचे प्रांजळपणे कथन केले आहे. माणूस सर्वसामान्यतः आपल्या यशाविषयी सांगतो. अपयशाविषयी काही सांगत नाही. पण तात्यासाहेब शिरवाडकरांचे व्यक्तिमत्त्व याबाबतीत दुर्मीळ आहे. ‘हरवलेला’मधील नानांचे अवलिया स्वरूपाचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उत्कृष्टपणे उभे केलेले आहे.
कुसुमाग्रजांच्या कवितेची जन्मप्रक्रिया आणि तिच्यातील जीवनाशय समजून घेण्याच्या दृष्टीने ‘तिच्यावरी ही फिर्याद’, ‘कवितेच्या उगमाकडे’ आणि ‘नदी’ हे अप्रतिम शैलीतले लेख आहेत. ‘तिच्यावरी ही फिर्याद’ यात कविमनाचा वेध घेतला आहे. कविमन आणि कविता यांच्यामधील नात्याचा शोध त्यांनी घेतला आहे. त्यासाठी पूर्वसूरींचा मागोवा घेतला आहे.
‘नदी’ या लेखात कुसुमाग्रजांची सौंदर्यदृष्टी प्रत्ययास येते. ‘‘संध्याकाळच्या तलम रेशमी प्रकाशात रात्रीच्या सावल्या मिसळत असता नदीच्या पात्रातून वा तीरावरून फिरावे. लहानमोठ्या काळ्या खडकांना वळसे घालणारा तो संथ नीलांग प्रवाह पाहिल्यावर मनातील नास्तिकता मागे हटते आणि आस्तिकतेच्या तारा झंकारू लागतात.’’ या खास कुसुमाग्रजस्पर्शाच्या ओळी आहेत. गोदावरीची नाशिक परिसरातील तीनही रूपे त्यांची आवडती. ‘गोदाकाठचा संधिकाल’ ही कविता या तन्मयतेच्या पातळीवरून साकार झाली आहे. ते म्हणतात ः ‘‘गोदावरीच्या या पाषाणबद्ध किनार्‍याने कमलावराप्रमाणे मला अनंत हस्तांनी अनंत दिले.’’ म्हणून त्यांच्या कवितेला छंद पुरविणारा ‘छंदोमयी’ हा कवितासंग्रह त्यांनी ‘नाशिकच्या परिसरातील गोदावरीस’ अर्पण केला आहे. ‘नदी’ हा लेख गद्यरूपात प्रकट झालेला आहे, तरी त्याचा अंतरात्मा नितांत रमणीय कवितेचा आहे. त्यांच्या जोडीला ‘कवितेच्या उगमाकडे’ हा लेख आवर्जून वाचावा. ‘वाटेवरच्या सावल्या’मधील आनंदानुभूतीची परिक्रमा परिपूर्ण होईल ः
‘‘असे काही मनातले, काही जनातले, काही कल्पनेतून उतरलेले, काही प्रत्यक्षातून उपसलेले, जे काही संज्ञेभोवती हेलावत होते, त्याला अखेर काव्याचा प्रवाह सापडला. नाट्यासारखे इतर वाङ्‌मयप्रकार कोणा एकाला प्रिय होते. अन्य प्रकारांत लेखन करण्याचा प्रयत्नही तो करीत होता. पण कविता सर्वांत जवळची होती, सर्वांत अधिकही होती. आपल्या व्यक्तिमत्त्वाची मूलद्रव्ये कवितेमध्येच प्रवाहित होत आहेत, असे वाटायचे.’’
-प्रथमपुुरुषी एकवचन टाळूनही आत्मप्रकटीकरण करता येते याचा उत्तम आदर्श म्हणजे कुसुमाग्रजांची निवेदनशैली.