लोजपच्या अध्यक्षपदावरून चिराग पासवानना हटवले

0
57

बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पक्षात जोरदार घडामोडी घडत असून पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड केले आहे. तसेच चिराग यांचे काका पशूपतीकुमार पारस यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले आहे.
चिराग पासवान यांच्या जागी सूरज भान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सूरज भान हे पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न करतील. पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

दरम्यान, या घडामोडींबाबत बोलताना चिराग पासवान यांनी, वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपले कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र अयशस्वी ठरलो. लोकशाहीत जनताच सर्व काही आहे, पक्षावर विश्वास ठेवणार्‍या लोकांना मी धन्यवाद देतो असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाच खासदार निलंबित
चिराग पासवान यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पाचारण केली आहे. तसेच पक्षातील पाचही बंडखोर खासदारांना निलंबित करण्याची घोषणाही चिराग यांनी केली. चिराग पासवान समर्थकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोजपमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण पशुपती पारस यांना नव्हे तर चिराग पासवान यांनाच आपले नेते मानत असल्याचे सांगितले.