राज्यात १८ जूनपर्यंत मुसळधार पाऊस

0
78

>> हवामान खात्याचा इशारा

राज्यात पुढील तीन दिवस म्हणजेच येत्या १८ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात अतिवृष्टीची जी स्थिती आहे ती आणखी तीन दिवस म्हणजे शुक्रवार १८ जूनपर्यंत चालू राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने यापूर्वी १५ जूनपर्यंत अतिवृष्टीची शक्यता असल्याचे म्हटले होते. पण काल हवामान खात्याने राज्यात १८ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गोवा व कोकण किनारपट्टीवर १८ जूनपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचे खात्याने म्हटले आहे.

राज्यातील काही भागांना अतिवृष्टीचा धोका असून त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष करून सखल भागांत दरडी कोसळण्याचीही शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.
सोमवारी राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. परिणामी काही भागांत व विशेष करून डिचोली तालुकतील काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.

डिचोली तालुक्यात सोमवारी तब्बल ९० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे डिचोली तोलुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. डिचोली नदीच्या पात्रात वाढ झाल्याने नदीला पूर आला होता.

राजधानी पणजीतही पावसामुळे कांपाल, मेरशी जंक्शन, तसेच पणजी शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. काल मंगळवारीही राज्याला पावसाने झोडपून काढले होते.