कॉंग्रेसच्या विविध संघटनांची १५ जुलैपूर्वी पुनर्रचना करा

0
54

>> गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांचे आदेश

येत्या १५ जुलैपूर्वी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेस, युवा कॉंग्रेस, पक्षाचा विद्यार्थी विभाग व सेवादल यांची पुनर्रचना करण्याचा आदेश काल कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी दिला. तसेच यावेळी त्यांनी समाज माध्यम विभागही अधिक कार्यक्षम बनवण्याचे आदेश दिले. पक्षाच्या अग्रणी संघटनांबरोबर घेतलेल्या आभासी बैठकीतून मार्गदर्शन करताना श्री. राव बोलत होते.

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने वाढती महागाई, स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅसच्या दरात झालेली प्रचंड वाढ, विधवा तसेच ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून देणार्‍या मासिक अर्थसाहाय्यास होणारा विलंब, तसेच महिलांवरील अत्याचार असे विषय हातात घेऊन लोकांना न्याय देण्यासाठी लढण्याची सूचना त्यांनी दिली. युवा कॉंग्रेसने कोविड महामारीच्या काळात रुग्णांना प्राणवायू पुरवठा तसेच इतर मदत देण्याच्या बाबतीत केलेल्या कार्याबद्दल राव यांनी अभिमानाने उल्लेख केला. तसेच बेरोजगारीच्या प्रश्‍नावरून भाजप सरकारला जाब विचारण्याचा सल्ला दिला.

कॉंग्रेसच्या विद्यार्थी विभाग असलेल्या एनएसयूआयला विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काम करण्याबरोबरच कोविड महामारीत कोलमडलेली शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारवर शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्यासाठी दबाव आणण्याची सूचनाही राव यांनी केली. सेवा दल कार्यकर्त्यांनी लोकसेवा सुरूच ठेवावी असे सांगून जनहिताद्वारे लोकांचा विश्‍वास संपादन करावा अशी सूचना सेवा दल कार्यकर्त्यांना केली.

लोकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी पक्षाच्या चारही अग्रणी विभागांनी कष्ट घ्यावेत असे सांगून संघटन प्रमुखांनी विविध मतदारसंघांचे दौरे करावेत असे निर्देशही दिले. या बैठकीत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विधिमंडळ गटाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युवा अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, सेवा दल प्रमुख शंकर किर्लपार्लकर, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष एम. के. शेख यांनी सहभाग घेतला व आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपले विचार मांडले.

दिनेश गुंडूराव यांचा
उद्यापासून गोवा दौरा

कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव हे उद्या दि. १७ जूनपासून चार दिवसांच्या गोवा दौर्‍यावर येणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल दिली. यंदा गोवा क्रांतिदिनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसतर्फे राज्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत असे श्री. चोडणकर यांनी सांगितले. तसेच येत्या फेब्रुवारीत होणार्‍या गोवा विधानसबा निवडणुकीच्या पाश्‍वभूमीवर ते राज्यभर दौरा करणार असल्याचेही यावेळी चोडणकर यांनी सांगितले.