राज्यात १६६ पर्यटक प्रकल्प हाती घेणार

0
82

>> पर्यटनमंत्री परुळेकरांची माहिती

 

राज्यातील सर्व किनार्‍यांवर शौचालये, चेंजिंग रुम आणि पर्यटकांसाठी अन्य आवश्यक सुविधा उभारण्यासाठी १० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. तसेच राज्यात १६६ पर्यटक प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल विधानसभेत पर्यटनखात्याच्या मागण्यांना उत्तर देताना दिली. या प्रकल्पांसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. त्यासाठी २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता केंद्राने दिलेला आहे. या प्रकल्पांसाठी केंद्राने २०० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अंतर्गत भागातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हरवळे धबधबा, दूधसागर धबधबा, येथे सरकारने सुविधा वाढवल्या असल्याची माहितीही यावेळी मंत्री परुळेकर यांनी दिली.
गोव्यात येणार्‍या पर्यटकांचा आकडा वाढतच असून गेल्या वर्षी हा आकडा ५२ लाख ९७ हजारांवर पोहोचला होता. पैकी ४७ लाख हे देशी पर्यटक तर ५ लाख विदेशी पर्यटक होते, अशी माहिती मंत्री परुळेकर यांनी यावेळी दिली. पर्यटकांसाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारने भरपूर खर्च केला आहे. खात्याने पर्यटन भवन उभारले, मये तलावाचे सौंदर्यीकरण केले. विविध किनार्‍यांवर शौचालये, सौंदर्यीकरण अशी कामे केलेली आहेत अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
आमच्या पूर्वीच्या सरकारला रिव्हर प्रिन्सेस समुद्रातून हटवण्यासाठी तसेच पणजीच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्राने १२० कोटींचा निधी दिला होता. पण सरकारने तो भलत्याच कामासाठी वापरल्याचे परुळेकर म्हणाले.
गेल्यावर्षी पर्यटन खात्याला २० पुरस्कार प्राप्त झाले तर चालू वर्षी आत्तापर्यंत १२ पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती श्री. परुळेकर यांनी यावेळी दिली. स्वच्छतेबाबतचा पुरस्कारही राज्याला मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.