धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी केंद्राशी संपर्क

0
88

>> महादेव नाईक यांची माहिती

 

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा याविषयी बोलणी करण्यासाठी आम्ही केंद्राकडे संपर्क साधलेला आहे असे समाजकल्याण मंत्री महादेव नाईक यांनी काल या खात्यावरील मागण्यांना उत्तर देताना सांगितले.
पारंपरिक उद्योगात असलेल्या व वयाची ५० वर्षे पूर्ण केलल्यांना आर्थिक मदत देण्याची योजना समाज कल्याण कात्याने सुरू केलेली आहे. या योजनेखाली मोटारसायकल पायलट व रिक्षाचालक यांना प्रत्येक २ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, असे श्री. नाईक म्हणाले. अन्य पारंपरिक उद्योगात असलेल्यांना मासिक १ हजार रुपये देण्यात येत असून या योजनेचा आत्तापर्यंत ४५० लोकांनी लाभ घेतलेला आहे अशी माहिती त्यांनी पुढे दिली. धनगर समाजातील लोकांना विविध कल्याणकारी योजनांद्वारे दोन कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे, असे ते पुढे म्हणाले. सहकार खात्यावरील मागण्यांना उत्तर देतानामंत्री नाईक म्हणाले की, ज्या सहकारी बँका व क्रेडिट सोसायटींनी अंदाधुंद कारभार चालवला आहे, त्याची चौकशी होणार आहे. काही सोसायट्यांचे सात आठ वर्षांपर्यंत ऑडिटही होत नाही. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. सहकार क्षेत्रात काम करणार्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सहकार पुरस्कारांच्या रकमेतही सरकारने वाढ केली असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात सुमूल डेअरीचा प्रवेश झालेला असला तरीही सरकारने गोवा डेअरीचे हित जपण्यावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे नाईक यांनी सांगितले. सुमूल आपले दूध गोव्याबाहेर पाठवत नसल्याचे ते म्हणाले. गोव्याला साडेतीन लाख लीटर एवढ्या दुधाची गरज आहे मात्र प्रत्यक्षात येथ े१ लाख ४४ हजार लीटर दुधाचे उत्पादन होत असल्याची माहिती श्री. नाईक यांनी यावेळी दिली.