म्हादईच्या क्षारतेचे शास्त्रज्ञांनी घेतले नमुने

0
122

>> इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीकडून १३ ठिकाणी तपासणी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. राधाकृष्णन यांनी काल शुक्रवारी गोव्याला भेट दिली व म्हादईच्या उपनद्यांच्या पाण्याचे १३ ठिकाणी नमुने घेतले. म्हादई नदीच्या पाण्याच्या क्षारतेची तपासणी करण्यासाठी हे नमुने विविध ठिकाणाहून घेतले गेले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाला पत्र लिहून कर्नाटकच्या धरण प्रकल्प व पाणी वळवल्याचे गंभीर परिणाम गोव्याच्या पर्यावरणावर होण्याची भीती व्यक्त केली होती.

त्याची दखल घेताना केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आयआयएचच्या शास्त्रज्ञांची नियुक्ती करत म्हादईच्या पाण्याच्या क्षारतेची तपासणी सुरू केली. गेल्या वर्षी पावसाळ्यात या शास्त्रज्ञांनी गोव्याला भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले होते.

त्यावेळी त्यांनी उन्हाळ्यात पाण्याचे नमुने घेणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानुसार आयआयएचची टीम काल गोव्यात आली होती.
काल शास्त्रज्ञ डॉ. गोपालकृष्ण न तसेच गोवा जलसिंचन खात्याचे अभियंते दिलीप नाईक, आग्नेलो फर्नांडिस यांच्या उपस्थितीत म्हादईच्या पाण्याचे एकूण १३ ठिकाणीचे नमुने गोळा केले आहेत.

या संदर्भात बोलताना डॉ. गोपालकृष्णन यांनी, आम्ही दोन्ही हंगामातील पाण्याचे नमुने घेतलेले असून या दोन्हींचा तपशीलवार अभ्यास करून आमचा अहवाल केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाला सादर करणार असल्याचे स्पष्ट केले.
सायंकाळी या संदर्भात गोव्यातील अधिकारी वर्गाची उच्चस्तरीय बैठक झाली व सविस्तर आढावा घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली.

कर्नाटकला १३ टीएमसी फिट पाणी वापरण्यास परवानगी असली तरी त्याचे गंभीर पर्यावरणीय व सामाजिक दुष्परिणाम गोव्यावर होणार आहेत असे पर्यावरण कार्यकर्ते राजेेंद्र केरकर यांनी सांगितले.