दहावी परीक्षा रद्दचा निर्णय योग्यच

0
142
  • अनिल पै

सध्या राज्य दुसर्‍या लाटेचा सामना करत असून, त्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने जोखीम न पत्करता राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावीच्या मुलांची व त्यांच्या पालकांची मानसिक स्थितीचा विचार केल्यास ते परीक्षेच्या दबावाखाली होते. या निर्णयामुळे त्यांच्यावरील मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत झाली आहे.

कोविड महामारीचा उद्रेक आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे बहुतांश पालक, शिक्षक व समाजांतील विविध घटकांकडून स्वागत देखील करण्यात आले. मात्र हुशार विद्यार्थी व त्यांचे पालक या निर्णयाने काहीसे दुःखी झाले; मात्र सद्यस्थिती पाहता सरकारने योग्य निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल.

दहावीची व बारावीची परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे टप्पे असले, तरी दहावीतील बहुतांश विद्यार्थी घोकंपट्टी करण्यात धन्यता मानतात. बारावी विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळविण्याचे लक्ष ठेवून असतात. कारण व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना अखिल भारतीय प्रवेश परीक्षेची (नेट) तयारी करावी लागते. ‘नेट’ परीक्षा वा प्रवेशपूर्व अभ्यासक्रमाची तयारी करणे म्हणजे ही विद्यार्थ्यांच्या सर्वंकष ज्ञानाची परीक्षा होत असते.

गेल्या वर्षी दहावीची परीक्षा एप्रिल महिन्यात न घेता कोविड महामारीमुळे जून महिन्यात घ्याव्या लागल्या होत्या. त्यावेळी बहुतांश पालकांनी परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करावा, असे मत व्यक्त केले होते. मात्र सरकारने पूर्ण काळजी घेऊन आणि प्रत्येक विद्यालयात परीक्षा केंद्र स्थापन करून दहावीची परीक्षा सुरळीतपणे घेतल्या होत्या.

गेल्या वर्षाची तुलना करता यावर्षी कोरोना महामारीने अधिक रौद्ररूप धारण करून अडीच हजार निरपराध लोकांचे बळी घेतले. तसेच हजारो लोक कोरोनाबाधित झाले. सध्या राज्य दुसर्‍या लाटेचा सामना करत असून, त्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने जोखीम न पत्करता राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावीच्या मुलांची व त्यांच्या पालकांची मानसिक स्थितीचा विचार केल्यास ते परीक्षेच्या दबावाखाली होते. या निर्णयामुळे त्यांच्यावरील मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत झाली आहे.
यंदा दहावीच्या वर्गातील मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे भाग पडले. काही शाळांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून शिकवण्या दिल्या. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून विज्ञान विषयांची प्रात्यक्षिके घेताना शिक्षकांच्या नाकीनऊ आले. गेले वर्षभर शिक्षक, विद्यार्थी व पालक दबावाखाली होते. विद्यार्थ्यांना अधिक वेळ घरात बसूनच अभ्यास करावा लागला. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, शारीरिक व्यायाम, क्रीडा स्पर्धा यापासून दूर राहावे लागले. जे विद्यार्थी एकमेकांना भेटून मोकळेपणाने चर्चा करीत, खेळत बागडत ते सर्व बंद झाले होते. त्यात दहावीच्या परीक्षेचा दबाब. कित्येक विद्यार्थ्यांना मानसिक ताणतणावाखाली राहावे लागले, तर मुलांची ही अवस्था पाहून त्यांचे आई-वडील देखील चिंतेत होते. माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने, समाजाचा तो अविभक्त घटक असतो. त्याला आई-वडिलांप्रमाणे मित्रांची साथसंगत हवी असते. त्यांच्यासोबत वेळ घालवणे, खेळणे-बागडणे, गप्पागोष्टी या बाबी देखील मुलांसाठी महत्त्वाच्या असतात. मात्र गेल्या १५ महिन्यांपासून मुले या सर्व गोष्टींपासून वंचित राहिली. त्यामुळे काही मुले एकलकोंडी बनली.
पहिलीपासून बारावीपर्यंतच्या कित्येक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलताना त्यांच्यावरील मानसिक ताणतणाव प्रकर्षाने जाणवला. विशेषत: नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना समजूत घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या मनावरील ताणतणावात वाढ आणि समाधान, आनंद नाहीसा झाल्याचे जाणवले. ऑनलाईन शिकवणीमुळे तेवढ्या वेळेपुरताच शिक्षकांशी संपर्क होऊ लागला. शिक्षक-शिक्षिका विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास वर्गात प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करीत असत. मात्र ऑनलाईन शिकवणीनंतर विद्यार्थ्यांना विषयाशी निगडित शंका विचारणे कठीण झाले, शिक्षकांचे मार्गदर्शने घेणे दुरापास्त झाले, त्यात परीक्षांचा दबाब.

आजचे शिक्षण ज्ञानवर्धनापेक्षा परीक्षांसाठी दिले जाणारे शिक्षण बनले आहे. परीक्षांवरुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे, बुद्धीचे मूल्यमापन केले जाते, ते चुकीचे आहे. काही मुले अभ्यासांत मागे असतात; पण ती मुले खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला, हस्तकला व इतर क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. या गुणांचाही परीक्षेच्या वेळी विचार केल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू शकते. शिक्षण हे सर्वांगीण गुणांचा विकास करणारे असते. मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांची विकास केल्यास ते भावी जीवनात यशस्वी होऊ शकतात. मात्र विद्यमान शिक्षण पद्धतीत ही बाब दिसून येत नाही.

केंद्र सरकारने आता तयार केलेल्या नवीन शिक्षण पद्धतीत या गुणांकडे जास्त लक्ष दिलेले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना, त्यांच्या कला-कौशल्याला वाव देणारे नवे शैक्षणिक धोरण आहे. उच्च प्राथमिक स्तरावर शिक्षण घेताना त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर दिला आहे. आजचे आपले शिक्षण चाकोरीबद्ध बनले आहे. जीवनाभिमुख आणि औद्योगिक क्षेत्राशी निगडित आयटीआय शिक्षण क्रमाकडे जाण्यास विद्यार्थ्यांना लाज वाटते, तेथे न जाता कला, वाणिज्य क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीची वाट पहात अनेक वर्षे बेरोजगार राहतात; पण आज प्लंबर, मेकॅनिक यासारख्या कौशल्यधारक तरुणांची आवश्यकता आहे. मात्र आयटीआय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल नसतो. काहीजण प्रशिक्षण घेतात, ते आखाती देशात नोकर्‍या मिळविण्याच्या हेतूने. आता सरकारने परीक्षा रद्द करून जो निर्णय घेतला आहे, त्यातून अशा विद्यार्थ्यांनी बोध घेऊन स्वावलंबी बनण्यासाठी आयटीआय अभ्यासक्रमाकडे वळल्यास त्यांच्यासाठी फायदाचे ठरेल.

काही दिवसांपूर्वी गोवा वैद्यकीय इस्पितळात ट्रॅक्टर चालविणारे चालक कोल्हापुरांतून आणावे लागले, सरकारी रुग्णवाहिकेतील चालक बिगरगोमंतकीय आहेत. मग शिक्षणाचा उपयोग तो काय? पदव्या मिळवून बेरोजगार राहून काय साध्य होणार आहे? कोणत्याही कामाची लाज वाटण्याचे कारण नाही. कोणतेच काम छोटे वा मोठे नसते. परिश्रमातून आपण त्याला प्रतिष्ठा मिळवून देतो.

आता दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचे सरकारने जाहीर केले असले, तरी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असे मानणे योग्य नाही. या आधी शाळेत दोन लेखी परीक्षा घेतल्या, विज्ञान विषयाची प्रात्यक्षिके, स्वाध्याय, प्रकल्प तयार केले आणि ते गुण शालांत मंडळाकडे पाठविले आहेत. त्या गुणांच्या सरासरीवर निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निकाल शालांत मंडळ जाहीर करणार असून, शाळांनी पाठविलेल्या गुणांवर आधारित असणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असे नाही. गेल्या वर्षी ९२ टक्के निकाल लागला होता, तसा यावर्षी ही लागू शकतो.

विज्ञान विषयाची प्रात्यक्षिके, प्रकल्प व लेखी परीक्षा मिळून ३५ गुण तसेच इतर विषयांची लेखी परीक्षा, शारीरिक शिक्षण विषयाच्या गुणांची सरासरी काढण्यात येणार आहे. आपण वर्षभर अभ्यास करतो आणि अडीच-तीन तासांत परीक्षा देतो. ती लेखी परीक्षा व अंतर्गत गुणांवरुन निकाल जाहीर केला जातो. आता शालांत मंडळाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरणार नाही. मात्र विशेष श्रेणीत गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे थोडे नुकसान होईल. त्यांनी दिवसरात्र जागून अभ्यास केला. त्यांची या निर्णयाने निराशा झाली आहे; पण परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज आहे.

हिरा हा अंधारात देखील चमकतो, तसा बुद्धिमान विद्यार्थी दहावीप्रमाणे बारावी परीक्षेतही चमकू शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांना अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेताना विज्ञान व गणित विषयावर आधारित प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. तेथे मिळालेल्या गुणांच्या आधारे अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांनाच विज्ञान शाखेत प्रवेश मिळेल, हे नक्की.

काहीचे परीक्षा घेणे योग्य असल्याचे मत असले, तरी आपण हुशार विद्यार्थ्यांबरोबर सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा. ते विद्यार्थी मानसिक तणावाखाली होते. परीक्षा रद्दच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्यात, याबाबत दोन विचारप्रवाह असले तरी सर्वसाधारणपणे सर्व मुलांच्या सुरक्षेचा विचार करता कोविड महामारीच्या काळात दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयाने बहुतांश मुले व पालक समाधानी आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरेल.