मोपाची प्रक्रिया लवकर पूर्ण करणार : मुख्यमंत्री

0
80

मोपा जनसुनावणीवेळी बहुसंख्य जनसमुदायाच्या पाठिंब्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा धडा मिळाला आहे. नियोजित १३ वा आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ गोव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन मोपाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. मोरजी येथे एका देवस्थानच्या कार्यक्रमाला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
रोजगाराभिमुख प्रकल्पांना आपला नेहमीच पाठिंबा राहणार असून गोमंतकीयांनी मोपा विमानतळ प्रकल्पाच्या मागे राहावे असे आवाहन त्यांनी केले. जनसुनावणीला उपस्थित राहून मोठ्या संख्येने मोपाचे समर्थन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले आहे.
या प्रकल्पाला जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवण्यात येणार असून सर्वांना न्याय मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एका प्रश्‍नावर बोलताना म्हणाले.
दरम्यान, जनसुनावणीवेळी मोपाला कट्टर विरोध करणार्‍या कांबळी गटाची सुनावणीनंतर पीपल फॉर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट संघटनेने भेट घेतली असून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दि. ८ रोजी संध्याकाळी सुकेकुळण येथे संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे.