मुसळधार पावसाने राज्याला झोडपले

0
68

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दिवसभरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. उत्तर व दक्षिण गोव्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला असून, लगतच्या परिसराला धोका निर्माण झाला आहे. राजधानी पणजीत तर पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. शहरांतील सर्वच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली. राज्यात काही ठिकाणी झाडे, दरड कोसळण्याच्या, तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. फोंड्यातील दुर्भाट येथे घराची भिंत अंगावर पडून एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यावेळी पावसाचे सरासरी प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे राज्यातील शेतीची कामे देखील खोळंबली होती. तसेच उकाड्यातही वाढ झाली होती. आता दमदार पाऊस होत असल्याने शेतीकामांना पुन्हा वेग येणार आहे.

पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून, आणखी तीन ते चार दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक (५२.७५ इंच) पूर्ण केले आहे. तसेच, पावसाच्या सरासरी प्रमाणात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धरणांच्या पाणी पातळीत वाढ
राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. साळावली धरण तुडूंब भरले असून, काल सकाळपासून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तिळारी आणि अंजुणे धरण क्षेत्रातही पाऊस बरसला असून, या धरणातून सध्या नियंत्रित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरड कोसळल्याने धोका
काणकोण तालुक्यातील आगस-माशे येथे रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यानंतर प्रशासनाने ही दरड हटवली. मुरगाव तालुक्यातील रुमडाचाळ भागातील डोंगर पठारावरील दरड कोसळल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला आहे.

झाडांची पडझड अन् घरांचे नुकसान
मडगाव शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळली, तर कित्येक ठिकाणी रस्त्यांवर पाणी भरल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला. सुरावली, मडगाव येथील आनाफोंत गार्डनजवळ रस्त्यावर दोन झाडे पडली, तर नावेली येथे एका घरावर माड पडून नुकसान झाले. डिचोली तालुक्यातील कासारपाल येथील राजेंद्र परवार यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. पेडणे तालुक्यातील आश्वे-मांद्रे येथे रस्त्याच्या बाजूची नव्याने बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे.

राज्यातील अनेक नद्यांना पूर
जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नद्यांलगतच्या परिसराला धोका निर्माण झाला आहे. अस्नोडा पार नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले. डिचोली, साखळी, वाळवंटी, पार-घोटेली या नद्यांना पूर आला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. साळ येथील शापोरा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. सत्तरीत म्हादई नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तसेच वेळूस नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पणजीतील महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली

पणजी शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले. पाटो येथे जाणार्‍या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच शहरातील १८ जून रस्ता, दयानंद बांदोडकर मार्ग, पणजीतील कदंब स्थानकासमोरील रस्ता यासह विविध भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. त्यातून वाट काढताना वाहनचालकांची विशेषत: दुचाकीचालकांची दमछाक झाली, तर काहींची वाहने बंद पडली.

पणजीत सर्वाधिक पाऊस
चोवीस तासांत पणजी येथे सर्वाधिक ४.२५ इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे ४.२१ इंच, जुने गोवे येथे ३.७७ इंच, काणकोण येथे ३.७० इंच, पेडणे येथे ३.३४ इंच, दाबोळी येथे ३.११ इंच, मुरगाव येथे ३.०१ इंच, साखळी येथे २.३७ इंच, वाळपई येथे २.१८ इंच, केपे येथे २.२६ इंच, सांगे येथे १.९८ इंच, मडगाव येथे १.६६ इंच पावसाची नोंद झाली.

घराची भिंत अंगावर
पडून महिला जखमी

दुर्भाट पंचायत क्षेत्रातील देसाईभाट-आडपई येथे जोरदार पावसामुळे काल एका बंद घराची भिंत दुसर्‍या घरावर कोसळली. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.