ढवळीकर बंधूंची केजरीवालांशी चर्चा

0
61

>> सुदिन ढवळीकर यांच्याकडून सदिच्छा भेटीचे कारण

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल काल गोव्यात दाखल झाले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल संध्याकाळी केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले; मात्र ही भेट युतीसाठी नव्हती, तर ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्टीकरण सुदिन ढवळीकर यांनी दिले.

अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आले असून, काल दुपारी ३ वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आपच्या प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केली होती.

काल सायंकाळी ढवळीकर बंधूनी केजरीवाल यांची भेट घेत त्यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी कित्येक महिन्यापासून प्रयत्न सुरू होता. नवी दिल्ली येथे केजरीवाल यांच्याशी भेटीसाठी जाऊ शकलो नाही. त्यामुळे केजरीवाल गोव्यात आल्याने त्यांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील आयाराम गयाराम व्यक्तींना धडा शिकविण्यासाठी जे लोक पुढे येतात, त्यांना मगोचा पाठिंबा राहील. मगो निवडणुकीविषयक महत्वाचे निर्णय ऑगस्टनंतर घेणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

युतीबाबत चर्चा नाही : ढवळीकर
या भेटीत निवडणूक युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केजरीवाल यांनी दिल्लीत केलेल्या विकासकामांवर चर्चा झाली. तसेच आपण मंत्रिपदी असताना बांधकाम खात्यामार्फत केलेल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.