मिरामार किनार्‍याला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

0
125

>> ब्ल्यू फ्लॅग अंतर्गत ९ कोटी खर्चून होणार विकास

मिरामार समुद्रकिनार्‍यावर ब्ल्यू फ्लॅग अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुमारे ९.२८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
देशातील १३ समुद्र किनार्‍यांचा ब्ल्यू फ्लॅग अंतर्गत विकास करण्यात येणार आहे. त्यात गोव्यातील मिरामार किनार्‍याचा समावेश होत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सोसायटी ऑङ्ग इंटेग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने मिरामार किनार्‍याच्या विकासाची निविदा राष्ट्रीय पातळीवर जारी केली आहे. ब्ल्यू प्लॅग अर्तंगत किनार्‍यावर पर्यावरण अनुकूल, स्वच्छ आणि पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

मिरामार किनार्‍यावर पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साधन सुविधा निर्माण करण्यासाठी ४.५३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुरक्षा सुविधा निर्माण करण्यासाठी १.४३ कोटी रुपये आणि पर्यावरण अनुकूल सुविधांसाठी ३.२८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

राजधानीमधील मिरामार समुद्र किनार्‍याला देशी व विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या ठिकाणी आवश्यक साधन सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. ब्ल्यू फ्लॅग मानकांनुसार किनार्‍याला पर्यावरण आणि पर्यटन अनुकूल बनविण्यासाठी प्लॅस्टिकमूक्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी किनार्‍यावर कचरा व्यवस्थापन पध्दती तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
समुद्र किनार्‍यावर साधन सुविधाअर्तंगत प्रसाधनगृहे, पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. किनार्‍यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टेहेळही यंत्रणा आदी व्यवस्था केली जाणार आहे. किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यावरणीय दृष्टिकोनातून यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे.