माशेलचा चिखलकाला ः चिखलातील धुमशान

0
28
  • यशवंत (सुरेंद्र) शेट्ये
    (खोर्ली- म्हापसा)

गोव्याचे माशेलात दिसून येणारे हे सांस्कृतिक संचित म्हणा, वैभव म्हणा, जोपासले जायला हवे. चिखलकाला हा सरकारी पातळीवरून खेळवला जाणारा खेळ म्हणून जपला जायला हवा. चिखलकाल्यातली नजाकत खरे तर पाहूनच अजमावी.

जरी अंगावर उडाला तरी शिसारी येणार्‍या चिखलात गडबडा लोळणे, त्यात विविध खेळ खेळणे, अंग चिखलात माखलेले असताना आनंदात रममाण होणे कसे काय जमते बुवा यांना? असे माशेलचा सुप्रसिद्ध चिखलकाला पाहताना वाटून गेले. एवढी वर्षे चिखलकाल्याबद्दल ऐकून माहीत होते. वर्तमानपत्रांत झलक पाहायला मिळायची, पाहून इच्छा व्हायची की एक दिवस प्रत्यक्ष पाहायला हवा चिखलकाला. असे क्षणिक वाटायचे व परत विसरून जायचो. यंदा मात्र निवृत्तीनंतर मोकळाच असल्याने वृत्तपत्रात बातमी वाचून इच्छा चाळवली गेली, चिखलकाल्यादिवशी प्रबळ झाली आणि कुणाची संगत मिळाली नसली तरी एकट्याने माशेल गाठले.

बघतो तर देवळांचा तो परिसर गर्दीने ङ्गुलून गेलेला. बरोबर वेळेवर काळ्या चड्डीतला विठ्ठलभक्तांचा जथ्था- लहानथोर सगळे- मुखी विठ्ठलनामाचा जयघोष करीत समोरच्या मैदानात जमले. समोरच्या देवळात जाऊन पटांगणाला वळसा घालून वाद्यांच्या अन् नामाच्या गजरात प्रदक्षिणा घालत मधोमध असलेल्या पिंपळाच्या पाराभोवती जमले. महिला, मुलीही या इथे होत्या. सगळ्यांना त्या तिथे केळी तसेच लाडू मुरचोळीचा प्रसाद वाटण्यात आला. ङ्गेकाङ्गेकीतून तो पकडताना मजा आली. काही खाली पडत असला तरी त्यातही मजा असते. प्रसादवाटप व लगेच भक्षण झाल्यावर मग खरी चिखलकाल्याला सुरुवात झाली.

एव्हाना सगळ्यांच्या अंगात खुमारी चढलेली जाणवत होती. नामघोषात मैदानात थोडा चिखल तुडवल्यावर मग खरी खेळाला सुरुवात झाली. खेळणार्‍यांएवढेच माझ्यासारखे बघणारेही पुष्कळ होते. महिलावर्गही भरपूर होता. दृश्ये कॅमेर्‍यात बंद करणारेही पुष्कळ होते. त्यात काही व्यावसायिकही होते. आणि मग चिखलातील धुमशान सुरू झाले. एकमेकाला धरून वर उचलून एका जागी कोपर्‍यात जिथे बराच चिखल व पाणी जमलेले तिथे नेऊन धडाम्‌दिशी खाली पाडून वरून त्याच्यावर पायांद्वारे अजून तुंबळ चिखलाची ङ्गेकाङ्गेकी करत त्यांची चाललेली मजा अङ्गलातून होती.
सगळे एव्हाना चिखलाने परिपूर्ण माखलेले. कुठला कोण ओळख पटणे मुश्किल होते. सगळ्यांच्या काळ्या चड्‌ड्या क्षणार्धात चिखलात माखल्या जाऊन चिखलाच्या रंगात परावर्तित झालेल्या. सगळे अंगच चिखलाने माखलेले आणि जणू वारे अंगात संचारल्यागत सगळे चिखलात धुमाकूळ घालायला लागलेले. एकेकाचा चिखलात बुडवण्याचा नंबर लागताना त्याची त्यांच्या पकडीतून सुटण्याची धडपड. मग वरून चिखलात खाली पडतानाची धमाल बघणार्‍यांनाही जाम मजा आणत होती. एकेकाचा जणू गणपती बाप्पा मोरया होत होता. चिखलात पडून चिखलाशी एकरूप झालेला ज्या वेळेस उठत होता त्या वेळेस ‘नायक’ सिनेमातल्या अनिल कपूरची आठवण करून देत होता.
काही बच्चे मंडळीही हा चिखलातला खेळ आपल्यापरीने खेळताना दिसत होती. चिखलमय सगळे एकमेकांवर चिखलङ्गेक करून सगळेच ‘चिखलीफिकेशन’चे साम्राज्य त्या तिथे अवतरलेले!
मग खेळात बदलही पाहायला मिळाले. काहीजण गळ्यात हार घातलेले मुखिया खेळबदल सुचवत होते. त्या खेळांची नावेही होती. एकच त्या धुमश्चक्रीत कानावर पडलेले नाव म्हणजे धनगरांचा खेळ होय. यात एका धिप्पाड गड्याला बिलगून, त्याच्या पायाला काही बछडे बनून धरून ठेवायचे. त्यांना मग बाकीचे ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. धरून ठेवलेला धनगर त्यांना हातातल्या हाराने पळवून लावतो, असा मजेशीर खेळ झाला.

नंतर समोरासमोर रांगेत उभे राहून एकमेकांचे हात वर पकडून धरून त्याखालून छोटे शिवाशिवी खेळले. कुणी पाच-सहा जणांना एकमेकांचे तळवे जुळवलेल्या अवस्थेत गोल ङ्गिरवत होते, तर दोघांचे डोळे ङ्गडक्याने बंद करून टाळ वाजवणार्‍याला आवाजाच्या रोखाने जाऊन पकडण्याचा खेळ झाला.

मग शेवटी दहीहंडी ङ्गोडताना रचतात तसे मनोरेही रचले गेले. मनोरा धाडकन चिखलात कोसळताना पडणारे बोंबलायचे, तर आम्हा बघणार्‍यांना त्यांचे खाली येणे आनंद देत होते. नाही तरी कुणी रस्त्यावर केळीच्या सालीवरून म्हणा, कशावरून तरी पडला की प्रथम आपल्याला त्याची ङ्गजिती पाहून खुदकन हसू येतेच की नाही? मग भले आम्ही त्याला उचलायला जातोही. अशीच चिखलातल्या खेळांची ही गंमत भारी वाटली. बघतानाच केवढा आनंद झाला तर खेळणार्‍यांना तो शतपटीने झाला असेल यात शंका नाही!

चिखलकाल्याची ही गंमत चांगली तीन तास चाललेली. यंदा पाऊसही भरपूर झाल्याने चिखलही आयताच तुडवायला मिळाला. पाऊस नसल्यास पाणी ओतून चिखल तयार करतात असे ऐकले होते. ते काही असो, पण माशेलकरांची ही चिखलकाल्याची परंपरा डिजिटल जमान्यातही माशेलकरांनी जपून ठेवलेली आहे.
माशेलात गणेशतुर्थीला देखाव्यांची रेलचेल डोळ्यांचे पारणे ङ्गेडणारी असते. एकवीस दिवसांची पर्वणी असते अन् मग सारा गोवा माशेलात देखावे पाहण्यासाठी एकवटतो. अरुंद रस्ते असले तरी वाहतूक कोंडीचा सामना करीत पायी ङ्गिरत ते देखावे पाहण्यातली खुमारी काही औरच असते. माशेल गाव कलाकारांची खाण म्हणूनच तर ओळखला जातो. एवढी सगळी देवळे माशेल गावात एकवटली आहेत. पाहावी तितकी थोडीच. देवळाय म्हणून एक वाडा पण तिथे आहे. माशेलात शिरताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसून येणारे निसर्गसौंदर्य रमणीय भासते. माशेलात केवढी तरी नाटके रंगतात त्यालाही तोड नाही. गोव्याचे माशेलात दिसून येणारे हे सांस्कृतिक संचित म्हणा, वैभव म्हणा, जोपासले जायला हवे. चिखलकाला हा सरकारी पातळीवरून खेळवला जाणारा खेळ म्हणून जपला जायला हवा. चिखलकाल्यातली नजाकत खरे तर पाहूनच अजमावी. तरीही चिखलकाला पाहताना सर्वांची साधणारी तल्लीनता… ते एकप्रकारे मातीशी तद्रूप होणे म्हणा, तादात्म्य पावणे म्हणा, शब्दांतून मांडण्याचा एक अल्पसा माझ्याकडून हा प्रयत्न.