पाणीच पाणी चोहीकडे…

0
25
  • – प्रतिभा वासुदेव कारंजकर

पावसाळा नेमेची येतो आहे… पण आजकाल त्याच्याबरोबर येणारा पूर, गावच्या गावे पाण्याखाली जाणे, घरे-झाडे-दरडी कोसळणे, धरणे भरून वाहू लागणे, ठिकठिकाणी पाणी तुंबून अडथळे निर्माण होणे हेही नित्यनेमाचे झाले आहे. याला जबाबदार आपण निसर्गालाच धरू शकत नाही; त्याला बर्‍याच प्रमाणात माणूसही जबाबदार असतो!

पावसाळा नेमेची येतो आहे… पण आजकाल त्याच्याबरोबर येणारा पूर, गावच्या गावे पाण्याखाली जाणे, घरे-झाडे-दरडी कोसळणे, धरणे भरून वाहू लागणे, ठिकठिकाणी पाणी तुंबून अडथळे निर्माण होणे हेही नित्यनेमाचे झाले आहे. याला जबाबदार आपण निसर्गालाच धरू शकत नाही; त्याला बर्‍याच प्रमाणात माणूसही जबाबदार असतो! दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस थोडी हुलकावणी देतच आला. पण जेव्हा आपल्या रूपात आला तेव्हा तो दमदार आणि धुवाधार कोसळू लागला. हवामान खात्याने सावध केलं की सगळेच खडबडून जागे होतात. तशी यंदाही उशिराच जाग आल्याने नेहमीप्रमाणे शहराच्या सखल भागात पाणी तुंबले. दीड-दोन तास पडलेल्या तुङ्गान पावसाने लगेच पूरसदृश स्थिती निर्माण झाली. ठिकठिकाणची धरणे ओसंडून वाहू लागली…
पूर्वीही तो असाच यायचा. पण तेव्हा इतके प्रश्‍न निर्माण होत नसत. सध्या लोकसंख्या भरमसाठ वाढतेय, कचरा व्यवस्थापन नीट होत नाहीय, प्लास्टिकचा वापर वाढलाय… या सगळ्या गोष्टी पाण्याचा योग्य निचरा न होण्यास कारणीभूत आहेत. पाऊस पाणी तर संगळ्यांनाच हवं असतं. ते तर जीवनच आहे. पण त्याच्या येण्याने होणारी तारांबळ, गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक तजवीज मात्र आधीपासूनच होत नाही.

शहरभर साचलेल्या तुडुंब पाण्यावर वर्तमानपत्रांची पाने भरून जातात. पर्जन्यराजाची दमदार सलामी, मुसळधार पावसाने झोडपले, हवामान खात्याचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी, कामाला जाणार्‍यांचे हाल, खड्डेमय रस्ते, कोसळणारी झाडे, होणारे अपघात… यांच्या बातम्यांनी कॉलम भरू लागतात. टीव्हीवरही त्याचे रौद्र रूप दाखवण्याची चढाओढ सुरू होते.

कमी वेळात जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाने अनेक घरांमध्ये पाणी घुसते. घरे, मंदिरे, शाळा, विजेच्या तारा, रस्ते यांवर झाडे उन्मळून पडल्याने मोठी हानी होते. अपघात घडतात. कुणाचा जीवही जातो. दरवर्षी गोव्यात पावसाळ्याच्या दिवसांत अशा घटना वारंवार घडत असतात. पण अशी धोकादायक झाडे पावसाळ्या अगोदरच कापून टाकण्याचे भान मात्र आपल्याला राहत नाही. पावसाळ्यापूर्वी निदान महिना- दीड महिना आधी तरी हे काम हाती घेतले पाहिजे. आता हवामानातर्फे पावसाचा अंदाज अचूक वर्तवला जातो, त्यातून येणार्‍या संकटापासून काय-काय खबरदारी घ्यावी लागेल हे सांगितले जाते. मग आपण सरकारकडे पाहू लागतो. हे सर्वच काम सरकारी यंत्रणेवर सोपवून चालणार नाही. प्रत्येकाने आपल्याकडून होईल तशी कामे पार पाडली पाहिजेत. कारण यात नुकसान होते ते तुमचेच असते!
लहरीप्रमाणे पडणारा पाऊस जोरदार कोसळू लागला की सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागते. कारण रस्त्याच्या कडेची गटारे वेळेवर साङ्ग न केल्याने पाणी जायला जागाच मिळत नाही. गटारे तुंबू लागतात. त्यातलं घाणेरडं, दूषित पाणी रस्त्यावरच्या पाण्यात मिसळून दुर्गंधी येऊ लागते. मग सरकारी यंत्रणा जागी होते. पावसाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायचे आदेश देते. पण आता इतक्या जोराच्या पावसात काहीही करणे अशक्य होऊन जाते. कधीकधी तर गटारे-नाले आधीच स्वच्छ केले जातात आणि आतला कचरा रस्त्यावर येतो. तो उचलून टाकायची जबाबदारी दुसर्‍यावर टाकली जाते. तोपर्यंत पोचलेल्या पावसाने तो कचरा पुन्हा गटारात, नाहीतर रस्त्यावर वाहून जातो. कागदोपत्री मात्र गटारे साङ्ग केल्याची नोंद असते, त्याचा काहीही उपयोग मात्र झालेला नसतो.

जूनमध्ये सुरू झालेला पाऊस आपल्याकडे दिवाळीपर्यंत राहायला येतो. त्यामुळे कधी वादळवारे, कधी अतिवृष्टी तर कधी बारीक रिमझिम असा त्याचा प्रवास चालूच असतो. कधीकधी ठराविक प्रमाणापेक्षा किंवा कालावधीपेक्षा जास्तच पाऊस पडतो. त्यातील बरेचसे पाणी समुद्रात, खाडीत जाऊन मिळते म्हणून बरे आहे, नाहीतर डोंगराचे उतार, उथळ नदीपात्रे, सखल भागात वसलेली गावे यांना पुराचा तडाखा बसल्याशिवाय राहिला नसता. अशा अतिवृष्टीचा सगळ्यात जास्त ङ्गटका बसतो तो शेतकर्‍यांना. शेतात पाणी प्रमाणापेक्षा जास्त भरलं गेलं की पिकाचं नुकसान होतं, ते कुजून जातं. अशावेळी नदीकाठच्या घरांनाही धोका निर्माण होतो. त्यांना जीव वाचवण्यासाठी स्थलांतर करावे लागते. जनजीवन विस्कळीत होऊन जाते. पाणीच पाणी सगळीकडे दिसत असल्याने त्यातून वाट काढणे मुश्किल होऊन जाते. लोकांचं घराबाहेर पडणं अवघड होऊन जातं. कुठे कुठे दुकानांत पाणी शिरल्याने मालाची नुकसानी होते. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ते बंद होतात. घरावर झाडे कोसळून मृत्यू ओढवतात. जास्त दिवस साचलेल्या पाण्यात किडे-डास यांची पैदास होऊन ती आजाराला आमंत्रण देते. हे सगळं घडायला कारणीभूत ठरते ती अतिवृष्टी; आणि या अतिवृष्टीला कारण म्हणजे हवामानातला बदल. आणि ही आपल्या राज्यापुरतीच नाही तर देशाच्या अनेक राज्यांत जलमय परिस्थिती उद्भवलेली दिसते.
धरणाला धोका पोचू नये म्हणून कधीकधी ओव्हर फ्लो व्हायला लागलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे तो ज्या नदीतून सोडला जातो त्या नदीकाठच्या घरांना, शेतीला धोका निर्माण होतो. म्हणून त्यांना अगोदरच सतर्कतेचा इशारा दिला गेला पाहिजे म्हणजे स्थलांतर करायला पुरेसा वेळ मिळेल.
दरवर्षीच्या या जलमय परिस्थितीला तोंड देण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली गेली पाहिजे. पर्जन्य मापकयंत्र बसवणे, पूररेषांची निश्चिती करणे, त्या परिसरातील बांधकामे हटवणे आणि नव्याने होऊ न देणे, अगोदरचा पूर स्थितीचा अहवाल लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरून आपत्तीप्रवण प्रदेशचा नकाशा तयार करणे, धरणातील विसर्ग कुठे कसा केला जाईल त्याचा आधी लोकांना अंदाज देणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत.
एकोणीस साली आलेला कोल्हापूरचा पूर, दरवर्षी उत्तराखंडात होणारी ढगङ्गुटी, नाशिकचं यंदाचं पाणी भरल्याचं चित्र, साखळीत दरवर्षी शिरणारं वाळवंटी नदीचं पाणी, काही वर्षांपूर्वीची भयानक त्सुनामी, नद्यांना येणारे पूर हे असं पाण्याचं रौद्र रूप पाहिलं की निसर्गापुढे आपण कीती लहान आहोत हे कळतं. ही आपत्ती निस्तारण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते ते प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलून केले पाहिजेत. माणसाने केलेले प्रदूषण, वृक्षतोड, डोंगर कापणी, प्लास्टिकचा अतोनात वापर यांचं हे ङ्गलित आहे. त्यासाठी या वर्षी जे नुकसान झाले ते पुढच्या वर्षी होऊ नये म्हणून आतापासूनच उपाययोजनेला सुरवात केली पाहिजे.