गोव्यातही चमत्कार?

0
24

येत्या सोमवारी १८ जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू नुकत्याच गोवा भेटीवर येऊन गेल्या. या निवडणुकीत गोव्यात मुर्मू यांना भाजपला अपेक्षित मतांपेक्षाही अधिक मते मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे आणि नुकत्याच झालेल्या कॉंग्रेसच्या घाऊक पक्षांतराच्या जोरदार प्रयत्नाच्या पार्श्‍वभूमीवर तो अनाठायी नक्कीच नाही. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राज्यसभेच्या आणि नंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत चमत्कार घडवून दाखवला, तशाच प्रकारचा विरोधी सदस्यांचा गुप्त पाठिंबा मिळवण्याचा चमत्कार घडविण्याचे श्रेय डॉ. सावंत यांना मिळेल असे दिसते आहे.
राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत १९७१ ची जनगणना गृहित धरली जाते. त्यामुळे गोव्याची तेव्हाची ७ लाख ९५ हजार १२० लोकसंख्या गृहित धरून त्यानुसार प्रत्येक विधिमंडळ सदस्याचे मतमूल्य निश्‍चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार गोव्यातील प्रत्येक आमदाराला २० मते आहेत. म्हणजे चाळीस आमदारांची एकूण मते ८०० होतात. त्यापैकी केवळ भाजप, मगो आणि अपक्ष ह्या पंचवीस आमदारांची मिळून ५०० मते मुर्मू यांना तर मिळणारच आहेत. भाजपला अपेक्षित असलेल्या या मतांपेक्षा अधिक मते जर गोव्यात मिळाली तर त्याचा अर्थ विरोधी सदस्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले असा होईल. ती दाट शक्यता यावेळी दिसते आहे. बंडाच्या तयारीत असलेल्या आणि एका आमदाराने शेवटच्या क्षणी ब्याऽ केल्याने मागे हटलेल्या सर्व सात कॉंग्रेस आमदारांनी मुर्मू यांच्यासाठी मतदान केले तर ती १४० मते देखील रालोआच्या पारड्यात पडण्याचा चमत्कार गोव्यात घडू शकतो. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे स्थानिक खासदार हवे असेल तर विधानसभेत जाऊनही मतदान करू शकतात. त्यामुळे उत्तर आणि दक्षिणेचे दोन्ही खासदार आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी गोव्यातच मतदान केले असे गृहित धरले तर त्यांची मतेही यात मिळवली जातील. प्रत्येक खासदाराला ७०० मते असतात. त्यामुळे श्रीपाद नाईक आणि विनय तेंडुलकर यांनी गोव्यात मतदान केले तर ती १४०० मते जोडली जातील.
येत्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान होत असल्याने आणि या निवडणूक प्रक्रियेनुसार पक्षादेश पाळण्याची आमदारांना आवश्यकता नसल्याने कॉंग्रेसच्या इच्छुक बंडखोरांकडून मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांना संभाव्य बंडाचे सूत्रधार मानून कॉंग्रेसने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत सभापतींपुढे अपात्रता याचिका दाखल केलेली आहे. आम्ही कॉंग्रेसमध्येच आहोत असे दोघेही नेते परोपरीने सांगत असूनही कॉंग्रेसने त्यांना माफी दिलेली दिसत नाही, उलट अपात्रता याचिकेवर सभापतींनी लवकरात लवकर दोघांनाही नोटिसा बजावाव्यात अशी मागणी केलेली आहे. याचा अर्थ कॉंग्रेस पक्ष त्यांच्याविरुद्धच्या अपात्रता याचिका मागे घेण्याच्या विचारात नाही. त्यामुळे लोबो व कामत यांना मुर्मू यांच्यासाठी मतदान करण्यास एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. अपात्रतेची टांगती तलवार लटकलेले हे दोन्ही नेते अर्थातच राष्ट्रपती निवडणुकीमध्ये मुर्मू यांच्या बाजूने मतदान करून भारतीय जनता पक्षाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.
कॉंग्रेसमधून भाजपात जेवढे जास्त आमदार येतील तेवढे डॉ. प्रमोद सावंत सरकारचे स्थैर्य बळकट होणार असल्याने या घाऊक पक्षांतरासाठी मुक्तद्वार जरी भाजपाने दिलेले असले, तरी सरकारमधील काही घटक त्याला फारसे उत्सुक दिसत नाहीत. शिवाय दिगंबर कामत यांच्यासारखा प्रबळ नेता भाजपात आल्यास खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासाठी तो भविष्यात प्रतिस्पर्धी बनू शकतो. मायकल लोबो यांची तर किंगमेकर म्हणून ख्याती आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कॉंग्रेसच्या एका आमदाराला मागे थांबण्यास सांगून आणि बंडाचे ओम फस् करून या दोघांना अपात्र ठरविण्याचा डाव भाजपातूनच खेळला गेलेला नसेल ना अशीही एक शंका आहे. राजकारणात काहीही शक्य असते. या दोघांना नेत्यांना अपात्र ठरवून उर्वरितांमधून दोन तृतीयांशचे बंडही घडविले गेले तरी आश्चर्य वाटू नये. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतून कॉंग्रेसच्या आमदारांचा कल स्पष्ट होणार आहे. या आमदारांचा पाठिंबा मिळवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही. त्यामुळे स्वतःच्या सोईने बंड घडवून भाजपा कॉंग्रेसची राज्यात वासलात लावू शकतो. राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही त्या अवनतीची नांदी ठरेल.