मडगाव मुख्याधिकार्‍यांविरोधात नगरसेवक आक्रमक

0
120
मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या विरोधात धरणे आंदोलनास बसलेले मडगावचे नगरसेवक. (छाया : गणादीप शेल्डेकर)

नगराध्यक्षांसह १६ नगरसेवकांचे धरणे आंदोलन
मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेत मनमानी कारभार चालविला असून नगराध्यक्षाना विश्‍वासात न घेता सर्व निर्णय तेच घेतात. तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेट नाकारली जाते असा दावा करून त्याच्या निषेधार्थ नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो यांच्यासह १६ नगरसेवकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारात काल दुपारी धरणे धरले व मुख्याधिकार्‍यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही त्यांनी केली. दुपारी दोनपर्यंत हे धरणे धरण्यात आले.शहरातील कचर्‍याची विल्हेवाट वेळोवेळी होत नाही, घरोनघर कचरा गोळा करणार्‍या कामगारांना वेळीच वेतन देण्यास ते अडथळा आणतात. कचरा वाहन कॉम्पेक्टर नादुरुस्त असून ते दुरुस्त करण्याची मागणी करुनही मुख्याधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहराला अवकळा आली असल्याचा आरोप नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो यांनी केला. पाणी व विजेचा पुरवठा करण्यासाठी भलत्याच माणसाला परवानगी देऊन फार मोठा घोटाळा केल्याचे नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी सांगितले व ते कागदपत्र पत्रकारांना दाखविले. जे सामान्य नागरिक वा ज्येष्ठ नागरिक तक्रारी घेऊन येतात त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जात असून अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला वाद करीत असताना मुख्याधिकार्‍यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आयएएस अधिकारी असल्याचीही बतावणी करून भीती दाखवतात, अशी तक्रार त्यांनी केली.
काल धरणे धरण्यासाठी बसलेल्या नगरसेवकांना पालिकेतील बहुतांश कर्मचार्‍यांनी अनधिकृतपणे पाठिंबा दर्शविला. या पालिकेत मुख्याधिकार्‍यानी आपल्या दिमतीला एका कनिष्ठ अभियंत्याला मदतीला घेतले असून, त्या अभियंत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. परवाने देताना लोकांकडून मोठ्या प्रमाणात लाच घेतली जाते असा आरोप त्या अभियंत्यावर आहे.
पोलीस संरक्षणात मुख्याधिकारी संध्याकाळी पालिकेत
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण पोलीस संरक्षणात सायंकाळी पालिकेत आले. त्यावेळी त्यांच्या कचेरीच्या बाहेर पन्नास पेक्षा जास्ती पोलीस व अधिकारी होते. त्यामुळे पालिकेला पोलीस छावणीचे रूप आल्याने सर्वांनी आश्‍चर्य व्यक्त केले.
काल सकाळी मुख्याधिकारी पालिकेत फिरकले नाहीत. सर्व नगरसेवक आक्रमक बनल्याचे त्यांना समजल्याने ते पणजी येथून येताना अर्ध्या वाटेवरून परतले. आज सकाळी मुख्याधिकारी कचेरीत न आल्याने नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. सकाळच्या घटनेचा वचपा काढण्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष गोंझार रिबेलो याच्या मुंगूल येथील बारचे बांधकाम मोडून टाकण्याचा आदेश दिला. अधिकृतपणे आदेश दि. २५ मार्च रोजी मिळणार आहे. तेथील एक नागरिक सावियो डायस यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्यावर सुनावणी होऊन हा निवाडा दिला.