गालजीबागमधील अपघातात युवक जागीच ठार

0
101

गालजीबाग-पैंगीण येथे काल २३ रोजी संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात तळपण येथील प्रतीक उर्फ मुन्ना प्रेमानंद पागी (२१) या युवकाचे जागीच निधन झाले. तर दुसरा मोटार सायकलस्वार गौरीश शंकर नाईक याला गंभीर स्थितीत मडगावच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गालजीबाग-तळपण रस्त्यावर समोरासमोर आलेल्या वाहनाने एकमेकांना टक्कर दिल्यामुळे हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत, माजी नगराध्यक्ष रमाकांत गावकर, रत्नाकर धुरी आणि अनेक नागरिकांनी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार करून जखमीला मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठविले. काणकोणचे पोलीस निरीक्षक फिलोमेना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत देसाई पुढील तपास करीत आहे.