पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या वक्तव्यास भारताची तीव्र हरकत

0
111

उभयतांतील मुद्यांवर त्रयस्थास स्थान नाही
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या विविध महत्वाच्या विषयांवर हुरियतशी चर्चा करण्यास भारताची हरकत नाही. या पाकिस्तानचे येथील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी केलेल्या वक्तव्यास भारताने तीव्र हरकत घेतली आहे.
विदेश व्यवहार खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दिन यांनी या विषयावरील भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट करताना सांगितले की या प्रश्‍नी कोणत्याही अन्य तिसर्‍या पक्षाला स्थान नाही. ‘मी पुनरुच्चार करतो की या मुद्यांवर केवळ दोनच पक्षात चर्चा होऊ शकते. भारत-पाकिस्तान यांच्यातील मुद्यांवर तिसर्‍या पक्षास स्थान नाही’ असे अकबरुद्दिन म्हणाले.गेल्या वर्षी अधिकृतपणे भारत-पाक दरम्यानची बोलणी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी बसीन यांनी हुरियत नेत्यांशी सल्लामसलत केल्यामुळे भारताने विदेश सचिव पातळीवरील नियोजित चर्चा रद्द केली होती.
काल पाकिस्तानदिनानिमित्त उपस्थित राहिलेल्या मिरवाईज उमर फारूक, सय्यद अली शागिलानी व यासिन मलीक या फुटिरतावाद्यांशी बसीत यांनी चर्चा केली होती. त्यांच्याशी केलेल्या चर्चेला भारताची हरकत नाही असे वक्तव्य बसीत यांनी केले होते.
पाकिस्तान दिन समारंभास विदेश राज्यमंत्री उपस्थित
या समारंभास केंद्रीय विदेश व्यवहार राज्यमंत्री निवृत्त लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. ते सुमारे १५ मिनिटे या ठिकाणी थांबले. कॉंग्रेसचे नेते मणी शंकर अय्यर हेही समारंभास उपस्थित राहिले. अय्यर यांनी वरील प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्तानी उच्चायुक्तांनी हुरियत नेत्यांशी चर्चा केली म्हणून उभय देशांदरम्यानची बोलणी बंद करणे मुर्खपणाचे ठरेल असे म्हटले आहे.