मंगळवारी कोरोनाने १० जणांचा मृत्यू

0
50

>> चोवीस तासांत ३२७ बाधित, ५४८ कोरोनामुक्त

राज्यात कोरोना विषाणूमुळे काल मंगळवारी १० जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित नव्या ३२७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४१७५ एवढी खाली आली आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २९४७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३ टक्के एवढे आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६३,०४८ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत ५४८ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात ५४८ जण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,५५,९२६ एवढी झाली आहे. अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

इस्पितळातून काल डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४८ एवढी आहे. तर काल नव्याने इस्पितळात ४५ जणांना भरती करण्यात आले. काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ३१२० एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने २७९ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

१० जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला. मात्र राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असून कोरोना मुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १० मृत्यूंपैकी ५ जणांचा मृत्यू बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, ४ जणांचा मृत्यू मडगावच्या दक्षिण जिल्हा इस्पितळात तर एकाचा मृत्यू मडगावच्या विक्टर इस्पितळात झाला आहे.


सर्वाधिक रुग्ण फोंड्यात
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या फोंड्यात असून ती ४३९ एवढी आहे. मडगावात सध्या २४८७ रुग्णसंख्या असून पणजी २२१, चिंबल २४८, पर्वरीत १२०, कांदोळी १२८, कासावली १२४, कुठ्ठाळी १८८, पेडणे १४८, वास्को १३१, कुडचडे ९२, साखळी १६७, लोटली ११२, म्हापसा ९०, खोर्ली १२०, वाळपई ९२ अशी सध्याची रुग्णसंख्या आहे. कोरोना संसर्ग झालेल्या २७,६०२ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. आतापर्यंत १,११,९७२ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ८,७२,९५० एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.