गोवा विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये ः मुख्यमंत्री

0
63

गोवा विधानसभेचा कार्यकाल येत्या मार्च २०२२ ला संपत असून निवडणूक फेबु्रवारी २०२२ ला होणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुदतीपूर्वी विधानसभा निवडणूक घेतली जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आदी राज्यातील विरोधी पक्षांना भाजप नेतृत्वाखालील डॉ. प्रमोद सावंत सरकार मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वाटत असतानाच मुख्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल पोलीस खात्याची स्तुती करताना राज्यातील पोलीस खाते हे अत्यंत सक्रिय असून पोलीसकर्मी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय टीका ही फक्त राजकारण्यांवरच करायची असते. विरोधकांनी सरकारी कर्मचार्‍यांवर टीका करू नये असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सत्ताधारी, भाजप, कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड आम आदमी पक्ष यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे.