भाजप आणि कॉंग्रेसची गुजरातमध्ये संमिश्र कामगिरी

0
96

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. भाजपाला गुजरातेत सतत सहाव्या वेळा सरकार स्थापन करता आले असले व त्या पक्षाची मतांची टक्केवारी जरी वाढलेली असली, तरी २००२ पासून आजवर सर्वांत कमी जागा भाजपाला यावेळी जिंकता आल्या आहेत.

कॉंग्रेसची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्हींमध्ये यावेळी वाढ झाली आहे.
भाजपाने या निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट गुजरातमध्ये समोर ठेवले होते, परंतु आजवरच्या सर्वांत कमी जागा त्यांच्या वाट्याला आल्या आहेत. २००२, २००७ आणि २०१२ या तिन्ही निवडणुकांत भाजपला अनुक्रमे १२७, ११७ व ११५ जागा मिळाल्या होत्या. या तिन्ही निवडणुकांत पक्षाची मतांची टक्केवारी अनुक्रमे ४९.८ टक्के, ४९.१ टक्के व ४७.८५ टक्के राहिली होती.

सन २००२ ते २०१७ पर्यंत कॉंग्रेसला गुजरात एकदाही जिंकता आलेले नसले तरी त्यांच्या जागा मात्र वाढत गेल्या आहेत. २००२ मध्ये कॉंग्रेसला गुजरातमध्ये ५१ जागा मिळाल्या होत्या. २००७ मध्ये त्या ५९ वर गेल्या व २०१२ मध्ये ६१ वर पोहोचल्या होत्या. यावेळीही त्यात भरीव वाढ झाली आहे. २००२ मध्ये कॉंग्रेसची मतांची टक्केवारी ३९.३ टक्के होती, ती २००७ मध्ये ३८ टक्के झाली होती. पण २०१२ मध्ये ती ३८.९३ टक्के झाली होती. यावेळी कॉंग्रेसची मतांची टक्केवारीही वाढली आहे.