हिमाचलात भाजप सरकार

0
90

हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसला सत्ताच्युत करून भाजपने सत्ता काबीज केली असली तरी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांच्या वाट्याला दारूण पराभव आला. ६८ जागांच्या या विधानसभेवर भाजपने ४४ जागा मिळवल्या. तर सत्ताधारी कॉंग्रेसची २१ जागांवर घसरगुंडी उडाली. धुमल यांना कॉंग्रेसच्या राजिंदर राजा यांनी पराभूत केले. मुख्यमंत्री वीरभद्रसिंग व त्यांचे पुत्र विक्रमादित्य दोघेही विजयी झाले आहेत.

पराभूत प्रेमकुमार धुमल यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की वैयक्तिक विजयापेक्षा पक्षाचा विजय महत्वचा असतो. हिमाचलच्या जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल आपण ऋणी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी धुमल यांच्या पराभवाबद्दल दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचवेळी जनतेने पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

हिमाचलातही गुजरातप्रमाणेच भाजप वि. कॉंग्रेस असा थेट सामनाच होता. हिमाचलमधील जनता दर पाच वर्षांनी सत्ताबदल करत असल्याचा गेल्या अडीच दशकांचा अनुभव आहे. यावेळी त्यात मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्या नाराजीची भर पडली. या पार्श्‍वभूमीमुळे यावेळी भाजपचे पारडे जड होते व अखेर भाजपनेच बाजी मारली. मुख्यमंत्री वीरभद्रासिंग यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे म्हटले आहे.