कॉंग्रेसमुक्त भारताच्या दिशेने भाजपचे आणखी एक पाऊल

0
78

कालच्या निवडणूक निकालातून हिमाचल प्रदेशमधील कॉंग्रेसची सत्ता हिसकावून घेतल्याने भारतीय जनता पक्षाने ‘कॉंग्रेसमुक्त भारता’च्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. उत्तर भारतातील पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपा अथवा भाजपा व मित्रपक्षांची सरकारे आहेत. दक्षिण भारतातही केवळ कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार असून तेथेही आगामी वर्षी निवडणूक होणार आहे. केवळ ईशान्य भारतामध्ये काही राज्यांत कॉंग्रेसचे अस्तित्व दिसून येत आहे.

या वर्षी भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय संपादन करून आपली दमदार वाटचाल सुरू केली होती. उत्तर प्रदेशबरोबरच उत्तराखंडमध्येही भाजपाने विजय संपादन केला. गोव्यात कमी जागा असूनही भाजपाने सरकार स्थापन केले आणि मणिपूरमध्येही आपले सरकार बनवले. आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशही पक्षाने काबीजकेले आहे.

देशातील भाजपा व भाजपा मित्रपक्ष किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्तेबाहेर असलेली केवळ दहा राज्ये उरली आहेत. तामीळनाडूत अभाअद्रमुकचे सरकार आहे, केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार आहे, पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस, उडिसामध्ये बिजू जनता दल, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती, नागालँडमध्ये नागा पीपल्स फ्रंट, दिल्लीत आम आदमी पक्ष व त्रिपुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे. आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर असलेला तेलगू देसम पक्ष एनडीएचा घटक असून बिहार व जम्मू काश्मीरमध्येही भाजपने इतर पक्षांच्या समवेत सरकारे स्थापन केलेली आहेत.
कर्नाटक वगळता ईशान्येतील मेघालय व मिझोराममध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. मात्र, पुढील वर्षी कर्नाटक, मिझोराम, त्रिपुरा व मेघालयमध्ये भगवा फडकवण्याची संधी भाजपाला मिळणार आहे.