ब्राह्मतेज-क्षात्रतेज यांचा संगम

0
13

संस्कार रामायण

  • प्रा. रमेश सप्रे

एकदा तेजाचा, दिव्यत्वाचा प्रत्यय आला की तेथे महान व्यक्तींचीसुद्धा समर्पणशीलता, शरणांगत वृत्ती सहज दिसून येते. तेथे कोणाचाही स्वार्थ, अहंकार, स्पर्धा यांना स्थान नसते. यालाच म्हणतात- ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती.’

सर्वप्रथम लक्षात घेऊ की लेखाच्या शीर्षकातील ब्राह्म नि क्षात्र यांचा कोणत्याही जाति-वर्णाशी संबंध नाही. कारण तशी समाजात नि मानवीजीवनात ‘वैश्यतेज’ नि ‘शूद्रतेज’ यांचीही आवश्यकता असते.
इथे प्रसंग आहे रामायणातला. श्रीराम-परशुराम यांच्या भेटीचा. अतिशय महत्त्वाचा नि मार्मिक प्रसंग. चारही पुत्रांच्या विवाहानंतर वसिष्ठादी ऋषी, दशरथ, सुमंत्र इ. राज्यकारभाराशी संबंध असलेल्या महनीय व्यक्ती आणि अयोध्येतील इतर अनेक मंडळी आनंदात जनकाची राजधानी मिथिलेहून अयोध्येकडे निघाली होती. आजूबाजूचा निसर्ग नि एकूणच वातावरण अतिशय प्रसन्न होते. अशावेळी एक धीरगंभीर वाणी ऐकू येते. सारेजण थबकतात एका ऋषींच्या आवेशयुक्त आगमनाने. ‘तुमच्यापैकी कोणी मी जनकाकडे ठेवलेले शिवधनुष्य मोडले?’ रागात उच्चारलेले वरच्या स्वरातले हे शब्द ऐकून पुण्यापुऱ्या सोळा वर्षांचा श्रीराम पुढे होऊन अतिशय विनयानं म्हणतो, “ऋषीवर, मी ते शिवधनुष्य मोडले नाही. त्याला प्रत्यंचा (दोरी) जोडत असताना ते आपोआप तुटले.”
ते ऋषी विष्णुभगवानांचा सहावा अवतार असलेले परशुराम होते. सातवा अवतार- अर्थातच श्रीराम होता. रामाच्या बोलण्यावर विश्वास न बसल्यामुळे परशुराम आपले दुसरे वैष्णव धनुष्य पुढे करून म्हणतात, “या धनुष्याला प्रत्यंचा जोडून दाखवलीस तरच माझा तुझ्यावर विश्वास बसेल.”

रामाने पुढे होऊन अगदी सहज ते वैष्णव धनुष्य पेलले नि वाकवून त्याला प्रत्यंचा जोडलीसुद्धा. हे पाहून परशुरामांना आनंद झाला. कारण एक महापराक्रमी पण नम्र, सुसंस्कृत असा क्षत्रिय राजा त्यांच्यासमोर नम्रपणे उभा होता.
परशुरामांच्या या क्रोधामागे एक इतिहास होता. त्यांचे पिताश्री सप्तर्षींमधले तेजस्वी ऋषी जमदग्नी ध्यानावस्थेत असताना क्षत्रिय राजा सहस्रबाहू कार्तवीर्य अर्जुन याने जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. कारण तहानभुकेनं अतिशय व्याकूळ झाल्यामुळे विनंती करूनही जमदग्नी ऋषींनी आपले डोळे उघडले नव्हते. खरे कारण असे होते की, त्यावेळी सारे ऋषीकुमार पाणी- कंदमुळे- फळे- इंधन (लाकडे) इ. वस्तू आणण्यासाठी अरण्यात गेले होते. आश्रमात राजा व त्याचे भुकेले सैनिक यांच्या भोजनासाठी काहीही नव्हते. म्हणून जमदग्नी ऋषींनी काहीही न बोलता आपले ध्यान चालू ठेवले होते. म्हणून त्यांचा शिरच्छेद करून राजा सैनिकांसह आश्रमातून निघून जातो. हा करुण, भीषण प्रसंग घडल्यावर लगेचच परशुराम आश्रमात प्रवेश करतात. त्यांच्या एका खांद्यावर लाकडाची मोळी तर दुसऱ्या हातात धारदार परशू (कुऱ्हाड) होता. समोरचे सारे दृश्य पाहून परशू उंचावत त्यांनी प्रतिज्ञा केली- “ज्या क्षत्रिय राजांनी राज्यातील सामान्य प्रजेचे, विशेषतः विद्वान ऋषिमुनींचे रक्षण करण्याऐवजी भक्षण (विनाश) करणे चालवले आहे, अशा सर्व उन्मत्त क्षत्रिय राजांचा मी संहार करीन.”
यासंदर्भात विनोबांचे एक अतिशय मार्मिक विधान आहे- ‘परशुरामांना कधीही पृथ्वी निःक्षत्रिय करता आली नसती. कारण तसं करताना ते स्वतःच एक क्षत्रिय झाले नव्हते का?’ त्यांच्यात खरोखर ब्राह्मतेज (गुणवत्ता, विद्वत्ता) आणि क्षात्रतेज (पराक्रम, सत्ता) यांचा संगम झाला होता. ते वृत्तीनं ब्राह्मतेजानं युक्त, पण कृतीत क्षात्रतेज व्यक्त करणारे होते. तेच त्यांचं चरित्रही आहे नि चारित्र्यही आहे.

या दोन्ही तेजांचा संगम हे श्रीरामाचं चरित्र होतं, चारित्र्यही होतं. यासंबंधी एक विचार चिंतनीय आहे-
अग्रतो चतुरो वेदान्‌‍ पृष्ठतो सशरं धनुः।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥

  • वेदांची पालखी पुढे चालली आहे नि तिचं रक्षण करण्यासाठी धनुर्धारी वीर निघालाय. शाप नि शर (बाण) दोन्हींचा संयुक्त प्रभाव आजही उपयुक्त आहे.
    कोणतंही महान कार्य वा प्रकल्प सिद्ध करण्यासाठी जिद्द, चिकाटी, पराक्रम, साहस हे क्षात्रतेज हवे, पण ज्ञान, विचार, विवेक, प्रतिभा यासारखे ब्राह्मतेजही हवे.
    या प्रसंगातून व्यक्त होणारे संस्कार-
  • विनय, नम्रता, निरहंकारिता हे सर्वोच्च गुण आहेत. यांच्या कोंदणात ज्ञान, कर्म, पराक्रम हे सारे शोभून दिसतात. विशेषतः ऋषिमुनी, महापुरुष यांना तर अशा गुणांची परम आवश्यकता असते. कारण साऱ्या समाजाचे ते ‘आदर्श’ असतात.
  • जीवनात काहीही मिळवण्यासाठी ज्ञान नि त्याचं उपयोजन आवश्यक असतं. यासाठी खूप कष्ट, प्रयत्न, काहीही झालं- अपयश आलं तरी कार्य पुरं होईपर्यंत नेटानं प्रयोग आणि प्रयास करत राहाणं गरजेचं असतं. हाच ब्राह्म नि क्षात्रतेजांचा संगम!
  • श्रीरामाच्या ठिकाणी अशा संगम पाहून त्याला आलिंगन देऊन, आपली आत्मशक्ती श्रीरामात संक्रमित करून धन्य भावनेनं महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी परशुराम निघून गेले. ते चिरंजीव आहेत अशी अनेकांची श्रद्धा आहे.
    या प्रसंगावरून हे दिसून येते की एकदा तेजाचा, दिव्यत्वाचा प्रत्यय आला की तेथे महान व्यक्तींचीसुद्धा समर्पणशीलता, शरणांगत वृत्ती सहज दिसून येते. तेथे कोणाचाही स्वार्थ, अहंकार, स्पर्धा यांना स्थान नसते. यालाच म्हणतात- ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती.’