बोगमाळो खूनप्रकरणी दोन संशयितांना अटक

0
115

>> दोन्ही संशयित उत्तर प्रदेशातील

>> आरोपींना सात दिवसांचा रिमांड

गुरुवारी बोगमाळो रंघवी इस्टेट येथे गोळी झाडून अमर नाईक यांचा खून केल्याप्रकरणी शैलेश गुप्ता (२९) व शिवम सिंग (२२) या उत्तर प्रदेशमधील दोन्ही संशयितांना काल शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. खूनप्रकरणी सुरू असलेल्या तपासकामात दोन्ही संशयितांना कासावली येथे पंधरा तासांच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आले. सुपारी घेऊन हा खून केला असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे मूळ उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली. या प्रकरणी लवकरच आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाचे धागेदोरे
या खूनप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोर सापडले आहे. त्यावरून पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी पहाटे संशयितांना वास्को पोलिसांनी अटक केली. सदर आरोपी यापूर्वी ८ व ९ जुलै रोजी घटनास्थळी येऊन गेले होते, त्यानंतर त्यांनी हा कट रचला असे त्यांनी कबुल केले. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली.

दोन्ही आरोपींना प्रथम श्रेणी न्यायालयात काल हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

लायनाचा प्रयत्न
अमर नाईक हा आपला मित्र प्रीतेश याच्यासोबत एका मालमत्ता व्यवहारप्रकरणी हल्लेखोरांना भेटण्यासाठी आपल्या खासगी वाहनाने रंघवी इस्टेटमध्ये आला होता. याच दरम्यान त्या हल्लेखोरांनी त्याच्याच गाडीत बसून दाबोळी नाक्यावर जाऊन दारू आणली व परत नियोजित ठिकाणी येऊन मद्यपान सुरू केले. त्याचवेळी त्यांच्यात पुन्हा बोलणी सुरू झाली. याचवेळी हल्लेखोरातील एकाने पिस्तुल काढून अमर नाईकच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने प्रीतेशवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता प्रीतेशने त्यांना गाडीबाहेर ढकलून दिले. याही अवस्थेत त्यांनी प्रीतेशवर गोळी झाडली. मात्र ती गाडीच्या टपाला लागली. यानंतर हल्लेखोरांनी आपल्या गाडीकडे पळत जाऊन गाडीत बसून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची गाडी झाडीत कोसळली. यानंतर हल्लेखोर तेथून लपतछपत निघाले. ते पहाटे कासावली येथे पोहोचले. कदाचित रेल्वेमार्गे त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न असावा. मात्र या दरम्यान वास्को पोलिसांचा तपास सुरूच होता. त्यांनी कासावली येथे दोन्ही संशयितांना अटक केली.

याकामी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग, मुरगाव तालुका उपअधीक्षक राजू राऊत देसाई, वास्को पोलीस निरीक्षक नीलेश राणे, उपनिरीक्षक डायगो ग्रेशियास, रितेश तारी, स्वप्निल नाईक, उत्क्रांत देसाई, हवालदार संतोष भाटकर, सचिन बांदेकर, पोलीस कॉन्स्टेबल गौरीश सातार्डेकर, बर्डी कार्दोज, राकेश जल्मी व इतरांनी मोलाची कामगिरी बजावली.

आज अंत्यसंस्कार
बोगमाळो येथील हल्ल्यात मृत्यू पावलेल्या अमर नाईक याच्या मृतदेहावर आज शनिवारी दुपारी १३.३० वाजता खारीवाडा येथे हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.