पक्षांतरविरोधी कायद्यात भाजपचीच आडकाठी

0
147

>> विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा आरोप

पक्षांतराविरूद्ध क्रांतिकारी पाऊल उचलण्याची वेळ आलेली असताना भाजप त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केला. गोवा विधानसभेच्या आगामी सत्रात पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करून पक्षांतरास कायमचा पूर्णविराम द्यावा अशी मागणी करणारा ठराव मी दाखल केला होता. मात्र सदर ठराव काल विधिमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत नव्हता. तो ठराव दाखल करुन घेण्याचे सौजन्यही राज्य सरकारने दाखवले नाही. त्यामुळे भाजप सरकार पक्षांतरे व घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचेच स्पष्ट होत असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.

गोव्यातील सर्व आमदारांनी माझ्या ठरावास एकमताने पाठिंबा द्यावा व माजी मंत्री तथा घटनातज्ज्ञ स्व. काशिनाथ जल्मी यांची पक्षांतरे कायमची बंद करण्याची इच्छा पूर्ण करावी असे आपण आवाहन केले होते. सन १९९० मध्ये त्यांनी दिलेला ऐतिहासिक निवाडा सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला होता याची आठवण श्री. कामत यांनी करून दिली.

घटनेच्या दहाव्या परिशिष्टात आवश्यक बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणारा ठराव अडवून ठेवण्याच्या भाजप सरकारच्या कृतीचा मी निषेध करत असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. भाजपने देशात फोडाफोडीचे व पक्षांतराचे राजकारण करत मणिपूर, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश येथे सरकारे स्थापन केली. भाजपला येत्या निवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन कामत यांनी केले.