बेतोड्यात आस्थापनाला आग लागल्याने २ कोटींचे नुकसान

0
106
बेतोडा औद्योगिक वसाहतीतील आस्थापनाला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण आणताना अग्निशामक दलाचे जवान. (छाया : नीलेश नाईक)

संपूर्ण उत्पादित माल आगीच्या भक्ष्यस्थानी
बेतोडा येथील औद्योगिक वसाहतीतील एरोकोच नामक कंपनीच्या आस्थापनाला काल दुपारी अकस्मात लागलेल्या भीषण आगीत उत्पादीत मालासह संपूर्ण आस्थापन जळून खाक झाल्याने सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा आस्थापनाचे संचालक एडवर्ड मोंतेरो यांनी केला आहे.आगीचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी फोंडा अग्नीशामक दल, फोंडा पोलीस व संबंधित यंत्रणा तपास करीत आहे.
काल दुपारी १ च्या दरम्यान आग लागल्याचा संदेश मिळाल्यानंतर नंतर फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. पण आग आटोक्यात आणण्यासाठी योग्य पाणी पुरवठा न झाल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना कसरत करावी लागली.
आग आटोक्यात आणण्याचे काम सायंकाळपर्यंत चालू होते. फोंडा, कुंडई, ओल्ड गोवा, पणजी, कुडचडे आदी भागातून अग्निशामक दलाचे आग विझवणारे बंब आणले. १० बंब काम करत होते. आग दिवसा लागल्याने विझवणे शक्य झाले. त्यामुळे जवळ असलेली इतर आस्थापने सुरक्षित राहू शकली.
या कंपनीत रंग साहित्य तयार करण्यात येत होता. त्यामुळे पावडर इतर रसायने व कच्चे साहित्य गोदामात ठेवले होते. संपूर्ण तयार माल जळाला. आगीचे वृत्त समजल्यावर उद्योगमंत्री महादेव नाईक, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी व इतर संबंधितांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.