महिलांना ३३% आरक्षणाचा निर्णय मोदी सरकारच घेईल

0
87

अ. भा. भाजप महिला मोर्चा अध्यक्षांचे मत
विधानसभा तसेच संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच निर्णय घेईल, असा विश्‍वास अखिल भारतीय भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया राहटक यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून येथील महिलांमध्ये जागृती करण्यासाठी व प्रदेश महिला मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी राहटक गोव्यात आल्या आहेत.
महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय कधी होईल, असा प्रश्‍न केला असता ती प्रक्रिया कधी पूर्ण होईल हे सांगणे शक्य नाही.परंतु या मागणीला मोदी सरकार न्याय देईल व सरकारवर विश्‍वास आहे, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण देशात १० कोटी सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत तीन कोटी सदस्यांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक सदस्यांची नोंदणी झालेल्या भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले.
‘कॅसिनो’ वर मौन
गोव्यातील कॅसिनो जुगाराच्या विषयावर आपण सध्या तरी बोलण्यास तयार नाही. आपण यावेळी गोव्यात वेगळा म्हणजे सदस्य नोंदणी अभियानाचा विषय घेऊन आल्याचे सांगून, कॅसिनोच्या बाबतीत कोणतेही भाष्य करण्यास राहटक यांनी नकार दिला. कॅसिनो हा विषय गोव्यात आहे की नाही, हे मान्य करण्यासही त्या तयार नव्हत्या.