बेती येथील पेट्रोल पंपला आग

0
117

>> दोघे जखमी; १५ हजारांचे नुकसान

बेती येथील यूआरएस पेट्रोल पंपच्या मागील भागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले. तर अग्निशामक दलाला पन्नास लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले. सदर घटना काल सकाळी ९ वाजता घडली.
किरकोळ जखमी झालेल्या पेट्रोल पंपवरील कर्मचार्‍यांची नावे ब्रिजेश फातर्पेकर व चांदसाब वालेकर अशी आहेत. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल गुरुवारी सकाळी ९ वाजता बेती येथील यूआरएस पेट्रोल पंपच्या मागच्या बाजूला असलेल्या बॅटरी युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने पेट घेतल्याने ज्वालांमुळे पेट्रोल पंप कार्यालयाच्या काचा फुटल्या. त्या जवळ असलेल्या ब्रिजेश फातर्पेकर व चांदसाब वालेकर यांच्या अंगावर पडल्यामुळे ते दोघेही जखमी झाले.
या दुर्घटनेची माहिती पेट्रोल पंपचे मालक गिरीश आरस यांनी पर्वरी पोलिसांना दिली. पोलिसांनी पिळर्ण व पणजी येथील अग्निशामक दलाला त्वरित माहिती दिली. त्यानंतर दोन्ही ठिकाणाहून दोन पाण्याचे बंब
येऊन आग आटोक्यात आणली. त्यांनी अंदाजे पन्नास लाख रुपयांची मालमत्ता वाचविली.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान डी. एल. पेडणेकर, पी. एन. नाईक, डी. के. वस्त, एस. एस. सावंत व जे. ए. बाली तसेच पणजी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. पर्वरी पोलीस स्थानकाचे पोलीस संजू साळुंके यांनी पंचनामा केला.