एलईडी, बूल ट्रॉलरद्वारे मच्छीमारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

0
60

>> मत्स्यद्योग मंत्र्यांचा अधिकार्‍यांना आदेश

बारा नाविक मैल परिघात एलईडी दिव्यांचा वापर करून तसेच मोठ्या ट्रॉलरच्या माध्यमातून मच्छीमारी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश आपण खात्याच्या अधिकार्‍यांना दिला असून मंत्रीपदी असेपर्यंत हा गैरप्रकार आपण सहन करणार नाही, असे मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
वरील प्रकरणी खात्याकडे अधिकृत तक्रारी आलेल्या नसल्या तरी प्रत्यक्षात वरील गैरप्रकार होतात याची कल्पना आहे. या प्रकारांमुळे पर्यावरणावरही परिणाम होतो. रापणकारांच्या हिताचा विचार आपण करीत असल्याचे ते म्हणाले. काल झालेल्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या बैठकीत या गैरप्रकारांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेला स्वस्त दरात मासळी उपलब्ध झाली पाहिजे. येथील लोकांचे ते अन्न आहे. त्यामुळे निर्यातीवर काही प्रमाणात कपात करणे शक्य असल्यास ती केली जाईल, असे ते एका प्रश्‍नावर म्हणाले.
मालीम जेटीवर गैरप्रकार चालू आहेत. त्यावर कारवाई करण्यास आपण अधिकार्‍यांना सांगितले आहे. वरील प्रकाराबाबत जनतेला माहिती मिळावी म्हणून श्‍वेतपत्रिका जारी करण्यास अधिकार्‍यांना सांगितल्याचे ते म्हणाले. परप्रांतियांनी तेथील शेडवर अतिक्रमण केले आहे. त्या ताब्यात घेतल्या जातील, असे पालयेकर यांनी सांगितले.