बंडखोरी रोखण्यासाठी दिग्विजयसिंह प्रयत्नशील

0
85

पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असलेले कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना रोखण्यासाठी अ. भा. कॉं. सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजयसिंह यांनी प्रयत्न चालविले असून निवडणुकीत पक्षाला आवरण्यासाठी सिंह यांची सांताक्रुजचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांच्याशीही बोलणी चालू असल्याचे खात्रिलायकरीत्या कळते. तर पक्षाच्या एका आमदाराने माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमांव यांनाही पक्षात घेण्याची सूचना सिंह यांना केल्याचे कळते, तर गट पातळीवर या प्रस्तावास विरोध आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना निर्णय घेणे अडचणीचे ठरले आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांना कॉंग्रेस पक्षाचे दरवाजे खुले आहेत परंतु गोवा फॉरवर्डमधील अन्य इच्छुकांना उमेदवार म्हणून सामावून घेण्यास पक्षात विरोध होत आहे. मोन्सेर्रात यांना आपल्या ताब्यात सांतआंद्रे मतदारसंघ हवा आहे तर कॉंग्रेसने तेथे विनोद कामत या नव्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची तयारी ठेवली आहे. मोन्सेर्रात यांनी पणजीतून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे. परंतु ताळगांव, सांताक्रुज व सांतआंद्रे या मतदारसंघासाठीही आग्रह धरल्याने त्यावर तोडगा काढणे अद्याप शक्य न झाल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. सिंह यांचा आज व उद्या गोव्यातच मुक्काम असेल. सिंह यांच्या प्रयत्नांना किती यश येईल हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.