निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच उमेदवारी यादी जाहीर : दिग्विजयसिंह

0
97

>> ‘महायुतीच्या विरोधात ठराव नाहीत’

 

आगामी २०१७च्या विधानसभा निवडणुकीची तयारी कॉंग्रेसने केली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या यादीस मान्यता दिल्यानंतरच उमेदवारांची नावे जाहीर करणे शक्य होईल, असे सांगून महायुतीच्या विरोधात कॉंग्रेसच्या एकाही गटाने ठराव घेतलेला नाही. त्यामुळे त्यावरही निर्णय नंतरच होऊ शकेल, असे अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोवा प्रभारी दिग्विजयसिंह यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेस आमदार, पदाधिकारी यांची आपण बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले. २ ऑक्टोबर रोजी थिवी व वास्को येथे जाहीर सभांचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारच्या विरोधात आरोपपत्र तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ते घरोघरी पोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३५ हजार रुपयांचा खनिज घोटाळा झाल्याचा भाजपने आरोप केला होता, परंतु सरकारने अद्याप एकही पैसा वसूल केलेला नाही. रोजगारीच्या प्रश्‍नावर काहीही केले नाही. प्रादेशिक आराखडाही तयार नाही, अशा अनेक विषयांचा आरोपपत्रात समावेश असेल, असे ते म्हणाले.
गोवा हे पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे कॅसिनोच्या प्रश्‍नावर वेगळ्या पध्दतीने विचार करावा लागेल. परंतु गोवा माकाव बनू नये या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे, असे सिंह म्हणाले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी कॅसिनोच्या विरोधात वक्तव्य केल्याचे सिंह यांना पत्रकारांनी सांगितले. त्यावेळी फालेरो यांनी हस्तक्षेप केला. वैयक्तिकदृष्ट्या आपला कॅसिनोला विरोध आहे, या प्रश्‍नावर बिगर सरकारी संस्था व अन्य संबंधितांची मते अजमावल्यानंतरच कॅसिनोच्याबाबतीत पक्ष निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या कार्यकारी समितीनेही कॅसिनोच्या विरोधात निर्णय घेतल्याची माहिती फालेरो यांनी दिली.
कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेले कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याशी संपर्क केला काय, असा प्रश्‍न सिंह यांना विचारला असता प्रदेश कॉंग्रेस समितीशी त्यांचा संपर्क असल्याचे ते म्हणाले.
सिंह यांच्या पत्रकारपरिषदेस विरोधी नेते प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री रवी नाईक, माजी पंचायतमंत्री बाबू आजगांवकर आदी उपस्थित होते.