पेट्रोल ८२ तर डिझेल ६१ पैशांनी महागले

0
80

पेट्रोलियम कंपन्यांनी काल पेट्रोल ८२ पैसे तर डिझेलमध्ये ६१ पैसे प्रतिलीटरने दरवाढ केली असून गेल्या सहा महिन्यांपासून दरात होणार्‍या कपातीला ब्रेक लागले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. ऑगस्ट २०१४ नंतर पहिल्यांदाच पेट्रोल – डिझेलमध्ये ही दरवाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर घसरत होते. त्यामुळे ऑगस्ट २०१४ पासून दर सातत्याने कमी होत होते. मात्र, त्यानंतर प्रथमच काल दरात वाढ करण्यात आली आहे. ऑगस्ट २०१४ पासून आजपर्यंत पेट्रोलचे दर १० वेळा तर ऑक्टोबरपासून डिझेलच्या दरात सहा वेळा कपात करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या ४ फेब्रुवारीला कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोल २ रुपये ४२ पैसे आणि डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने ही कपात करण्यात आली होती. पेट्रोल – डिझेलमध्ये आता दरवाढ झाली असली तरी सप्टेंबर २०१० पेक्षाही पेट्रोलचा दर कमी आहे. तर डिझेलचा दर मार्च २०१३ ला होता त्याहीपेक्षा अजूनही कमी आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावर लक्ष ठेवून असून चढउतार झाल्यास त्याचे परिणाम पेट्रोल – डिझेलच्या दरावर दिसून येतील, असे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.