विश्‍व चषक स्पर्धेत पुन्हा भारताने पाकला लोळवले

0
233

देशभर जल्लोष; पंतप्रधानांनी केले अभिनंदन
विश्‍व चषक स्पर्धेच्या बहुचर्चित शुभारंभी सामन्यात गतविजेत्या भारताने सलग सहाव्या वेळेस पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १८ चेंडू राखत ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवून आपल्या विश्‍वकरंडक अभियानाची दिमाखात सुरूवात केली. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, पाक संघ २२४ धावांवरच भुईसपाट झाला.भारतभर या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन आणि अनेक मान्यवरांनी भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘भारतीय संघाचे अभिनंदन! छान खेळलात. आम्हां सर्वांना तुमचा अभिमान आहे’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया व्यक्त करताना टीम इंडियाचा हा शानदार विजय असून आणखी पुढे मोठी भरारी मारायची आहे, असे म्हटले आहे.
अवघ्या क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागलेल्या भारत – पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून सुरूवातीलाच अर्धी लढाई जिंकली होती. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने विराट कोहलीचे दमदार शतक (१०७) आणि सुरेश रैना (७४) शिखर धवन (७३) यांच्या अर्धशतकांच्या बळावर पाकसमोर ३०१ धावांचे कठीण आव्हान उभे केले होते. मात्र, या धावसंख्येचा पाठलाग करताना कसदार मार्‍यापुढे त्यांचे गडी कालांतराने बाद होत गेल्याने भारताने विश्‍व चषक स्पर्धेत सलग सहाव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली.
या सामन्यादरम्यान एका बाजूने पाकिस्तानचे गडी बाद होत होते आणि स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एकच जल्लोष सुरू होता तर, दुसर्‍या बाजूला अवघे ऍडलेड ओव्हल भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचा अनोखा क्षण क्रिकेट चाहते अनुभवत होते. सायंकाळच्या मावळत्या सूर्यामुळे नभाला आलेला केशरी रंग, ऍडलेड ओव्हल मैदानाचे पांढरे शुभ्र छप्पर आणि हिरवेगार स्टेडियम अशा प्रकारे संपूर्ण स्टेडियम भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात नटल्याने निसर्गही टीम इंडियाच्या यशावर फिदा झाला होता.
पाकिस्तानविरुद्ध भारताचा विजयी ‘षट्‌कार’
विश्व चषक : विराटचे शतक; धवन, रैनाची उपयुक्त खेळी; शामीही प्रभावी
विराट कोलहीचे दमदार शतक, शिखर धवन व सुरेश रैना यांची उपयुक्त अर्धशतके आणि मोहम्मद शामीच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत शानदार सलामी देताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७६ धावांनी धूळ चारली. विश्व चषक स्पर्धेतील भारताचा पाकिस्तानवर हा सहावा विजय ठरला. १०७ धावांची शतकी खेळी केलेला विराट सामनाविराचा मानकरी ठरला.
कोहलीच्या शतकामुळे भारताने विश्व चषकात पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध ३०० धावा केल्या. विश्व चषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा पाकिस्तानवरील हा सर्वांत मोठा विजयी ठरला. विश्व चषकात आतापर्यंत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही विययाची चव चाखता आलेली नाही. भारताकडून मिळालेल्या ३०१ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ ४७ षट्‌कांत सर्व गडी गमावत २२४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कर्णधार मिस्बाह-उल-हक व अहमद शेहजाद सोडल्यास इतर एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्याने त्यांना विश्व चषकात भारताविरुद्ध आणखी एका पराभवास सामोरे जावे लागले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हॅरिस सोहेलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना अहमद शेहजादच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली. रविचंद्र अश्विनने हॅरिस सोहेलला (३६) सुरेश रैनाकरवी झेल बाद करीत टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. सलामीवर अहमद शेहजाद याला उमेश यादवने ४७ धावांवर बाद केले. रवींद्र जडेजाने अहमद शेहजादचा अप्रतिम झेल टीपला. शोएब मकसूद आणि उमर अकमल जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही. दोघानाही आपले खातेही खोलता आले नाही. ५ बाद १०३ अशा स्थितीतून कर्णधार मिस्बाह-उल-हक आणि शाहिद आफ्रिदी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना ४६ धावा जोडल्या. मोहम्मद शामीने आफ्रिदीला बाद करीत जमत चाललेली ही जोडी फोडत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. त्याने आफ्रिदीला (२२) कोहलीकरवी झेल बाद केले. त्यानंतर मिस्बाहने एक बाजू सावरून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने त्यांचा डाव २२४ धावांवर संपुष्टात आला. शामीच्या गोलंदाजीवर झेल बाद होण्यापूर्वी मिस्बाहने ९ चौकार आणि १ षट्‌कारच्या साहाय्याने ७६ धावा जोडल्या. भारतातर्फे भेदक मारा करताना मोहम्मद शामीने ३५ धावांत ४ गडी बाद केले. उमेश यादव व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी २ तर रवींद्र जडेजाने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरविताना विराट कोहली, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी दमदार खेळी करीत ७ गडी गमावत ३०० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभरली. भारताचीही सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा (१५) सोहिल खानच्या गोलंदाजीवर मिस्बाहकडे झेल देऊन परतला. परंतु त्यानंतर उपकर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी डाव सावरताना दुसर्‍या विकेटसाठी १२९ धावांची भागिदारी केली. कर्णधार मिस्बाहने धवनला धावचित करीत ही जोडी फोडली. धवन ७ चौकार आणि १ षट्‌काराच्या साहाय्याने ७६ चेंडूत ७३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर विराट कोहलीने ८ चौकारांच्या साहाय्याने १२६ चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी करताना सुरेश रैनाच्या साथीत तिसर्‍या विकेटसाठी ११० धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. रैनाने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षट्‌कारांच्या साहाय्याने ७४ धावा जोडल्या. कर्णधान धोनीने १८ धावांचे योगदान दिले.
भारताचा आता पुढील सामना २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
भारत ः रोहित शर्मा झेल मिस्बाह-उल-हक गो. सोहील खान १५, शिखर धवन धावचीत मिस्बाह-उल-हक ७३, विराट कोहली झेल उमर अकमल गो. सोहील खान १०७, सुरेश रैना झेल हॅरिस सोहेल गो. सोहील खान ७४, महेंद्रसिंह धोनी झेल मिस्बाह-उल-हक गो. सोहील खान १८, रवींद्र जडेजा त्रिफळाचीत वहाब रईज ३, अजिंक्य रहाणे त्रिफळाचीत सोहील खान ०, रविचंद्र अश्विन नाबाद १, मोहम्मद शामी नाबाद ३.
अवांतर: ६. एकूण ५० षट्‌कांत ७ बाद ३०० धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १/३४ (रोहित शर्मा, ७.३), २/१६३ (शिखर धवन, २९.५), ३/२७३ (विराट कोहली, ४५.२), ४/२८४ (सुरेश रैना, ४७.३), ५/२९६ (रवींद्र जडेजा, ४९.०), ६/२९६ (महेंद्रसिंह धोनी, ४९.१), ७/२९६ (अजिंक्य रहाणे, ४९.२)
गोलंदाजी: मोहम्मद इरफान १०/०/५८/०, सोहील खान १०/०/५५/५, शाहिद आफ्रिदी ८/०/५०/०, वहाब रईज १०/०/४९/१, यासिर शाह ८/० /६०/०, हॅरिस सोहेल ४/०/६/०.
पाकिस्तान ः अहमद शेहझाद झेल रवींद्र जडेजा गो. उमेश यादव ४७, युनुस खान झेल महेंद्रसिंह धोनी गो. मोहम्मद शामी ६, हॅरिस सोहेल झेल सुरेश रैना गो. रविचंद्र अश्विन ३६, मिस्बाह-उल-हक झेल अजिंक्य रहाणे गो. मोहम्मद शामी ७६, शोएब मक्सूद झेल सुरेश रैना गो. उमेश यादव ०, उमर अकमल झेल महेंद्रसिंह धवन गो. रवींद्र जडेजा ०, शाहिद आफ्रिदी झेल विराट कोहली गो. मोहम्मद शामी २२, वहाब रईज झेल महेंद्रसिंह धोनी गो. मोहम्मद शामी ४, यासिर शाह झेल उमेश यादव गो. मोहित शर्मा १३, सोहील खान झेल उमेश यादव गो. मोहित शर्मा ७, मोहम्मद इरफान नाबाद १.
अवांतर: १२. एकूण ४७ षट्‌कांत सर्व बाद २२४ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १/११ (युनुस खान, ३.२), २/७९ (हॅरिस सोहेल, १८.०), ३/१०२ (अहमद शेहझाद, २३.२), ४/१०२ (शोएब मक्सूद, २३.४), ५/१०३ (उमर अकमल, २४.४), ६/१४९ (शाहिद आफ्रिदी, ३४.१), ७/१५४ (वहाब रईज, ३४.४), ८/२०३ (यासिर शाह, ४२.५), ९/२२० (मिस्बाह-उल-हक,४५.४), १०/२२४ (सोहील खान, ४७.०)
गोलंदाजी: उमेश यादव १०/०/५०/२, मोहम्मद शामी ९/१/३५/४, मोहित शर्मा ९/०/३५/२, सुरेश रैना १/०/६/०, रविचंद्र अश्विन ८/३/४१/१, रवींद्र जडेजा १०/०/५६/१.
विश्व चषकात पाकिस्तानविरुद्ध शतक नोंदविणारा विराट पहिला भारतीय
विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत पाकस्तान विरुद्ध शतक नोंदविणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. १०७ धावांची खेळी करताना विराट कोहलीने सचिनचा वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धच्या सामन्यातील सर्वाधिक ९८ धावांचा विक्रम मोडीत काढला. सचिनने २००३च्या विश्व चषकात पाकिस्तानविरुद्ध ९८ धावांची खेळी केली होती.
तसेच विराटने एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ शतके झळकावत सौरव गांगुलीच्या शतकांचीही बरोबरी केली. विराट कोहली हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने ऍडलेडच्या मैदानावर तीन कसोटी शतके आणि एकदिवसीय सामन्यातले एक अशी चार शतके झळकावली आहेत.

विश्व चषकात भारत पाकविरुद्ध अपराजित
विश्व चषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला अजून एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही. यापूर्वी भारत-पाकिस्तान सर्व प्रथम १९९२च्या विश्व चषकात आमने-सामने आले होते. या स्पर्धेत पाकिस्तान जगज्जेते ठरले, पण साखळी सामन्यात त्यांना भारताचा पराभव करता आला नाही. त्यानंतर भारतात झालेल्या १९९६च्या विश्व चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला. त्यानंतर १९९९च्या विश्व चषकात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात करीत विजयाची हॅट्‌ट्रिक केली. तर पुढे २००३ आणि २०११मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धचा वियजी ट्रॅक चालूच ठेवला होता.
टीम इंडियावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
ऍडलेड ओव्हलमध्ये विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तानवर मात करीत आपली वियजी परंपरा कायम राखलेल्या टीम इंडियाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ः टीम इंडियाला विश्व चषक स्पर्धेतील शुभारंभी लढतीत विजयी मिळविल्याबद्दल शुभेच्छा. आम्हाला विश्वास आहे की, आपले यश आगामी सामन्यांमध्येही कायम राहिल.
शिवराज सिंह चौहान ः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यादव यांनी टीम इंडियाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. हा विजय भारताचा सन्मान वाढविणारा आहे. भारतीय खेळाडूंनी आकर्षक कामगिरी करीत देशाचा सन्मान वाढविला आहे.
ममता बॅनर्जी ः पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरील आपल्या शुभेच्छा संदेशात लिहिलेय की, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा भारताचा सामना पहायला जरूर जाते. भारतीय संघाने विश्व चषकाची सुरुवात शानदार केली आहे. शुभेच्छा.
या शिवाय केंद्रीय राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड, शशी थरूर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, शाहरूख खान, लता मंगेशकर, अजय देवगण, बीग बी अमिताभ बच्चन, अनुपम खेर व अन्य बॉलीवूड, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी संघाला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.