पुणे सिटी अव्वल

0
82

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात एफसी पुणे सिटीने काल बुधवारी जमशेदपूरवरील २-१ अशा विजयासह गुणतक्त्यात आघाडी घेतली. मध्यंतराची एका गोलची पिछाडी भरून काढताना पुण्याने उत्तरार्धात चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत विजय खेचून आणला. गुरतेज सिंग (६२वे मिनिट) आणि एमिलियानो अल्फारो (६६वे मिनिट) यांनी हे गोल केले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच चार सामन्यांच्या निलंबनानंतर परतले. त्यांच्यासह ६६१२ चाहत्यांसाठी हा निकाल आनंददायक ठरला. पुण्याने १२ सामन्यांत सातवा विजय मिळविला. एक बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पुण्याचे सर्वाधिक २२ गुण झाले. चेन्नईन एफसी (२०) व बेंगळुरू एफसी (२१) यांना मागे टाकत पुण्याने दोन क्रमांक प्रगती केली. बंगळुरू व चेन्नईचे प्रत्येकी ११ सामने झाले आहेत. जमशेदपूरला १२ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. चार विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह १६ गुण मिळवून त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले. वेलिंग्टन प्रिओरीने (२९वे मिनिट) जमशेदपूरचे खाते उघडले होते.