सायना नेहवालचा चीनच्या युफेईला धक्का

0
86

भारताच्या सायना नेहवालले इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत काल विजयी सलामी दिली. सायनाने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन युफेई हिला २२-२४, २१-१५, २१-१४ असे हरविले. चीनी प्रतिस्पर्धीपेक्षा क्रमवारीत केवळ दोन स्थाने खाली असूनही सायनाला या स्पर्धेसाठी कठीण ‘ड्रॉ’ देण्यात आला होता. परंतु, तरीसुद्धा सायनाने याची पर्वा न करता आपल्या १९ वर्षीय प्रतिस्पर्ध्याला नमविले. दुसर्‍या फेरीतही सायनाचा सामना चीनच्या १९ वर्षीय प्रतिस्पर्ध्याशीच होणार आहे. या फेरीत सायनाला जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर असलेल्या चेन शियावझिन हिच्याशी दोन हात करावे लागतील.

द्वितीय मानांकित पी.व्ही. सिंधू हिला विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. केवळ ३४ मिनिटांत तिने इंडोनेशियाच्या हॅना रामदिनी हिला २१-१३, २१-१० असे हरविले. दुसर्‍या फेरीत तिचा सामना गोह जेन वेई या मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने आठव्या मानांकित तेकुतो इनोयू व युकी कानेको या जपानी जोडीला २१-१५, २१-१७ असे स्पर्धेबाहेर फेकले. पुरुष एकेरीत समीर वर्मा व पारुपल्ली कश्यप तर पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीथ रेड्डी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. समीरला जपानच्या काझुमासा साकाय याने २१-१६, १२-२१, २१-१० असे तर कश्यपला वेई फेंग चोंग याने २-१८, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये धक्का देत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. अत्री व रेड्डी जोडीला लु चिंग याओ व यांग पो हान या तैवानी जोडीने २१-१८, १६-२१, २१-१६ असे पराजित केले.