पीडित मुलीची होणार ‘बोन टेस्ट’

0
111

>>आमदार बाबूश बलात्कार प्रकरण

सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी कथित बलात्कार केलेल्या पीडित मुलीची गुन्हा अन्वेषण पोलीस ‘बोन टेस्ट’ करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडितेचे दोन जन्मदाखले सापडल्याने तिचे नक्की वय जाणून घेण्यासाठी ही चाचणी करण्यात येणार आहे.

या प्रकरणाचे तपासकाम करणार्‍या एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, पीडित मुलीच्या जन्मतारखेच्या चौकशीदरम्यान दोन जन्मदाखले सापडले आहेत. त्यामुळे तिची नक्की जन्मतारीख समजणे कठीण झाले आहे. याचा छडा लावण्यासाठी बोन टेस्ट करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर तिचे नक्की वय किती हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या दोन्ही जन्मदाखल्यांनुसार ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बालहक्क व महिलांची तस्करी रोखण्यासाठी काम करणार्‍या बिगर सरकारी संघटनांच्या प्रतिनिधींची काल पणजीत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी नवी दिल्लीतील नेपाळ उच्चायुक्तांना पत्र लिहिण्याचा निर्णय झाला. पीडित मुलीला योग्य न्याय मिळावा तसेच तिचे पुनर्वसन व्हावे यासाठी राज्य महिला आयोगालाही पत्र सादर करण्याचे ठरले. पीडितेची सुरक्षा, पुनर्वसन व तक्रारीचा पाठपुरावा योग्य तर्‍हेने व्हावा म्हणून उत्तर गोवा बालकल्याण समितीला कळविण्याचा निर्णय झाला.

मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे टाळले
आमदार बाबूश मोन्सेर्रात कथित बलात्कार प्रकरणी सुरू असलेल्या तपासकामाविषयी काल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ‘‘त्या तक्रारीच्या किंवा तपासकामाबाबत आपण काही बोलू इच्छित नाही. आपण एवढेच सांगू शकतो की, गुन्हा अन्वेषण पोलीस चांगले काम करीत आहेत.’’ सचिवालयात पार्सेकर यांना पत्रकारांनी छेडले असता ते उतरले.