पावसाच्या कविता ः शोध अर्थाचा, वेध रंगांचा

0
974
 डॉ. पांडुरंग फळदेसाई
पाऊस म्हणजे एक जीवनगाणे. तो येतो आणि जातो. परंतु येताना वाजत-गाजत येतो. जातानाही कधी गडबड-गोंधळ घालतो, नपेक्षा अलगद काढता पाय घेतो. चराचराला सुखावून जातो. मनामनांत सृजन पेरून जातो. या विश्‍वाचे कालचक्र आणि ऋतुचक्र संतुलित करण्याची किमया साधतो. त्यासाठीच सर्वांना त्याचे अप्रूप.
पाऊस म्हणजे ऋतुचक्राचे एक मुक्त रूप. साजिरे, गोजिरे, कधी अवखळ, कधी भन्नाट, कधी रुसलेले, कधी हसलेले, कधी वेडेपिसे, कधी शहाणे, कधी उसासलेले, कधी उधाणलेले… सार्‍या चराचराला हवेहवेसे वाटणारे. मानवी मनाला हळवेपणाने भिजवणारे. असंख्य भावना रुजविणारे. तरारू पाहाणार्‍या सृष्टीची स्वप्ने घेऊन येणारा पाऊस आता आपल्या घराघरांवर बरसू लागला आहे. थेंबांचे थवे सुसाट सुटलेत. आता ते धरित्रीच्या गात्रागात्रांत थंडाव्याचा शिडकावा करतील. अनंताकडून आणलेला सृजनाचा संदेश तिला देतील आणि मग धरित्री तरारून उठेल. सर्वांगांनी शृंगारेल. अथांग आकाशाला कवेत घेण्यासाठी उभारून येईल. पण या पावसाच्या आगमनाची किती म्हणून वाट पाहायची.
आकाशभर ढग भरूनही
पावसाचं आगमन लांबलेलं
तुझं येणं नसलं तरी
मन वाट पहात उगाच थांबलेलं
वाट पाहाण्याची शिक्षा ज्यांनी ज्यांनी आजवर अनुभवली त्यांनाच त्या प्रतीक्षेतील व्यथा कळली. इथे तर संपूर्ण आसमंतच तृषार्त आहे. व्याकूळ आहे. मग पावसाने तरी का म्हणून इतके आडेवेढे घ्यायचे.
तहानलेल्या त्या धरतीलाही
आता चिंब चिंब भिजायचं
पहिल्या पावसाच्या थेंबांनी
एवढं का मग लाजायचं
गोव्यात पावसाची चाहूल उधाणलेला समुद्र घेऊन येतो. मग सगळ्यांचीच पावले समुद्राकडे वळतात. दर्याकिनारी थबकतात- समुद्रस्नानासाठी. मात्र ऋतुचक्राच्या अव्याहतपणाचा वेध घेणार्‍या कविमनाला ही पावसाची चाहूल खूप काही आठवत राहाते…
येणार्‍या पावसाची लागली आहे चाहूल
पुन्हा त्या किनार्‍याकडे वळते आहे पाऊल
साठवलेले सारे काही बरसणार
बरसून पुन्हा त्या सागरास मिळणार
पुन्हा साठवण्यासाठी
पुन्हा आठवण्यासाठी
बघता बघता आभा दाटून येते. ढगांचे पंख लेवून सज्ज झालेला पाऊस वार्‍याच्या वारूवर स्वार होऊन विजेच्या लखलखाटात अवतरतो. म्हणून कवी मंगेश पाडगावकरांना त्याची आणि अंधाराची गहनता जाणवते.
मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे
क्षणभर प्राण उजळणार्‍या विजेच्या लख्ख प्रवाहात गहन-गंभीर भासणारा अंधार विरता विरेना. मात्र या अंधारात जणू आकाशच वाकवून धरतीने चुंबन देऊ केले आहे. ना. धों. महानोरांना हे वाकलेले आकाश स्वच्छपणे दिसते.
मन चिंब पावसाळी
झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी
आकाश वाकलेले
पाऊस मग तिच्या आठवणीत बरसत राहातो. आलिंगनाच्या आर्ततेत झुरत राहातो. कारण दोघांमधले अंतर काही मिटता मिटत नाही.
तिच्या आठवणीत तो
बरस बरस बरसला
कुंपणाच्या आत तीही व्याकूळ
दोन रेघा तिच्याही गालावर रेंगाळल्या
उधाणलेल्या दर्याचा अनाहत नाद कानात साठवत काहीजण अनावर तृप्ती भोगतात. शंकर रामाणींसारख्या प्रतिभावंत कवीचे शब्द आठवतात-
माझ्या उन्हाळ्याच्या उघड्या खिडकीला
मी लावले आहेत धुंवाधार पडदे
अनाहत कोसळणार्‍या आषाढाचे
आषाढ कोसळत असतो धुंवाधार. मग सर्वत्र लगबग सुरू होते. कारण पाऊस सृजनाचा सांगावा घेऊन आलेला असतो. धरित्रीला सश्य-श्यामला करतानाच चराचराच्या अन्नपाण्याची त्याला काळजी असते. सर्वांची भूक भागविण्याचे आणि तहान शमविण्याचे व्रत त्याने स्वीकारलेले असते. म्हणून बहिणाबाई चौधरी लगबगीने भान आणून देतात-
पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी
ढोराच्या चारनी
कोटी पोटाची भरनी
बाकीबाब बोरकरांच्या कानात समुद्रराग रुंजी घालू लागतो. त्या रागाच्या तालावर डोलणार्‍या मनात कोवळा भाव अंकुरायला लागतो. असंख्य रंगछटांनी अवतरणारा, सहस्रावधी भाव-भावनांनी सर्वदूर पसरत जाणारा पाऊस बोरकरांनी कित्येक कवितांमधून शब्दबद्ध केलेला आहे.
पावसात जागला, समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते , भरून भाव कोवळा
समुद्राच्याच लाटा भावविभोर होऊन कोवळा भाव जागवतात असे नव्हे; तर आपल्यामधला प्रत्येकजण पावसाकडून अपेक्षा करतो. त्याची प्रतीक्षा करतो. त्याची आर्जवं करतो. बालपणात तर आम्ही ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ म्हणून लालूच दाखवत बोलवायचो. मोठा पाऊस यायचा आणि भरलेले मडकेदेखील वाहून न्यायचा. इंग्रजीत मात्र त्याला येऊ नको म्हणून का सांगितलं जातं ते मात्र कळत नाही. बालपणातल्या गाण्यांची सुरुवातच मुळात ‘रेन रेन गो अवे, कम अगेन अनदर डे’ अशी पाऊस टाळण्याची असायची. हे कोडे काही आजवर सुटले नाही. पण आमच्या बालपणातला, तरुणपणातला आणि प्रौढपणातला पाऊस हा हवाहवासा वाटणारा. न मागताच बरंच काहीतरी देऊन जाणारा असा आठवत राहातो. म्हणूनच स्पृहा जोशीच्या शब्दात सांगायचं तर-
बरंच काही
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो
सोडून जातो धुंवाधार
आसुसलेलं थबकलेलं
बरंच काही
मोकळं मोकळं करून जातो.
पण आपल्या मनातलं
सारं सगळं शहाण्यासारखं समजून घेतो
पावसाचा एक गुणधर्म जगातल्या प्रत्येकाने अनुभवलेला. तो म्हणजे त्याच्या आगमनाने पराकाष्ठेची विरहभावना व्याकूळ करून सोडते. तो विरह, ती व्याकूळता अनंत काळापासून माणूस अनुभवत आला आहे. कवी आणि लेखक हे शब्दप्रभू असल्याने ती भावना शब्दात पकडण्याची किमया अनेकांनी साधली आहे. प्रत्येकाची अनुभूती वेगळी असली तरी तिची जातकुळी एकच. तो असो किंवा ती- उभयतांच्या मनाची अवस्था एका अनावर विरहाची. व्याकूळतेतून जन्मलेल्या अधीरतेची.
जुना तो पाऊस
पुन्हा बरसतोय होऊन नवा
धुंद अशावेळी
सहवास तुझा मजला
पुन्हा नव्याने हवा
ही अनावर ओढ बरसणार्‍या पावसात भिजूनही पूर्ण होत नाही.
तुझ्यासोबत भिजताना
प्रेमाचा उधाण पाऊस
मनातही दाटत असतो
तू सोबत नसताना
आठवणींच्या रूपात तोच पाऊस
मला पुन्हा पुन्हा भेटत असतो.
त्याची आणि तिची भेट म्हणजे कधीच संपू नये अशी प्रेमसंध्या असते. त्या प्रेमभावनेच्या तंद्रीत भाव-भावनांचा पाऊस रिमझिमत असतो. आणि चिरतरुण स्वप्नांच्या झुल्यावर ती दोघे अळंग झुलत असतात. सर्वांगात पोरपंखी स्पर्श घेऊन परस्परांसाठी झुरत असतात.
बरसतो वर्षाऋतू
चिंब ओला उधाणलेला
मनी नवस्वप्नांचा
अविरतसा झुलतो झुला
त्याला खरे तर वेगळेच सांगायचे असते. तो सांगणारही होता. परंतु परस्परांची दृष्टीभेट झाली आणि शब्द ओठातच विरले.
पावसाची पहिली सर बरसण्याआधी
नुकताच हरवलो होतो तुझ्या आठवणींत
थेंब उतरले आणि सांगूनच गेले
तू देखील मला अजूनही विसरली नाहीस
स्वप्नांच्या झुल्यावर झुलता झुलता किती वेळ संपून गेला याची तमा त्यांना नव्हती. मात्र भानावर आली तेव्हा दोघांनाही वाटत होतं-
मनाचा सांगावा शब्दांत बांधावा
प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा
पाऊस थांबलेला. चिंब मनाने परस्परांचा निरोप, पुन्हा भेटण्याचा शब्द देऊन. मात्र जेव्हा जेव्हा नभ दाटून येते तेव्हा त्याना भेटीवेळच्या पाऊसधारा मनोमन आठवतात आणि त्यांचे गाणे बनते. पावसाचे गाणे…
बरसतील धुंद आता पाऊसधारा
भिजेल चिंब चिंब आसमंत सारा
तहानलेल्या मनांना सुखाविल
टपटप थेंबांचं येणं
धरती ही गाईल मग
पावसाचं गाणं
पावसाचे गाणे मनात घोळवितानाच पुनर्भेटीची आस लागते. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती. बाहेर पाऊस शिरशिरतो आणि तिचे डोळे पाणावतात. भेटीच्या आवेगाने अश्रू ओघळू लागतात-
पावसात
तुजं पाहण्या डोळ्यांचे तरसणे
थेंबांच्या सोबतीने
अश्रूंचेही मग मनसोक्त बरसणे
त्याच्या गावीदेखील पाऊस बरसत असतो. आतून तोच बरसतो त्या पाऊसधारांना पाहात-
तो बरसतच असतो
अधून मधून
माझेही डोळे पाणावतात
ती संधी साधून
त्याला सतत ती आठवत असते. इतक्या आठवणी दाटून येतात की त्याला तीच सोबत असल्याचा भास सतत होत असतो.
आयुष्याच्या प्रत्येक ऋतूमध्ये
तू माझ्यासोबत असतेस
खरंच म्हणजे
अगदी पावसाच्या थेंबातूनही
तूच बोलत असतेस
म्हणून तो आता दुसर्‍या पावसाळ्याची वाट पाहू लागतो. पण प्रतीक्षा संपेना. आणि मग एके दिवशी अचानक-
ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट
गारठलेल्या संध्याकाळी हिरवी चिंब पायवाट
कोणी धावताना धडपडतोय
कोणी कोणाला सावरतोय
कोणी सखीचा हात धरताना
मनातल्या मनात बावरतोय
पाऊस धरतीला कवेत घेतो आणि मृद्गंधाचा दरवळ आसमंतात भरून राहातो. धरतीच्या उरीपोटीची धग निवायला लागते आणि तिच्या मनात हिरवे स्वप्न उभारी घेऊ लागते-
पहिल्या पहिल्या पावसात
शिवार दरवळतं नव्या सुगंधात
हिरवंगार एक स्वप्न उभारी घेतं
धरतीच्या मनात
हलक्या सरीनी पाऊस बरसत राहातो आणि मनाच्या सांदिकोपर्‍यात मिटवून ठेवलेल्या आठवणी ओथंबून येतात. आता सगळेच अनावर होते.
कोसळतोय तो पाऊस
हलक्या सरींनी
सोनेरी त्या उन्हात
रिमझिम पाऊस तुझ्या प्रेमाचा
ओथंबून बरसतोय
अगदी तसाच माझ्या मनात
आठवणींचा हा पाऊस असाच बरसत असतो प्रत्येकाच्या मनात. म्हणूनच तो सर्वांना हवाहवासा वाटणारा. निळ्या आकाशात काळे ढग जमा होऊ लागले की आपण आतूर होतो.
निळ्या आकाशात गर्द काळे ढग
पुन्हा गर्दी करून दाटतील
आठवणी तुझ्या माझ्या मनात
नव्याने संसार थाटतील
पाऊस म्हणजे एक जीवनगाणे. तो येतो आणि जातो. परंतु येताना वाजत-गाजत येतो. जातानाही कधी गडबड-गोंधळ घालतो, नपेक्षा अलगद काढता पाय घेतो. चराचराला सुखावून जातो. मनामनांत सृजन पेरून जातो. या विश्‍वाचे कालचक्र आणि ऋतुचक्र संतुलित करण्याची किमया साधतो. त्यासाठीच सर्वांना त्याचे अप्रूप.
(काही संदर्भ ः मराठी चित्रकविता डॉट कॉम)