आणीबाणीच्या कालखंडाचा प्रत्यक्षदर्शी इतिहास ‘सेव्हिंग इंडिया फ्रॉम इंदिरा’

0
127

एडिटर्स चॉइस

  • परेश प्रभू

आणीबाणीवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, परंतु ‘सेव्हिंड इंडिया फ्रॉम इंडिया’ या ताज्या पुस्तकाला महत्त्व आहे, कारण ते इंदिरा गांधींविरुद्ध राजकीय व न्यायालयीन लढाई लढलेल्या राजनारायण यांचे जवळचे मित्र व सुरवातीपासूनचे वकील जे. पी. गोयल यांच्या त्या कालखंडाच्या आठवणींचे संकलन आहे. आणीबाणीला येत्या २५ जूनला ४४ वर्षे होत आहेत, त्यानिमित्ताने –

दिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी लादून नागरी स्वातंत्र्य काही काळासाठी हिरावून घेतले, त्याच्या कटू आठवणी येत्या २५ जूनला पुन्हा ताज्या होतील, कारण १९७५ साली २५ जूनच्या रात्रीच देशात आणीबाणी लागू झालेली होती. जनतेचे घटनादत्त अधिकार हिरावून घेतले गेले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, वृत्तपत्रस्वातंत्र्याची अभूतपूर्व गळचेपी झाली, संसद, नोकरशाही न्यायपालिका आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे चारही स्तंभ जणू काही काळ ढासळून पडले, तो हा या देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड.

आणीबाणीवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, अनेकांनी आपले त्या काळातील अनुभव सांगितले, आठवणी लिहिल्या. स्वतः जयप्रकाश नारायण यांची तुरुंगातील डायरीही प्रसिद्ध झालेली आहे. मात्र आता एका नव्या पुस्तकाची त्यात भर पडली आहे, जे लिहिणारी व्यक्ती केवळ त्या ऐतिहासिक घटनांची साक्षीदारच नाही, तर तिचे तोे इतिहास घडवण्यामध्ये योगदान राहिले आहे. या व्यक्तीचे नाव आहे, जे. पी. गोयल. हे नाव जरी तसे अपरिचित वाटले तरी ज्या ऐतिहासिक खटल्यामध्ये इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरवली गेली आणि त्याची परिणती त्यांच्याकडून देशात अंतर्गत आणीबाणी लादण्यात झाली, तो खटला दाखल करणारे इंदिरा गांधींचे तेव्हाचे राजकीय प्रतिस्पर्धी राजनारायण यांचे गोयल हे वकील होते. म्हणजे या व्यक्तीच्या आठवणी किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला कळून चुकेल. गोयल आज हयात नाहीत, परंतु त्यांच्या कन्या रमा गोयल यांनी त्यांनी त्या काळात लिहून ठेवलेल्या आठवणी संपादित करून प्रकाशित करून आणीबाणीसंबंधी ही अधिकृत माहिती समोर आणली आहे. रूपा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले हे नवे पुस्तक आहे, ‘सेव्हिंग इंडिया फ्रॉम इंदिरा’.

राजनारायण यांच्या वतीने खटला लढवणारे दुसरे वकील शांतीभूषण (जे पुढे मोरारजी सरकारमध्ये कायदामंत्रीही झाले) यांच्या आठवणी त्यांचे पुत्र व ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी ‘द केस दॅट शूक इंडिया’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी लिहिले आहे. मात्र, त्या पुस्तकात दिली गेलेली माहिती वस्तुस्थितीला धरून नाही असे गोयल यांचे म्हणणे आहे. जे. पी. गोयल यांनी आपल्या या पुस्तकामध्ये त्यातील अनेक गोष्टींचे खंडन तर केले आहेच, परंतु राजनारायण यांचा खटला चालवताना शांतीभूषण यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेला आपण कसकसा विरोध केला होता व का केला होता तेही सांगितले आहे. गोयल हे स्वतः लोहियांचे अनुयायी होते. शिवाय राजनारायण यांचे मित्र आणि वकील होते. तो ऐतिहासिक खटला लढण्यासाठी शांतीभूषण यांचे नाव गोयल यांनीच राजनारायण यांना सुचवले होते व त्यांच्या जोडीने स्वतःही त्यात राजनारायण यांची बाजू लढवली होती. त्यामुळे या सार्‍या प्रतिपादनाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते.

७० साली इंदिरा गांधींनी ‘गरीबी हटाव’चा नारा दिला. लोकसभेची निवडणूक खरे तर फेब्रुवारी १९७२ मध्ये व्हायची होती, परंतु इंदिरा गांधींना स्वतःच्या लोकप्रियतेविषयी एवढा आत्मविश्वास वाटत होता की त्यांनी २७ डिसेंबर १९७० रोजीच लोकसभा विसर्जित करायला लावून एक वर्ष आधीच म्हणजे फेब्रुवारी १९७१ मध्ये निवडणुका घ्यायला लावल्या.

७१ च्या या निवडणुकीपासून आणीबाणीची ही कहाणी सुरू होते, कारण त्या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे बहुमत मिळाले, स्वतः इंदिरा गांधी राजनारायण यांना पराभूत करून रायबरेलीमधून निवडून आल्या, तरी त्यांनी अवैध मार्गांचा अवलंब केल्याचा व सरकारी यंत्रणेचा निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप करून राजनारायण यांनी त्या निवडीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्या ऐतिहासिक खटल्यामध्ये इंदिरा यांना दोषी धरले. त्या परिस्थितीची परिणती म्हणून इंदिरा गांधींनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू करून स्वातंत्र्याची गळचेपी केली. रातोरात कायदे बदलले, देशामध्ये हाहाकार माजवला. पुढे ती न्यायालयीन लढाई आणीबाणीतही सर्वोच्च न्यायालयात सुरू राहिली.
हा सारा कायदेशीर लढा मुळीच सोपा नव्हता. त्यामध्ये अनेक वाटा, पळवाटा, वळणे आली, ज्याच्याविषयी अत्यंत अधिकारवाणीने सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे श्री. गोयल, कारण त्यांनीच राजनारायण यांची बाजू यावेळी हिरीरीने लढवली. शांतीभूषण हे राजनारायण यांच्या वतीने मुख्य वकिलाची भूमिका जरी बजावत होते, तरी गोयल हे राजनारायण यांना अधिक जवळचे होते. त्यामुळे हा सारा कायदेशीर संघर्ष, त्यासाठी झालेली धडपड आणि सरतेशेवटी इंदिरा गांधींच्या दमनपर्वाचा झालेला अंत अशी ही या देशाच्या इतिहासातील अत्यंत नाट्यमय कालखंडाची कहाणी या पुस्तकात आपल्याला तपशिलाने वाचायला मिळते.

इंदिरा गांधींना वाचवण्यासाठी रातोरात निवडणूक कायदा, लोकप्रतिनिधी कायदा कसा बदलला गेला, ३९ वी घटनादुरुस्ती कशी केली गेली, ३२९ व्या कलमाला ३२९ अ कलम कसे घुसडले गेले, सुनावणीच्या आधल्या रात्री राष्ट्रपतींची मंजुरी कशी मिळवली गेली, सर्वोच्च न्यायालयामध्येही कसकशा खेळी खेळल्या गेल्या, न्यायाधिशांवर कसा दबाव आणला गेला, संविधानामध्ये दुरुस्त्या करीत असताना त्याचा मूलभूत गाभा बदलता येणार नाही हा जो १९७३ चा केशवानंद भारती निवाडा आजही संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्राणभूत मानला जातो, त्या निवाड्याला बदलण्याचे कसे प्रयत्न झाले आणि सर्वोच्च न्यायालयात १३ सदस्यीय पूर्ण पीठासमोर ते हाणून पाडण्यासाठी गोयल यांनी केलेली अतोनात धडपड, नानी पालखीवालांनी बाजू लढवावी यासाठी गोयल यांनी केलेले यशस्वी प्रयत्न, त्यानंतर पालखीवालांनी न्यायालयात तब्बल दीड दिवस केलेला संस्मरणीय युक्तिवाद, त्यातून मिळालेला मोठा विजय आणि त्यानंतरही केशवानंद खटल्याचा निवाडा बदलून त्याचा इंदिरा गांधींना लाभ मिळवून देण्यासाठी झालेले प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गोयल यांनी हैदराबादपर्यंत जाऊन केलेले प्रयत्न ही सगळी कहाणी वाचनीय तर आहेच, परंतु या देशाची लोकशाही टिकवण्यात असलेले त्या प्रयत्नांचे महत्त्व जाणवून देणारीही आहे. या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईचा बारीकसारीक तपशील गोयल यांनी या पुस्तकात दिला असल्याने त्याचे ऐतिहासिक मोल वाढते.

प्रत्येक टप्प्यावर या कायदेशीर लढाईने कसकशी वळणे घेतली आणि त्यामध्ये भारतीय लोकशाहीचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी कसकशी धडपड करावी लागली हे सारे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निवाडा व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलेली स्थगिती याविषयीची माहिती सर्वज्ञात आहे, परंतु त्याच्या मध्ये कधी काय घडले, कसे घडले हा जो तपशील आहे तो देशाला माहीत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने हे पुस्तक वाचायलाच हवे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा १२ जून ७५ ला आला आणि त्यात इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरवली गेली, परंतु त्या निवाड्याला इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळवू नये यासाठी तातडीने गोयल यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करण्याची व्यवस्था केली, परंतु दीड तासातच त्यांना समजले की उच्च न्यायालयाने आपल्याच निवाड्याला वीस दिवस स्थगिती दिलेली आहे. पुढे आणीबाणी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या खटल्याला पुढे नेताना गोयल यांनी केलेला संघर्ष, प्रसंगी शांतीभूषण यांच्याशीच वेळोवेळी झालेली असहमती, त्यामुळे नाराज होऊन या खटल्यातून अंग काढून घ्यायची इच्छा तुरुंगात असलेल्या राजनारायण यांच्यापाशी व्यक्त करताच त्यांनी ‘तुम हमे छोडके कहॉं जाओगे | मरेंगे तो सब मरेंगे’ या त्यांच्या भावनिक वाक्यामुळे घेतलेली माघार, या सार्‍याची माहिती कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे.

आणीबाणी लावली गेली त्या २६ जूनच्या पहाटे राजनारायण यांच्या घरी कसा छापा पडला, एकामागून एका नेत्याला कशी अटक झाली, अवघा देश तुरुंगात कसा रुपांतरित केला गेला हे सारे तपशील तर या पुस्तकात आहेतच, परंतु आणीबाणीत अटकेत टाकले गेलेले धुरंधर नेते जयप्रकाश नारायण आणि इतरांची तुरुंगात भेट घेण्याची संधी वकील या नात्याने गोयल यांनी वेळोवेळी मिळवली, त्या आठवणीही या पुस्तकामध्ये त्यांनी कथन केलेल्या आहेत. विशेष म्हणजे जयप्रकाश नारायण यांना इंदिरा सरकारने ‘स्लो पॉयझनिंग’ करून मारल्याचा संशय गोयल व्यक्त करतात. आजारी जयप्रकाश नारायणांनी गोयल यांच्यापाशी काढलेले ‘एज इज अगेन्स्ट मी’ असे काढलेले हताश उद्गार, जयप्रकाश नारायण यांची दोन्ही मूत्रपिंडे तुरुंगात असतानाच निकामी झाली तेव्हा त्यांच्यासाठी जनवर्गणी काढून डायलिसिस यंत्र विकत घेतले गेले. त्यांनी पाटण्यात राहणे पसंत केल्याने तेथील कार्यकर्त्यांना ते यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण दिले गेले आदी माहिती आपल्यालाही अस्वस्थ करते.

आणीबाणीनंतर झालेली ७७ ची निवडणूक ही विरोधी पक्षांनी नव्हे, तर जनतेनेच लढवली, कारण तुरुंगातून नुकतीच सुटका झालेल्या नेत्यांकडे तेव्हा पैसा नव्हता, पक्ष संघटना नव्हती, तरीही जनताच इंदिरा गांधींविरुद्ध लढली, असे गोयल म्हणतात ते सार्थ वाटते. त्या निवडणुकीत कॉंग्रेसची उत्तर भारतात जनतेने धूळधाण उडवली. उत्तर प्रदेशात जनता पक्षाला ८५ जागा मिळाल्या. बिहार, हरयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबसारख्या राज्यांत कॉंग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी १, बिहारमध्ये ३ आणि उडिसात ४ म्हणजेच उत्तरेकडील नऊ राज्यांत मिळून केवळ नऊ जागा कॉंग्रेसला तेव्हा मिळाल्या, मात्र दक्षिण भारतात कॉंग्रेसला बहुमत मिळाले होते. रायबरेलीत इंदिरा गांधींचा राजनारायण यांनी ५५२५० मतांनी पराभव केला. निवडणुकीत पराभूत होऊनही इंदिरा गांधींनी राजीनामा द्यायला दोन दिवस घेतले व त्या काळात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे व फायली नष्ट केल्या गेल्या असा संशय गोयल व्यक्त करतात.

नागरी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्रस्वातंत्र्य हे आपल्या लोकशाहीचे घटनादत्त अलंकार आहेत. ते पुन्हा कधीही हिरावले जाऊ नये असे वाटत असेल तर १९७५ ते १९७७ दरम्यानचा भारताचा राजकीय इतिहास अभ्यासणे अपरिहार्य आहे. त्या दृष्टीने गोयल यांचे हे पुस्तक म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा व विश्वसनीय दस्तऐवज आहे. रमा गोयल यांनी आपल्या पित्याच्या आठवणींना पूरक संपादकीय टिपांची अभ्यासपूर्ण जोड देत हे पुस्तक अधिक मौलिक बनविले आहे. आणीबाणीच्या येत्या स्मरणदिनाच्या निमित्ताने हे पुस्तक मिळवून जरूर वाचावे!