पर्रीकर पणजीतूनच पोटनिवडणूक लढविणार

0
89

>> सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पोट निवडणुकीसाठी जागा खुली करून देण्यासाठी पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर यांनी काल दुपारी विधानसभा भवनात जाऊन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. सभापतीनी तो स्वीकारला.

गेल्या फेब्रुवारीत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या विश्‍वजित राणे यांनी याआधीच राजीनामा दिला असल्याने आता पणजी व वाळपई मतदारसंघात बरोबरच निवडणूक होणार आहे. सप्टेंबरपर्यंत ही निवडणूक होणे आवश्यक आहे.
फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत विधानसभेवर भाजपचे फक्त १३ उमेदवार निवडून आले होते. गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्षांनी पर्रीकर मुख्यमंत्री होत असल्यास भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्यात आले व त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पणजीतून सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर यांच्या विरोधात युनायटेड गोवनचे बाबुश मोन्सेर्रात यांनी निवडणूक लढविली होती. त्यात कुंकळ्‌ळकर हजारभर मतांनी विजयी झाले. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना पाचशे मते घेणेही शक्य झाले नाही. पणजी मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटल्याने पर्रीकर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील यावर तर्क वितर्क सुरू होते. मात्र आता कुंकळ्‌ळकर यांनी राजीनामा दिल्याने पर्रीकर पणजीतून निवडणूक लढवतील हे निश्‍चित झाले आहे. प्रदेश भाजप लवकर यासंबंधीची अधिकृत घोषणा करणार आहे.
दरम्यानच्या काळात कुडचडेचे भाजप आमदार नीलेश काब्राल यांनीही आमदारकीचा राजीनामा देवून पर्रीकर यांना मतदारसंघ देण्याची तयारी दाखविली होती. काही दिवसांपूर्वी पर्रीकर यांनी कुडचडेचा विकास करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या क्षणीच पर्रीकर पणजीतून निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले होते. पर्रीकर यांच्याविरुध्द मोन्सेर्रात निवडणूक लढविण्याची शक्यता नाही.

राजकीय भवितव्याची
चिंता नाही : सिध्दार्थ
पर्रीकर देशाचे संरक्षणमंत्री होते. राज्याच्या हितासाठी त्यांनी वरील पदाचा त्याग केला. त्यामुळे आपण त्यांना जागा खुली करून देण्याचे यापूर्वीच सांगितले होते. आपण पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राजकीय भवितव्याची मला चिंता नाही, असे आमदारकीचा राजीनामा सादर केल्यानंतर सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर यांनी पत्रकारांना सांगितले. पर्रीकर यांना कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवावी म्हणून प्रस्ताव होता. आमदार काब्राल यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. परंतु पर्रीकर यांनी पणजीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले. कुंकळ्‌ळकर सभापतीना राजीनामा सादर करतेवेळी प्रदेश अध्यक्ष तेंडुलकर, माजी मंत्री महादेव नाईक व पक्षनेते सदानंद तानावडे उपस्थित होते.