पंचायत निवडणुकीत ओबीसींना २७ तर एसटीसाठी १२ टक्के आरक्षण

0
57

येत्या ११ जून रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के तर अनुसूचित जमातींना १२ टक्के एवढे आरक्षण देण्यात आले आहे. तर अनुसूचित जातींना १ टक्के (१५ जागा) एवढे आरक्षण देण्यात आलेले आहे, अशी माहिती पंचायतमंत्री मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी काल दिली.
पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी काल राज्यभरातील पंचायत सदस्यांनी सभा घेतली व पंचायतींनी स्वच्छ प्रशासन व विकासकामे यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. वारंवार सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणून सरपंच बदलण्याचे जे प्रकार घडत असतात ते बंद व्हायला हवेत व सरपंचांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करायला मिळायला हवा, असेही गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की पंचांनी भ्रष्टाचारापासून दूर रहायला हवे. स्वच्छ प्रशासन व विकासकामे हे पंचायतींचे ध्येय असायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गटविकास अधिकारी व पंचायत सचिव यांची दादागिरी यापुढे सहन केली जाणार नसून पंचायतींवर निवडून येणार्‍या सदस्यांनाच जादा अधिकार असायला हवेत अशी सरकारची भूमिका असल्याचे गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.
पंचायतींमध्ये १३ रोजी
स्वच्छता अभियान
येत्या १३ रोजी पंचायतींत स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी गुदिन्हो यांनी दिली व सर्व पंचायतींनी आपल्या पंचायत क्षेत्रातील कचरा हलवून परिसर स्वच्छ करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो म्हणाले की यंदा प्रथमच अनुसूचित जातींना आरक्षण देण्यात आलेले आहे. ज्या पंचायतींत अनुसूचित जातींच्या लोकांची संख्या ४.५ टक्के आहे अशा पंचायतींत त्यांना १ टक्का एवढे आरक्षण देण्यात आलेले आहे. ओबीसी व अनुसूचित जमातींतील लोकांची संख्या जास्त असून ओबीसींना २६ टक्के तर अनुसूचित जमातींना १२ टक्के एवढे आरक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचायत सदस्यांच्या सभेला व्यासपीठावर मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यासह पंचायत संचालक संध्या कामत, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर आदी मंडळी हजर होती.