पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीचा लेखाजोखा

0
89
  • अरविंद व्यं. गोखले
    (ज्येष्ठ संपादक)

ज्येष्ठ पत्रकार श्री. वामन सुभा प्रभू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद व्यं. गोखले यांच्या प्रस्तावनेचा संपादित भाग –

पत्रकारिता ही सुळावरची पोळी आहे, असे एकेकाळी म्हटले जात असे, पण आज हा सूळच बोथट निघालेला आहे. पत्रकारितेचा जो मूळ धर्म समाजहिताचा किंवा समाजसेवेचा होता, तो हरवला आहे. त्यामुळे त्याची धार निष्प्राण बनली आहे. पत्रकारितेतून बाहेर पडलेले किंवा निवृत्त झालेले आत्मचरित्राच्या भानगडीत पडत नाहीत. का? तर त्यांना खरे लिहावे लागेल आणि ते खरे लिहू शकतीलच असे नाही. माझे स्नेही आणि गोव्याचे एक जाणते पत्रकार श्री. वामन प्रभू यांनी आत्मचरित्रात्मक लेखन केले आहे, ज्याचे वर्णन त्यांनी स्वत:च ‘ऍक्सिडेंटल जर्नालिस्ट’ असे केले आहे. वामन प्रभू आणि मी यांच्यातला सर्वात मोठा दुवा हा ‘केसरी’ आहे. दोघांनाही ‘केसरी’त काम करायला मिळाले हे मोठे भाग्याचे वाटते हे वैशिष्ट्य. प्रभू स्वत:कडे काही प्रमाणात कमीपणा घेत असावेत, असे माझे मत आहे. ते अपघाताने पत्रकार बनले असतील असे मला वाटत नाही. नियतीने मनाशी काही खूणगाठ बांधलेली असते आणि तीच तुम्ही आयुष्यात कोण व्हायचे ते ठरवीत असते. तसे वामन प्रभू अपघाताने नसले तरी गोव्यात घडवले गेलेले अस्सल पत्रकार आहेत. म्हणजेच ते जाणीवपूर्वक बनलेले पत्रकार आहेत. त्यांचे वाचन चांगले होते आणि आहे. त्यांना राजकारणाच्या सर्वांगाबद्दल व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या या लेखनातून बरेच बारकावे उलगडले गेले आणि ते मला समजून घेता आले. त्यांना समाजकारणाचे सर्व अंग उमजलेले आहे. त्यांना पत्रकारितेचे आर्थिक गणित कदाचित उमजलेले नसेल, पण म्हणून काय झाले, त्यांनी पत्रकार बनू नये असे थोडेच आहे? ते पत्रकार बनले आणि त्यांनी बराच काळ गाजवलासुद्धा.
ज्या काळात मी किंवा वामन प्रभू नोकरीला लागलो तो काळ पुष्कळच चांगला होता. प्रभू आणि मी जवळपास एकाच वेळी नोकरीला लागलो. आमची तुकडी १९६९ ची असे म्हटले तरी चालेल. ते फक्त ऑक्टोबरमध्ये लागले आणि मी जुलैमध्ये. त्यांचा पगार आणि माझा पगार त्यावेळी एकसारखाच होता. तेव्हा हे पैसे जास्त नव्हते, पण कमी म्हणता येतील इतके कमीही नव्हते.
वामन प्रभू स्वत:ला ‘अपघाताने बनलेला पत्रकार’ असे जरी म्हणत असले तरी तेच काय, मीही अपघाताने बनलेला पत्रकार आहे. त्याचे असे आहे की, मी इयत्ता आठवी ते अकरावीपर्यंत टेक्निकल शाळेत होतो. म्हणजेच माझा आधी डिप्लोमाला आणि नंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी जाण्याचा मार्ग निश्चित होता. मला तर डिप्लोमाला सांगलीच्या वालचंद महाविद्यालयात प्रवेशही मिळालेला होता. स्वाभाविकच माझ्यापुढे पर्याय नव्हता. तथापि, माझा कल हा माझ्या या शिक्षणकाळातच हळूहळू बदलत चालला होता. याचे कारण असे की तो काळ हा संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षाचा होता. आमचे सकाळी ‘वर्कशॉप टेक्नॉलॉजी’चे तास असत. त्यानंतर बारा वाजता शाळा सुरू होत असे. म्हणजे प्रॅक्टिकल संपल्यावर तासभर किंवा कधीकधी दोन तासांचा अवधी मिळत असे. मग मी डबा घेऊन शाळेला जात असे. घरी जाऊन येण्याएवढा वेळ नसे, कारण पाच किलोमीटर चालत जाऊन परत यावे लागे. तेवढा वेळ नसे. डबा खायला फारतर पंधरा मिनिटे लागत. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तेव्हा या वेळेचा सदुपयोग वृत्तपत्रे वाचनासाठी केला जाई. दैनिकांची पारायणे केली जात आणि त्यावर मित्रांमध्ये चर्चाही रंगत असे. घरी आल्यावर रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याचीच चर्चा चाले. माझा मार्ग बदलला. म्हणजे मीही अपघाताने पत्रकार झालो. मला वाटायचे की, आपल्याला आचार्य अत्र्यांसारखे लिहिता यायला पाहिजे. ते जमले वा नाही, माहिती नाही, पण कडक लिहिण्याबद्दल माझे नाव झाले आणि अनेकदा धमक्यांनाही सामोरे जावे लागले. मी ‘केसरी’त बाविसाव्या वर्षी उपसंपादकपदी रुजू झालो. वयाच्या चाळिसाव्या वर्षी मी कार्यकारी संपादक झालो. याच काळात मी एम.ए. झालो. पुढे पाच वर्षांनी मी संपादक झालो. टिळक ज्या जागी होते ती जागा किती पवित्र आहे याचे भान सतत ठेवूनच मी लिखाण करत राहिलो.
वामन प्रभू यांनी मला प्रस्तावना लिहायची विनंती केली याला आम्हा दोघांमध्ये असलेले साम्य हे एक कारण असू शकेल, आणि दुसरे असे की पत्रकारितेविषयीची त्यांची आणि माझी बरीचशी मते जुळणारी असावीत असे त्यांना वाटल्याने असेल, त्यांनी मला हे सांगितले असावे. त्यांनी मोहन रानडे यांचा शेजारधर्म छान सांगितला आहे. मोहन रानडे जेव्हा पोर्तुगालच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी अतिशय मेहनत घेणारे सांगलीचे बापूराव साठे हे माझे प्रारंभीच्या काळातले मार्गदर्शक होते. ते रानडे यांच्या सुटकेसंबंधात जेव्हा पत्रव्यवहार करायचे तेव्हा तो त्यांच्याकडून मला दाखवण्यात येत असे. मोहन रानडे सुटकेनंतर सांगलीला आले होते तेव्हा त्यांचे झालेले प्रचंड स्वागत मी पाहिलेले आहे. रानडे आणि प्रभू यांचे संबंध मला त्यांच्या या लेखनातूनच उलगडले. प्रभू एका वखारीत काम करत होते हे मात्र मला धक्का देणारे वाटले, पण आज तोही धक्का वाटत नाही. कोरोनाने गेल्या काही काळात ज्या पत्रकारांची नोकरी गेली, त्यांना आता आयुष्याच्या मध्यावर खाद्यपदार्थांचे ब्लॉग लिहिणे किंवा वेगळ्या काही संकल्पना अमलात आणणे यासारखी कामे करावी लागत आहेत. अगदी पाच-सहा आकडी पगार मिळवणारा पत्रकारही जेव्हा मला दहा हजार मिळाले तरी चालतील असे म्हणून कोणाच्या दारी उभा असल्याचे ऐकायला मिळते तेव्हा मनाला वेदना झाल्याशिवाय राहात नाहीत. हे वातावरण विचित्र आहे. पण ज्या संघटनांच्या नावाशी ‘श्रमिक’ हा शब्द जोडलेला आहे अशा पत्रकारांच्या संघटना गप्प आहेत. त्या काहीही करू शकत नाहीत असे चित्र आहे.
वामन प्रभूनी त्यांच्या दैनिकाने अर्थसंकल्प कसा फोडला त्याचे वर्णन केले आहे. सरकार दरबारी असणार्‍या एखाद्यानेच जर अशी अर्थसंकल्पाची प्रत तुमच्या हाती आणून दिली आणि जर तुम्ही त्यास प्रसिद्धी दिली तर तो गुन्हा कसा काय ठरू शकतो? ब्रिटनमध्ये एका अर्थमंत्र्याने लॉबीत भेटलेल्या आपल्या पत्रकार मित्राला उद्देशून ‘आज काय धूम्रपान करायचे करून घ्या’ असे म्हटले. त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्या पत्रकाराने उद्याच्या (म्हणजे प्रसिद्ध होणार्‍या आजच्या) अर्थसंकल्पात सिगरेटवर जबरदस्त कर लावला जाणार असल्याची बातमी दिली. ते खरे ठरले. त्यावर बराच वाद झाला. हक्कभंगही आणला गेला. पण तो पत्रकार त्यातून निर्दोष सुटला. आता इथे त्या पत्रकाराचा दोष काय ते कळत नाही. अर्थात या मुद्यावर वाद होऊ शकतो. पूर्वी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची प्रत वृत्तपत्रांकडे राज्य प्रसिद्धी खात्यामार्फत आदल्या दिवशी पोहोचती केली जात असे आणि त्यावर अर्थसंकल्प मांडला जाण्यापूर्वी त्यास प्रसिद्धी दिली जाऊ नये, (एम्बार्गो) असे लिहिलेले असे. पुण्यातल्या एका वृत्तपत्राने ही सूचना न पाळता त्यास प्रसिद्धी दिली आणि दुसर्‍या दिवशी विधानसभेत एकच गोंधळ झाला. अर्थात ते बरोबर होते. पण मग त्या वृत्तपत्राच्या विरोधात हक्कभंग आणला गेला. एका अशाच वृत्तपत्राने सभागृहाच्या कामकाजाची तुलना मासळी बाजाराशी केली, तेव्हाही हक्कभंग होऊन संबंधित संपादकांना एक दिवसाची शिक्षाही झाली.
वामन प्रभू यांनी दयानंद बांदोडकर ते मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा आपल्याला या लेखनातून अनुभवायला मिळतो. त्यांनी त्या-त्या काळात डायर्‍या लिहिल्या होत्या की नाही, माहिती नाही. पण त्यांनी कामावर असताना जी नोटबुके वापरली असतील, ती जर त्यांच्याकडे शिल्लक असतील आणि त्यावर त्यांनी नजर टाकली तरी त्या-त्या काळात काय घडले ते लख्खपणे त्यांच्या डोळ्यासमोर येत असेल. काहीजणांची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त असते की त्यांना अशा गोष्टींची आवश्यकताही पडत नाही. त्यांच्या डोक्यात तारीखवार अशा घटना साचेबद्ध झालेल्या असतात. प्रभूच्या बाबतीत अशीच तल्लख स्मरणशक्ती त्यांच्या दिमतीला येत असावी असा माझा समज आहे.
प्रभूंनी जेवढ्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांना निवडले आणि तिथे काम केले तेवढे भाग्य क्वचितच अन्य कोणाच्या वाट्याला आलेले असेल. त्यांनी बर्‍याच गोष्टी खर्‍याखर्‍या लिहिल्या आहेत आणि खोटी किंवा बढाईखोर अशी एकही घटना लिहिलेली नाही. पत्रकाराला कोणाबद्दल फार प्रेम दाखवून चालत नाही, पण कोणाबद्दल सतत द्वेष बाळगूनही चालत नाही. प्रभूंनी तेच धोरण स्वीकारल्याचे या सर्व लेखनातून मला जाणवले.
प्रभूंनी अनेक गमतीजमती लिहिलेल्या आहेत. त्या वाचून थक्क व्हायला होते. कोणत्याही राजकारण्याशी, मुख्यमंत्र्यांशी वा मंत्र्यांशी ओळख असणे निराळे आणि त्याच्याशी निकटवर्तीय असल्याचा अभिमान बाळगणे निराळे. समजा तसे तुम्ही जवळचे आहात तर मग त्या जवळीकीचा उपयोग तुम्ही वेगळ्या बातम्यांसाठी करायला हरकत नसावी. गोव्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी कोणा एकाच्या विरोधात केलेल्या तक्रारीचे ध्वनिमुद्रणच प्रभू यांच्या वृत्तवाहिनीने ऐकवले. त्यावर भल्याभल्यांची बोलती बंद झाली. त्यावर चिडचिडही झाली. या पद्धतीने एखादे सरकार किती अडचणीत येऊ शकते ते आपण मधल्या काळात अनुभवले आहे. अशा कितीतरी गोष्टी आणि बर्‍याच वेगवेगळ्या भानगडी आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतात. त्यांची मांडणी प्रभूंनी उत्तमरीत्या केली आहे. या सर्व हकिकती रंजक आणि पुढल्या पिढीसाठी माहितीपूर्ण आहेत. प्रभू यांना पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा.