चातुर्मास ः उत्सव विशेष

0
187
  • अंजली आमोणकर

चातुर्मासात सर्वच गोष्टी आपापसावर अवलंबून असल्याने यापायी नकळत देशाची आर्थिक स्थिती सुधारते. असा हा मनस्वास्थ्य देणारा, आनंदी आनंद वाटणारा, निर्भेळ मनःशांती पुरवणारा चातुर्मास माणसाच्या जीवनात कळत-नकळत खूप मोठी मानाची, महत्त्वाची जागा व्यापून बसलेला आहे.

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्‍विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. आषाढी शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. (याच एकादशीला ‘पद्मा एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ असे म्हणतात. पंढरपूरची वारीही याच एकादशीला असते.) कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत असतो. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात व कार्तिकातील एकादशीला- प्रबोधिनीला उठतात, अशी हिंदूंची एक धारणा आहे. ज्यावर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्‍विन महिन्यातील अधिक मास येतो त्यावर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.

शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात (अशी संकल्पना आहे). आश्‍विनात पिकांची तोडणी होते. कार्तिकात मळणी होऊन देव उठण्याची (जागे होण्याची) वेळ येते- अशी आपली कृषिपरंपरा आहे.

या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार (मुंज), विवाह, गृहप्रवेश, दीक्षाग्रहण यज्ञ, योगदान यज्ञ इत्यादी शुभकर्मे केली जात नाहीत, असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस ‘हरिशयन’ म्हटले जाते. संस्कृत भाषेत ‘हरी’ हा शब्द सूर्य-चंद्र-वायू-विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून ‘हरिशयन’ म्हणजे ढगांमुळे सूर्य-चंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

आषाढ शुक्ल पक्षातील या पद्मा एकादशीचे व्रत केल्याने उत्तम वृष्टी होते, सर्व सिद्धी प्राप्त होतात, सर्व उपद्रवांचा नाश होतो असे मानण्यात येते. हे व्रत ऐश्‍वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक असे म्हटले जाते. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा करणे, संतदर्शन, दानधर्म करणे इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणार्‍या मानल्या जातात.

देवांच्या त्या शयनकालात असुर (वाईट प्रवृत्ती) अतिशय माततात, प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. तेव्हा ‘असुरांपासून स्वसंरक्षण’ करण्याकरिता प्रत्येकाने काहीतरी व्रत करावे असे धर्मशास्त्र सांगते.

या कालावधीत पावसाचा भर असल्यामुळे लोकांचे ङ्गारसे स्थलांतर घडत नाही, त्यामुळे आपोआपच चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला. सर्वसामान्य लोक चातुर्मासात पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एक भोजन (एका वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच वाढून घेऊन जेवणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थांचा काला करून जेवणे) इत्यादी भोजन नियम करतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रतदेखील करतात (यात एक दिवस भोजन, दुसर्‍या दिवशी उपवास असे सतत चार मास करतात). अनेक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात. चातुर्मासात मानवाचे मानसिकरूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी ही सर्व व्रते आरोग्याच्या पथ्यावरच पडतात. त्यामुळे ‘वर्ज्य’, ‘अवर्ज्य’ गोष्टींची यादी धर्ममार्तंडातर्ङ्गे देण्यात आलेली आहे. अर्थात ऋतुमानाप्रमाणे, आरोग्याचा विचार यात खोलवरपणे करून जास्तीत जास्त उपयोगी अशी ही यादी आहे. शिवाय, धर्मशास्त्र सांगते- असं भाकीत करताच लोक मुकाट्यानं, खुसपटं न काढता त्यांचे आचरण करतात- असेही बघण्यात आले आहे.

वर्ज्य ः प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडलिंबू, महाळुंग, वैश्वदैव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बिज ङ्गळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळा, चिंच, कांदा आणि लसूण, तसेच, मंचकावर शयन, ऋतुकालावाचून स्त्रीगमन, परान्न, विवाह किंवा तत्सम कार्य, यतौला वपन हे पदार्थ तमगुणयुक्त असतात.

अवर्ज्य ः चातुर्मास्यात हविषान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, तूप, ङ्गणस, आंबा, केळी, नारळ इत्यादी पदार्थ, हविष्ये जाणावीत. हे पदार्थ सत्गुण प्रधान असतात.

चातुर्मास कालावधी धर्मशास्त्रीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. धर्म तर जीवनाचा पाया आहे. याच पायावरती जीवनाची सर्वांगीण प्रगती होते. अनेक लोक काही साधना न करता धार्मिक विधींना नावे ठेवत असतात. प्रत्यक्ष साधना करू लागलो तर त्यापासून होणार्‍या लाभांची आपणास जाणीव होईल. चार्तुमासातील उपासना, साधना व्रताने दैवीगुणांचा निश्‍चितच विकास होत असतो. दैवीगुण वाढले तर जीवन आनंदी बनते. दैवीसंपदा ही मुक्तीदायक असून, आसुरी संपदा ही बंधनकारक आहे.
चातुर्मासात सणा-उत्सवांची, व्रता व पूजांची रेलचेल असते. या चार महिन्यांत येणारे सण- उत्सव याप्रमाणे आहेत-
१) अर्धा आषाढ ः आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, दीपपूजन.
२) पूर्ण श्रावण ः नागपंचमी, नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन), कालाष्टमी, गोपालकाला (दहीहंडी), बैल पोळा, मंगळागौर.
३) पूर्ण भाद्रपदा ः हरितालिका, गणेश चतुर्थी.
४) पूर्ण आश्‍विन ः घटस्थापना (नवरात्र), दसरा, कोजागिरी पौर्णिमा, अर्धी दिवाळी (वसुबारस, धनत्रयोदशी).
५) कार्तिक ः अर्धी दिवाळी (नर्क चर्तुदशी), लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज.
चातुर्मास समाप्तीच्या दिवशी तुलसी विवाहारंभ होतो. मान्यता आहे की या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेसाठी पाताळात जातात. यावेळी भगवान विष्णूचे साधक संयम आणि नियमांनी जप, तपश्‍चर्या, दान इत्यादी करून भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय करतात. हिंदू धर्माबरोबरच जैन आणि बुद्ध धर्मातही चातुर्मासाचं विशेष महत्त्व आहे.

चातुर्मासाबद्दल दोन-तीन कथा प्रसिद्ध आहेत-
मान्यता आहे की, एकदा राक्षसांचा राजा विरोचनाचा मुलगा बलीने अश्वमेध यज्ञ करून बरेच पुण्य अर्जित केले. यामुळे सर्व राक्षस-देवतांपेक्षा तो उच्च श्रेणीत पोहोचला आणि त्याने इंद्रपद हिसकावून घेतले. यानंतर सर्व देवता भगवान विष्णूकडे मदतीचा धावा करू लागले. भगवान विष्णूने देवतांच्या रक्षणासाठी वामनावतार घेतला आणि बलीच्या डोक्यावर पाय ठेवून तीन पावलांमध्ये पृथ्वी, आकाश आणि पाताळ मोजून बलीला आश्रयहीन केले. पण त्याबदल्यात बलीला पाताळाने राज्य दिले व वरदान मागावयास सांगितले. तेव्हा बलीने प्रार्थना केली की, वर्षातून एकदा त्यांनी माता लक्ष्मीसोबत पाताळलोकांत निवास करावा. भगवान विष्णूने ‘तथास्तु’ म्हणून त्याची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून हे चार महिने, भगवान विष्णू लक्ष्मीमातेसह पाताळलोकांत निद्रिस्त होतात.
आणखीन एका पौराणिक कथेचा संदर्भ चातुर्मासाला आहे-
मांघाता नामक चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांड पुराणातली कथा सांगितली आहे. हा राजा चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रज्ञेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याही व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोशागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. ते अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राज्याच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजानन त्रासले. भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले- ‘‘राजा प्रजेला हिताचे ठरले असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला ‘नारा’ असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच भगवंताचे घर (आयन) आहे. म्हणून तर भगवंताला नारायण असे म्हणतात. असा हा विष्णू पर्जन्यरूप आहे, तेव्हा त्यास प्रसन्न करून घे. सैन्य घेऊन राजा विविध मुनींना व त्यांच्या आश्रमांना भेटी देऊ लागला तेव्हा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ऋषी अंगिर दिसले. त्यांच्या तेजाने, दीप्तीने आश्‍चर्यचकित होत राजा त्यांना शरण जाऊन विचारता झाला, ‘मुनिश्रेष्ठा, स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे व प्रजाजनांचे हित पाहणार्‍या माझ्यासारख्या राजाला आता पृथ्वीचे त्राही त्राही झालेले रूप पाहावयास लागत आहे, त्यावर उपाय सांगा.’ तेव्हा मुनिश्रेष्ठांनी त्यांना पद्मा एकादशीचे व्रत आचरण्यास सांगितले. त्याने राज्यात उत्तम वृष्टी होईल, उपद्रवांचा नाश होईल व सर्वत्र आबादी आबाद होईल असे सांगितले. हे व्रत करताच सर्वत्र वृष्टी झाली. थोड्याच दिवसांत शेते पिकांनी डोलू लागली. सर्व लोकांना सौख्य मिळाले. अशी ही कथा आहे.

आश्‍चर्य म्हणजे चातुर्मासातील चार महिन्यांत धार्मिक पुस्तकांना अतोनात खप असतो. आपला धर्म व त्याची मूळ सूत्रे कशी आहेत हे जाणून घेण्याची लोकांना जिज्ञासा आहे.

चातुर्मासात येणार्‍या सणांपायी समाजाची यथेच्छ बेगमी होते. लहान-मोठ्या व्यापारांना चालना मिळते. ङ्गुटकळ गोष्टींपासून ते भव्य उलाढालीपर्यंत बाजार चैतन्यमय होताना दिसतो. राख्या, मातीचे नाग, देवांचे ङ्गोटो, गणपतीच्या मूर्ती, दसर्‍याची सुगडं, ङ्गुलं, मखरं, सजावटीचं सामान, कपडालत्ता, किराणा सामान, ङ्गराळाचे रेडीमेड जिन्नस अशा नानाविध वस्तूंची तूङ्गान विक्री या काळात होत असते. व्यापारीवर्गाची अशी बेगमी होते तर दिवाळी अंकांपायी साहित्यिकांची बेगमी होते. चुरस वाढते. स्पर्धा होतात. उत्तमोत्तम साहित्याची निर्मिती होते. नवरात्र, गणेशोत्सव, मंगळागौरीपायी अनेक कार्यक्रमांची निर्मिती होते. खास कार्यक्रम रेडियो, टीव्ही व जाहिररीत्या होताना दिसतात. कलाकारांना काम मिळून त्यांची बेगमी होते. मजूरवर्गाला, मोलकरीण, स्वयंपाकी यांना जास्तीची कामं मिळून (साङ्गसङ्गाई, रंगसङ्गेदा, दुरुस्त्या, ङ्गराळ, पूजाअर्चांचा खास स्वयंपाक) अशी त्यांचीही बेगमी होते. सर्वच गोष्टी आपापसात अवलंबून असल्याने यापायी नकळत देशाची आर्थिक स्थिती सुधारते.

असा हा मनस्वास्थ्य देणारा, आनंदी आनंद वाटणारा, निर्भेळ मनःशांती पुरवणारा चातुर्मास माणसाच्या जीवनात कळत-नकळत खूप मोठी मानाची, महत्त्वाची जागा व्यापून बसलेला आहे.