पणजी निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

0
101

पणजी मतदारसंघासाठी येत्या १३ रोजीच्या पोटनिवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन निवडणूक निरीक्षक दाखल झालेले असून मीना लोचन व अरुल गुप्ता अशी त्यांची नावे आहेत. पैकी अरुल गुप्ता हे खर्चावर लक्ष ठेवणारे निरीक्षक असल्याचे ते म्हणाले.कायदा व सुव्यवस्था यावर लक्ष ठेवण्यासाठी यापूर्वीच निम लष्करी दलाची एक तुकडी गोव्यात पोचली आहे. तर इंडिएन रिझर्व्ह बटालिएनची (आयआरबी) एक तुकडी लवकरच येणार आहे. मतदानानंतर मतदान यंत्रे ईएसजी (गोवा मनोरंजन सोसायटी) इमारतीत ठेवण्यात येणार आहेत.
मतदानाची वेळ ८ ते ६ अशी असेल. निवडणुकीच्या कामासाठी २२५ कर्मचार्‍यांची फौज असेल. बुधवारी ६ वा. प्रचाराची सांगता झाल्याचे ते म्हणाले. एकूण मतदान केंद्रांची संख्या ३० एवढी असून त्यापैकी एकही संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील नसल्याचे नावती यांनी सांगितले. मतदानासाठी ३० निवडणूक यंत्रांची सोय करण्यात आलेली असून सहा यंत्रे आरक्षित असतील व ज्या ठिकाणी यंत्रे बिघडतील तेथे ही यंत्रे पाठवण्यात येतील.
दरम्यान, मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २२०५७ एवढी असून पैकी १०७२२ पुरुष तर ११३३५ महिला मतदार असल्याचे ते म्हणाले. भाजप, कॉंग्रेस व दोन अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. सर्वांत जास्त मतदार हे गृहविज्ञान महाविद्यालय, कांपाल या केंद्रावर असून तेथील मतदारसंख्या ९३१ एवढी आहे. तर सर्वांत कमी मतदार (३८६) हे रायबंदर फोंडवे येथील मतदान केंद्रावर आहेत. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल त्यांना पारपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, आरजीआयचे स्मार्ट कार्ड, मनरेगाखाली मिळालेले कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटो असलेले पेन्शन डॉक्युमेन्ट, फोटो वोटर स्लीप अथवा खासदार किंवा आमदार यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र दाखवल्यास त्यांना मतदान करता येणार असल्याचे नावती यांनी यावेळी स्पष्ट केले.